आयपीएल 2026 स्पर्धेतील प्लेऑफचं चित्र आता हळूहळू स्पष्ट होणार आहे. अजूनही प्लेऑफमधल्या एकाही संघांचं नाव ठरलेलं नाही. पण टॉप 4 मध्ये असलेल्या संघांना संधी आहे. असं असताना प्रत्येक जय पराजय महत्त्वाचा आहे. यासह संघांच्या नावावर काही विक्रम नोंदवले जात आहेत. काही विक्रम चांगले आहेत, तर काही विक्रम नकोसे वाटत आहेत. पंजाब किंग्सच्या बाबतीत तसंच घडलं आहे. पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात 49वा सामना पार पडला. हा सामना सनरायझर्स हैदराबादने जिंकला आणि प्लेऑफच्या दिशेने कूच केली. तर गुणतालिकेत पंजाब किंग्सची पहिल्या स्थानावरून दुसर्या स्थानावर घसरण झाली आहे. सनरायझर्स हैदराबादने या विजयासह चेन्नई सुपर किंग्सचा विक्रम मोडीत काढला आहे. खरं तर हा मोठा विक्रम आता सनरायझर्स हैदराबादच्या नावावर झाला आहे. तर पंजाब किंग्सच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.
पंजाब किंग्स एकाच मैदानात एका संघाविरुद्ध सर्वाधिक वेळा सामना गमावणारा संघ ठरला आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना पार पडला. सनरायझर्स हैदराबादने या मैदानात पंजाब किंग्सला नवव्यांदा पराभवाची धूळ चारली आहे. पराभवाची ही मालिका 2015 पासून सुरू आहे. यासह सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सचा विक्रम मोडत काढला. चेपॉक मैदानावर सलग आठवेळा चेन्नई सुपर किंग्सने विजय मिळवला होता. चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आठवेळा या मैदानात पराभूत केलं होतं. 2010 ते 2014 या कालावधीत चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत केलं होतं.
आयपीएल 2026 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स दोन वेळा आमनेसामने आले होते. पहिला सामना 11 एप्रिलला झाला आणि या सामन्यात पंजाब किंग्सने 6 गडी राखून सनरायझर्स हैदराबादला पराभूत केलं. पण दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने हिशेब बरोबर केला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्सला 33 धावांनी पराभूत केलं. या पराभवासह पंजाब किंग्सच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंदही करून ठेवली. आता विक्रम पुढच्या काही पर्वात कायम राहिल. कारण एखाद्या संघाला एकाच मैदानात सलग हरवणं वाटतं तितकं सोपं नाही.