होम लोनचे टेन्शन विसरा! 20 वर्षांचे गृहकर्ज 13 वर्षांतच कसे फेडाल? ChatGPT ने सांगितल्या सोप्या ट्रिक्स
Tv9 Marathi May 08, 2026 03:45 AM

40 लाखांचे गृहकर्ज 20 वर्षांऐवजी 13 वर्षांत संपवणे आता अशक्य राहिलेले नाही. यासाठी तुम्हाला दरमहा हप्त्यात किरकोळ वाढ किंवा वर्षातून एकदा अतिरिक्त पेमेंट करणे आवश्यक आहे. या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशा 3 सोप्या मार्गांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या कर्जाचा कालावधी तर कमी होईलच, पण सोबतच लाखो रुपयांच्या व्याजाची बचतही होईल.

आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बहुतांश लोक गृहकर्जाचा (Home Loan) आधार घेतात. साधारणपणे गृहकर्जाचा कालावधी 15 ते 20 वर्षांचा असतो. कर्ज घेताना सुरुवातीला सर्व काही सोपे वाटते, पण जसा जसा काळ पुढे जातो, तसा दर महिन्याला भराव्या लागणाऱ्या ईएमआयचा (EMI) भार जाणवू लागतो. 20 वर्षांच्या या प्रदीर्घ प्रवासात मुद्दलापेक्षा व्याजाची रक्कमच जास्त भरली जाते, हे अनेक कर्जदारांच्या लक्षात येत नाही. मात्र, आता या समस्येवर आधुनिक तंत्रज्ञान म्हणजेच ChatGPT ने काही प्रभावी उपाय सुचवले आहेत. जर तुम्ही 40 लाख रुपयांचे गृहकर्ज 20 वर्षांसाठी घेतले असेल, तर काही स्मार्ट पद्धती वापरून तुम्ही ते अवघ्या १३ वर्षांत संपवू शकता.

दरवर्षी एक अतिरिक्त ईएमआय

कर्जाचा कालावधी कमी करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे ‘पार्ट पेमेंट’. ChatGPT नुसार, जर तुम्ही दरवर्षी तुमच्या नियमित 12 हप्त्यांव्यतिरिक्त एक अतिरिक्त ईएमआय भरला, तर तुमच्या कर्जाचा कालावधी वेगाने कमी होतो. उदाहरणार्थ, जर तुमचा ईएमआय 35,000 रुपये असेल, तर वर्षातून एकदा बोनस किंवा इतर उत्पन्नातून 35,000 रुपये बँकेत जमा करा. ही छोटीशी पावले तुमच्या 20 वर्षांच्या कर्जाला थेट 2 ते 3 वर्षांनी कमी करू शकतात. हे पैसे थेट तुमच्या मुद्दलातून (Principal) वजा होतात, ज्यामुळे उर्वरित कालावधीत लागणारे व्याज लक्षणीयरीत्या कमी होते.

दरवर्षी ईएमआयमध्ये 5% वाढ करा

जसे तुमचे वय वाढते, तसे तुमचे उत्पन्न आणि पगारही वाढतो. याच वाढीव उत्पन्नाचा वापर गृहकर्ज लवकर फेडण्यासाठी करा. याला ‘स्टेप-अप ईएमआय’ (Step-up EMI) असे म्हणतात. जर तुम्ही दरवर्षी तुमच्या ईएमआयच्या रकमेत केवळ 5 टक्क्यांनी वाढ केली, तर त्याचा जादूई परिणाम पाहायला मिळतो. समजा तुमचा ईएमआय 30,000 रुपये आहे, तर पुढच्या वर्षी तो 31,500 रुपये करा. केवळ 5 टक्क्यांची ही छोटी वाढ तुमचे 20 वर्षांचे कर्ज 13 ते 14 वर्षांच्या दरम्यान पूर्णपणे संपवू शकते. या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा असा की, तुमच्या खिशाला एकदम मोठा फटका बसत नाही आणि कर्जही वेगाने फिटते.

मुद्दलाची 10 टक्के रक्कम दरवर्षी जमा करणे

जर तुम्हाला मोठी रक्कम बोनस म्हणून मिळाली किंवा एखाद्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळाला, तर तो पैसा खर्च करण्याऐवजी गृहकर्जाच्या मुद्दलात जमा करा. दरवर्षी मुद्दलाच्या (Principal Amount) किमान 10 टक्के रक्कम ‘प्री-पेमेंट’ म्हणून भरल्यास कर्जाचा डोंगर अतिशय वेगाने खाली येतो. यामुळे केवळ कालावधीच कमी होत नाही, तर तुम्ही बँकेला जे लाखो रुपये व्याज देणार होता, त्या पैशांची मोठी बचत होते. अनेक बँका आता फ्लोटिंग इंटरेस्ट रेटवर प्री-पेमेंट चार्जेस आकारत नाहीत, त्यामुळे हा पर्याय अतिशय फायदेशीर ठरतो.

व्याजाचे गणित आणि मोठी बचत

जेव्हा तुम्ही 20 वर्षांसाठी कर्ज घेता, तेव्हा सुरुवातीच्या 7-8 वर्षांत तुम्ही जो ईएमआय भरता, त्यातील मोठा हिस्सा केवळ व्याजाचा असतो. मुद्दल खूप हळूहळू कमी होते. मात्र, वरील तीनपैकी कोणत्याही एका किंवा सर्व पद्धतींचा वापर केल्यास तुमचे मुद्दल वेगाने कमी होते. 40 लाखांच्या कर्जावर तुम्ही 20 वर्षात साधारण 30 ते 40 लाख रुपये फक्त व्याज म्हणून भरता. पण कर्ज 13 वर्षात संपवल्यास, तुम्ही व्याजाचे 15 ते 20 लाख रुपये सहज वाचवू शकता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.