सोलापूर : देगाव रोडवरील हॉटेलमध्ये वाढदिवसाची पार्टी करून गुरुवारी (ता. ७) पहाटे दीडच्या सुमारास घरी जाताना सोलापूर-हैदराबाद रोडवरील पर्ल गार्डनजवळ कार उलटून तिघे ठार झाले. महामार्गावर बिघाड होऊन थांबलेल्या टेम्पोला चुकविताना हा अपघात झाल्याचे जोडभावी पेठ पोलिसांनी सांगितले.
सोलापुरातील शांती चौक परिसरातील सुझुकी शोरूममध्ये अमोल श्रीशैल येरटे (वय ४०, रा. दाळगे प्लॉट, भवानी पेठ), शेखर सुरेकर (वय ३३, रा. कुमठा नाका), कादर सैदु हंडे (वय ३४, रा. जीवन विकास नगर, कुमठा नाका), स्वरूप कोथिंबिरे व जाधव असे पाचजण नोकरीला होते. कादर हंडे याचा वाढदिवस असल्याने त्यानिमित्त हे सर्वजण जेवणासाठी हॉटेलमध्ये गेले होते. वाढदिवसाची पार्टी करून सर्व मित्र आनंदात घरी जात होते. अमोल येरटे कार चालवत होता. पर्ल गार्डनजवळील रोडवर एका टेम्पोचा गिअर बॉक्स बिघडल्याने तो थांबला होता. तो टेम्पो अचानक समोर दिसल्याने त्याला चुकविताना कार एका बाजूने टेम्पोला धडकली.
त्यानंतर कारवरील नियंत्रण सुटून तब्बल १५० फूट कार फरफटत गेली. पुढे ती दुभाजकावर जाऊन आदळली. यात अमोल येरटे व शेखर सुरेकर यांचा जागीच मृत्यू झाला. कादर हंडे हा गंभीर जखमी झाला होता; मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलाचा अपघात झाल्याची माहिती मिळताच स्वरूपची आई घरातच चक्कर येऊन पडली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. या अपघातप्रकरणी रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
कारचा दरवाजा टेम्पोलाच अडकून राहिला
कार अमोल येरटे चालवत होता. शेखर सुरेकर हा चालकाच्या मागे बसला होता. हंडे चालकाच्या बाजूला बसला होता. स्वरूप व जाधव हे दोघे मागील सीटवर बसले होते, असे पोलिसांनी सांगितले. अपघातानंतर कारमधील एअरबॅग उघडल्या होत्या; मात्र भीषण अपघातामुळे त्याचा काहीच फायदा झाला नाही. अपघात इतका भीषण होता की, कार चालकाच्या डाव्या बाजूचा दरवाजा टेम्पोलाच अडकून राहिला होता. अपघाताची माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलिस घटनास्थळी पोचले. पहाटे पावणेदोन ते अडीच वाजेपर्यंत पोलिसांचे मदतकार्य सुरू होते.