पुणे : एका सराफ व्यावसायिकाकडून दीड किलो सोने घेऊन त्यातील एक किलो सोन्याचा अपहार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अशोक मुरलीधर अष्टेकर (वय ६४, रा. करिष्मा सोसायटी, कोथरूड) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. योगेश उमेश संचेती, मंगला उमेश संचेती आणि उमेश तिलोकचंद संचेती (तिघे रा. आदर्शनगर, बिबवेवाडी) या संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अष्टेकर यांची रविवार पेठेत सराफी पेढी आहे. संचेती सराफी व्यवसायात असून, अष्टेकर आणि संचेती यांचे व्यावसायिक संबंध होते. व्यवसायात तोटा झाल्याचे भासवून त्यांनी मदतीची विनंती केली. अष्टेकर यांनी त्यांना दीड किलो शुद्ध सोने दिले होते. त्यापैकी पाचशे ग्रॅम सोने संचेती यांनी अष्टेकर यांना परत केले. मात्र, उर्वरित एक किलो सोने देण्याचे वारंवार आश्वासन देऊनही त्यांनी अद्याप परत केले नाही. या सोन्याची किंमत सुमारे एक कोटी ५५ लाख रुपये इतकी आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अष्टेकर यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अरविंद शिंदे करत आहेत.