‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री सभेत संचार’ वगैरे प्रवासाचे फायदे वर्णन करणारे श्लोक आपल्याला माहीत असले तरी प्रवास हा माणसाला स्वतःच्या घरापासून दूर नेतो व त्यामुळे प्रवास एकदा केला की परतीचा प्रवास करावाच लागतो, कारण माणसाला स्वतःच्या घरी परत यायचे असते. मनुष्य स्वतःपासून जेवढा दूर पळतो, तेवढा तो अस्वस्थ होतो, त्याचे मन अशांत होते व त्याचा मानसिक ताण वाढतो, त्याला शारीरिक थकवा येतो आणि त्याला आपण केव्हा एकदा परत जातो याची ओढ लागते, म्हणजेच त्याचे लक्ष घराकडे लागते. जे कार्य करत आहे, त्याकडे लक्ष न लागता लक्ष दुसरीकडे असले तर कामाचा आनंद घेता येत नाही.
म्हणजेच प्रवास जसा आनंददायी असतो तसाच तो काही अंशी त्रासदायकही असू शकतो. यातील सर्वांत नको वाटणारी गोष्ट म्हणजे रोज करावा लागणारा प्रवास. त्यातल्या त्यात गरज नसताना वयाच्या तीन वर्षापासून लहान मुलांना शाळेत घालण्याच्या हट्टापायी व चांगल्या शाळेच्या हव्यासापायी कुठेतरी दूर असलेली शाळा निवडली गेली तर रोज शाळेत जायला अर्धा-पाऊण तास, घरी परत यायला अर्धा पाऊण तास, असा दिवसातून दीड-दोन तासांचा प्रवास करावा लागतो. या प्रवासात सुखाने व्यवस्थित बसता येईल एवढी जागा मिळेलच याची खात्री नसते. एका वाहनात १५-२० मुलांना उभे-आडवे कोंबून प्रवास करावा लागला तर मुलांच्या मानसिक व शारीरिक अवस्थेची कल्पना केलेलीच बरी. प्रवास स्वस्त व्हावा या हेतूने स्वस्त वाहने निवडली असल्यास आतल्या प्रवाशाला किती धक्के देतात व याची कल्पना येत नाही. त्याचबरोबर खड्डामय रस्त्याने वाहन जात असताना आपल्या बालकाचे किती हाल होत असतील हे सांगणे अवघड आहे. माणसाला जखम झाली तर त्याला जशा वेदना होतात तशाच वेदना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे पृथ्वीला होत असणार. पण शेवटी त्या वेदना भोगण्याचे माध्यम पृथ्वीपासून उत्पन्न झालेल्या मनुष्यापर्यंत येऊन पोचते व सर्व वेदना माणसाच्या मार्फतच भोगल्या जातात. जखम जेव्हा भरेल तेव्हा भरेल पण या त्रासामुळे लघवीच्या ठिकाणी इन्फेक्शन होणे, आतड्यांवर येणाऱ्या ताणामुळे मलविसर्जन व्यवस्थेत तसेच पचनाच्या व्यवस्थेत बदल होणे, मेरुदंडाची वाढ चुकीच्या आकारात व वेडीवाकडी होणे वगैरे कायमस्वरूपी त्रास होऊ शकतात. वयाच्या सहा वर्षांपर्यंत मुलाचा मेंदू तयार होत असतो, मेंदूत उत्पन्न होणाऱ्या दोषांचे कारण कुठल्याही विज्ञानशाखेला सापडू शकत नाही. पण याचे मूळ लहानपणी केल्या गेलेल्या अशा प्रवासात असू शकते. छानपैकी बसने प्रवास केला तरी मुलांना काही प्रमाणात तसाच त्रास भोगावा लागतो. रेल्वेने प्रवास करायचा म्हटला तरी घर ते रेल्वे स्टेशन हे अंतर पार करावेच लागते. रेल्वेत त्यामानाने धक्काबुक्की कमी असली, खड्ड्यांचा त्रास नसला तरी तेथे सुद्धा एकूणच वातावरण आरोग्यदायी असते असे म्हणता येणार नाही.
ज्यांना रोज प्रवास करावा लागतो त्यांनी प्रवास कमी कसा होईल हाच विचार करणे इष्ट ठरते. आपण ज्या विभागात राहतो त्या विभागात असलेल्या शाळेतच मुलाला पाठवावे लागते असा नियम परदेशात आहे, असे ऐकिवात आहे. तरी सुद्धा वेगळ्या प्रकारच्या शाळा, जेथे नैतिक मूल्यांचा आधार घेऊन, वेगळ्या प्रकारचे शिक्षण मिळते अशा शाळेत मुलाला घालायचे असल्यास थोड्या अधिक अंतरावर असलेली शाळा निवडावी लागते. पण मुलाला काळजीपूर्वक शाळेत पोहोचवावे अशी अपेक्षा असते.
मुले मोठी झाल्यानंतर कॉलेज वगैरे करत असताना त्यांना लांबचा प्रवास करावा लागणे अपरिहार्य असते, तरी सुद्धा वाहनांचे, त्यात असलेल्या गर्दीचे, वाहनाच्या वेगाचे त्रास कमीत कमी व्हावेत या हेतूने व्यवस्था करण्याची जबाबदारी खरे तर सरकारची असते. पण तसे होताना दिसत नाही त्यामुळे पुढे अनेक आजारांना तोंड द्यावे लागते.
प्रत्येकाचे उपजीविकेसाठी करावे लागणारे काम राहत्या जागेपासून फार लांब असू नये, त्यासाठी रोज मोठा प्रवास करण्याची वेळ येऊ नये. समजा एक तास जायला लागत असेल व एक तास परत यायला लागत असेल तर या रोजच्या दोन तासांची किंमत व प्रत्यक्ष केलेला खर्च हे लक्षात घेता वसतिगृहात किंवा कामाच्या जागेच्या जवळपास मिळणारी खोली घेऊन राहणे फायद्याचे ठरावे. शिवाय रोजच्या प्रवासामुळे येणाऱ्या आजारावरचा खर्च लक्षात घेतला तर स्वतंत्र खोली घेणे किंवा वसतिगृहात राहणे परवडू शकते.
अर्थात एक गोष्ट निश्र्चित, की शालेय शिक्षणाच्या वेळी मुलांना वसतिगृहात ठेवण्याची वेळ आली तर घरचे संस्कार, आई-वडिलांचे प्रेम यापासून मुले वंचित राहू शकतात. त्या दृष्टीने विचार करून एकूण शाळा निवडावी.
अजिबात प्रवास न करता घरच्या घरी किंवा घराच्या अगदी जवळ काम मिळणे अवघड असते हे नक्की. पण तरीही रोजच्या कामासाठी प्रवास न करावा लागला तर उत्तम. पण करावाच लागणार असेल तर तो मोजका असावा, त्यासाठी योग्य वाहनांची व्यवस्था केलेली असावी. प्रवासात शक्यतो बसायला जागा मिळावी. वाहनाच्या तळाशी बसायला लागले तरी हरकत नाही, पण उभे राहून हेलकावे खात प्रवास करणे शरीरासाठी त्रासदायक असू शकते.
मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये दूरवरचा प्रवास करावा लागतो. जायला दीड तास, यायला दीड तास शिवाय चालणे अशा रीतीने प्रवास होत असतो. वय वाढत जाईल तसा या प्रवासाच्या त्रासाचे परिवर्तन रोगात होऊ शकते. हे लक्षात घेऊन, कामावर जाणाऱ्या प्रत्येकासाठी योग्य तऱ्हेची वाहनव्यवस्था करणे ही खरे तर शासनाची जबाबदारी ठरते. तसे पाहताना काही लोक रेल्वेच्या छतावर बसूनही प्रवास करतात. रेल्वेच्या दारात लटकून प्रवास केल्यामुळे बाहेरच्या खांबाला आपटून मृत्यू झाल्याचे आपण पाहतो. हे सर्व एकूण समाज व्यवस्थेलाच लांछनास्पद ठरावे. ठरावीक वेळी ऑफिसमध्ये पोचणे व काम करून आपल्या संसाराच्या उपजीविकेसाठी पैसे मिळविणे हा प्रत्येकाचा उद्देश असतो, पण जो वेळ कामावर जाण्यासाठी खर्च केला जातो त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. कसे तरी कामावर पोचायचे एवढे एकच लक्ष्य ठेवले तर त्याचा भुर्दंड केव्हा ना केव्हा भोगावा लागतोच. वेळेवर पोचण्यासाठी, गाडी वेळेवर पकडण्यासाठी आलेल्या मानसिक ताणाचाही मेंदूवर परिणाम होतो व पुढे नैराश्याचा त्रास झालेला दिसतो. चाकरमान्यांना होणाऱ्या मुलांमध्ये मेंदूचे दोष असलेले दिसून येतात.
प्रवासाचा विचार करताना वाहनचालकाचाही विचार करणे आवश्यक आहे. तो जरी सीटवर बसून वाहन चालवत असला तरी त्याची आसन व्यवस्था खूप काळजीपूर्वक (नुसती मजबूत नव्हे तर वैद्यकीयदृष्ट्या वाहनचालकाच्या शरीराचा, त्याच्या मेरुंदडाचा विचार करून) केलेली असावी. परदेशात ड्रायव्हर सीट नेहमी अप्रतिम असते कारण तेथे वाहनचालक बहुधा वाहनाचे मालक असतात. बससारख्या सार्वजनिक वाहनांच्या वाहनचालकाची आसन व्यवस्था उत्तम असावी, कारण त्याला सतत व अनेक तास वाहन चालवायचे असते. लांबच्या प्रवासात अध्ये मध्ये २-३ तासांनंतर थोडे थांबून पाय लांब करावेत, खाली उतरून पाच मिनिटे पाय मोकळे करण्यासाठी चालावे दोन्ही तळहातांची बोटे एकमेकांत अडकवून तळहात वर करून आकाशाकडे खेचावेत. अशा प्रकारचा व्यायाम करून गाडी चालवायला सुरुवात करावी. हे सर्व करण्यासाठी पाच मिनिटे गेली तरी एकूण आरोग्याच्या दृष्टीने ते आवश्यक असते.
हे सर्व आरोग्याच्या दृष्टीने करणे गरजेचे असते. वाहनचालकाने अधूनमधून पाणी अवश्य प्यावे. वाहनचालकाच्या डोळ्यावर एकूण सतत ताण असतो. पुढच्या बाजूला असलेल्या इंजिनामुळे वाहनचालकाच्या सभोवताली बऱ्यापैकी गरम वातावरण असते. तेव्हा ज्यांना उपजीविकेचे साधन म्हणून वाहनचालकाचे काम करणे आवश्यक असते किंवा ज्यांना लांब पल्ल्याचा प्रवास करायचा आहे त्या सर्वांनी आसन व्यवस्था, अधूनमधून पाणी पिणे व काही वेळानंतर शरीर मोकळे करून पुन्हा नैसर्गिक संतुलनात आणणे या तीन गोष्टींकडे अवश्य लक्ष ठेवावे.
जीवन हा एक प्रवास आहे. तो करावाच लागणार आहे, तो सुखकर कसा होईल याकडे लक्ष ठेवणे नक्कीच आपल्या हातात आहे.
श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित