मे महिन्यात हिमाचलला फिरायला जाण्याचा प्लॅन करताय तर ‘या’ अनोख्या ठिकाणांना द्या भेट
GH News May 08, 2026 07:11 PM

मे आणि जून महिनाच्या सुरूवातीला अनेकजण त्यांच्या कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. कारण या महिन्यांमध्ये मुलांच्या उन्हाळ्या सुट्ट्या सुरू होतात. गर्मीच्या या कडाक्यापासून आराम मिळावा म्हणून उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बहुतेकजण थंड ठिकाणांचा शोध घेतात. अनेकजण थंड हवेचे ठिकाण असलेल्या हिमाचल आणि उत्तराखंडमधील ठिकाणांना भेट देतात. कारण येथील डोंगराळ भाग आणि तेथील निसर्गाच्या साानिध्यात एकांतात वेळ घालवणे खूप छान वाटते. जेव्हा हिमाचलमध्ये फिरण्याचा विचार येतो, तेव्हा मनाली आणि शिमला ही नावे अनेकदा आठवतात.

पण हिमालयाच्या कुशीत अशी अनेक ठिकाणे आहेत, जी क्वचितच पाहिली जातात. दुर्गम, लहान गावांमध्ये सकाळची सुरुवात वाहतुकीच्या गर्दीने नव्हे, तर पक्ष्यांच्या किलबिलाटाने होते. चला तर मग आजच्या लेखात आपण मे महिन्यात तुम्ही हिमाचल प्रदेशातील कोणत्या अनोख्या ठिकाणांना भेट देऊ शकता ते जाणून घेऊयात.

हिमाचलमधील अनोखे पर्यटन स्थळे

शांगढ, सैंज व्हॅली

हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात वसलेले सैंज खोरे, हिरव्यागार पर्वतांनी वेढलेले एक सुंदर ठिकाण आहे. सैंज खोऱ्यातील शांगढ हे एक शांत ठिकाण असून ते जगापासून दूर एक अद्भुत अनुभव देते. येथील मनमिळाऊ लोकसमुदाय विशेष उल्लेखनीय आहे. सैंज खोऱ्यात वसलेले शांगढ, कुल्लूपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर आहे. शांगढ पाइनच्या जंगलांनी वेढलेले असून, ते आपल्या पारंपरिक हिमाचली घरांसाठी ओळखले जाते.

अगदी कडक उन्हाळ्यातही येथील हवामान सौम्य आणि बहुतेक वेळा आल्हाददायक असते. जवळच्या ठिकाणांमध्ये बारशानगड धबधबा आणि ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क यांचा समावेश आहे. निसर्गप्रेमींसाठी किंवा ज्यांना एकट्याने प्रवास करायला आवडतो, त्यांच्यासाठी शानगड या ठिकणांना भेट देणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकते.

कालगा, पार्वती व्हॅली

हिमाचल प्रदेशातील कसोलला भेट देणारे बहुतेक पर्यटक या थंड हवेच्या ठिकाणाला भेट देऊनच घरी परत जातात. पण तुम्हाला माहित आहे का की कसोलहून कालगा हे ठिकाणं देखील उत्तम आहे. पार्वती खोऱ्यात वसलेले हे शांत आणि सुंदर गाव पाइनच्या जंगलांनी वेढलेले आहे आणि येथील सफरचंदाच्या बागा त्याच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालतात. येथे भेट देण्यासाठी मे महिना सर्वोत्तम आहे. येथील हवामान देखील स्वच्छ असते, ज्यामुळे कॅफेमध्ये बसून या ठिकाणच्या सौंदर्याचा आनंद घेणे सोपे होते. तुम्ही येथून खीरगंगा ट्रेक देखील करू शकता.

बारोट व्हॅली, मंडी

हिमाचलच्या बारोट व्हॅलीमध्ये पोहोचणे थोडे कठीण असू शकते, पण एकदा तुम्ही तिथे पोहोचलात की, तुम्ही सर्व काही विसरून जाता. हे उहल नदीच्या काठावर वसलेले एक सुंदर पर्यटन स्थळ आहे, जे पाइनच्या जंगलांनी वेढलेले आहे. उहल नदी आणि पर्वतांच्या दृश्यांचा आनंद घेण्याव्यतिरिक्त तुम्ही न्रिगु वन्यजीव अभयारण्यालाही भेट देऊ शकता. हे ठिकाण वीकेंडच्या सहलींसाठी एक उत्‍तम आहे. जर तुम्ही धावपळीच्या जीवनापासून दूर, साधेपणा, शांतता आणि निसर्गाच्या सान्निध्यात उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेऊ इच्छित असाल, तर तुम्ही बारोट व्हॅली फिरण्याचा नक्कीच विचार केला पाहिजे.

चितकुल, किन्नौर

हिमाचल प्रदेशातील किन्नौरपासून थोड्याच अंतरावर असलेले चितकुल, त्याच्या नेत्रदीपक दृश्यांमुळे भेट देण्यासारखे एक ठिकाण आहे. हे भारत-तिबेट सीमेजवळ वसलेले एक निसर्गरम्य गाव आहे. जंगलांनी वेढलेले चितकुल, साहसी अनुभव घेण्यासाठी आणि अविस्मरणीय क्षण टिपण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे. मे आणि जूनमध्ये येथील रस्ते खूले होतात. ज्यामुळे तिथे पोहोचणे सोपे होते. तुम्ही जर मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये रोड ट्रिपचा विचार करत असाल, तर किन्नौरजवळ असलेल्या चितकुलचा तुमच्या प्रवासासाठी एक उत्तम पर्याय म्हणून विचार करायला हवा.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.