भारतीय क्रिकेट संघ हा जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. भारताकडे एकापेक्षा एक फलंदाज, वेगवान गोलंदाज तसेच फिरकीपटू आहेत. या खेळाडूंना चांगले प्रशिक्षण देण्यासाठी, त्यांच्यात काही कमतरता असेल तर त्यावर काम करण्यासाठी भारताकडे प्रशिक्षकांचीही मोठी फौज आहे. म्हणूनच भारताचा संघ अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करू शकला आहे. दरम्यान, भारतीय संघाच्या कामगिरीत आणखी सुधावरणा व्हावी यासाठी संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार यंदाचा आयपीएल हंगाम संपताच भारतीय टीमला नवा कोच मिळू शकतो. या कोचचे नाव साईराज बहुतुले असे आहे. बहुतुले हे फिरकीपटूंना प्रशिक्षण देण्यासाठी जगभारात ओळखले जातात. स्पिन बॉलिंगमधील त्यांच्याकडे असणारे ज्ञान आजघडीला कोणत्याही अन्य कोचकडे नाही, असे म्हटले जाते. सध्या बहुतुले हे पंजाब किंग्स या संघाला प्रशिक्षण देत आहेत. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार साईराज बहुतुले हा भारतीय संघात स्पिन गोलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून सामील होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले गौतम गंभीर हेच बहुतुले यांना संघात प्रशिक्षक म्हणून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गौतम गंभीर यांनी बीसीसीआयशी याबाबत चर्चे केली आहे.
साईराज बहुतुले यांनी भारतीय संघाकडून 2 कसोटी सामने खेळलेले आहेत. भारतीय संघाला प्रशिक्षण देणाऱ्या चमुमध्य गौतम गंभीर हे प्रमुख प्रशिकक्ष म्हणून आहेत. त्यानंतर सिंताशू कोटक हे फलंदाजीचे कोच आहेत. मोर्ने मार्केल हे वेगवान गोलंदाजांना प्रशिक्षण देतात. तर टी दिलीप हे क्षेत्ररक्षणासाठी खेळाडूंना प्रशिक्षित करतात. भारताकडे फिरकी गोलंदाजांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक नाही. त्यामुळेच बहुतुले हे लवकरच भारतीय संघात फिरकी गोलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून भारतीय संघात सामील होऊ शकतात. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.