विश्वासू सहकारी ते कट्टर विरोधक! शूभेंदू अधिकारी यांनी अमित शाहांचे पाय पकडताच सगळं बदललं! भाजपची 3 जागांवरून द्विशतकी मजल, ममतांना चॅलेंज करणाऱ्या बंगाली सीएमची कहाणी
जयदीप मेढे May 08, 2026 09:13 PM

Who is Suvendu Adhikari: शूभेंदू अधिकारी पश्चिम बंगालच्या नुतन मुख्यमंत्री असतील. एकेकाळी ममता बॅनर्जींचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे अधिकारी आज भाजपचे राज्यातील प्रमुख चेहरे बनले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (8 मे) कोलकातामध्ये त्यांच्या नावाची घोषणा केली.

शूभेंदू अधिकारी कोण आहेत?

शूभेंदू अधिकारी यांचा जन्म एका राजकीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे देखील राजकारणात सक्रिय होते. शूभेंदू यांनी विद्यार्थी दशेपासूनच राजकारणात रस घेण्यास सुरुवात केली. त्यांनी तृणमूल काँग्रेसला (TMC) उभारी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. विशेषतः पूर्व मिदनापूर जिल्ह्यात त्यांची जबरदस्त पकड आहे. अधिकारी कुटुंबाचा या भागात इतका प्रभाव आहे की, त्यांना तिथले 'अनभिषिक्त राजे' मानले जाते.

राजकीय प्रवासाची सुरुवात आणि नंदीग्राम आंदोलन

शूभेंदू अधिकारी यांचा राजकीय उत्कर्ष 'नंदीग्राम' आंदोलनामुळे झाला. 2007-08 मध्ये जेव्हा ममता बॅनर्जी यांनी टाटा मोटर्सच्या कारखान्याविरोधात आणि जमिनीच्या हक्कासाठी नंदीग्राम आणि सिंगूरमध्ये आंदोलने केली, तेव्हा शूभेंदू अधिकारी आंदोलनाचे मुख्य कणा होते. त्यांनी तळागाळातील लोकांशी संपर्क साधून डाव्या आघाडीच्या सरकारविरोधात वातावरण निर्माण केले. यामुळेच 2011 मध्ये ममता बॅनर्जींना 34 वर्षांची डाव्यांची सत्ता उलथवून लावता आली. अधिकारी यांनी 2016 मध्ये विधानसभा निवडणूक जिंकली आणि ते ममतांच्या मंत्रिमंडळात परिवहन आणि सिंचन मंत्री झाले.

ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी यांच्यात वादाची कारणे

एकेकाळी 'दीदी' आणि शूभेंदू यांचे नाते माय-लेकासारखे मानले जात होते, पण सत्तेच्या समीकरणामुळे त्यात दुरावा आला. या वादाचे मुख्य कारण म्हणजे ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांचा पक्षात वाढता प्रभाव. शूभेंदू अधिकारी यांना असे वाटू लागले की, ज्या पक्षासाठी त्यांनी रक्ताचे पाणी केले, तिथे आता अभिषेक बॅनर्जींना महत्त्व दिले जात आहे आणि त्यांना बाजूला सारले जात आहे. संघटनात्मक निर्णय घेताना शूभेंदू यांना विश्वासात घेतले जात नसल्याने त्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला. पक्षात आपली प्रतिष्ठा आणि वजन कमी होत असल्याचे पाहून त्यांनी बंडाचे निशाण फडकवले.

भाजपच्या जवळ कसे गेले?

2020 च्या उत्तरार्धात सुवेंदू अधिकारी यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. 19 डिसेंबर 2020 रोजी मेदिनीपूरचे मैदान खचाखच भरले होते. गृहमंत्री अमित शाह यांनी शूभेंदू यांच्या गळ्यात भाजपचा गमछा घातला. दोघांनी मिळून भाजपचा झेंडा फडकवला. शूभेंदू यांनी वाकून शाह यांच्या पाया पडत बंगालच्या विजयासाठी भाजपचे सारथी बनले. केवळ तीन जागांवर असलेल्या भाजपने 2021 च्या निवडणुकीत 77 जागा मिळवल्या आणि 2026 मध्ये 207 जागांसह पूर्ण बहुमत मिळवले. आता, निरीक्षक म्हणून बंगालमध्ये आलेल्या अमित शाह यांनी सुवेंदू यांना मुख्यमंत्री बनवण्यात येईल, अशी घोषणा केली आहे.

ममता बॅनर्जी यांना थेट आव्हान दिले

त्यांनी केवळ स्वतःच पक्षांतर केले नाही, तर तृणमूलचे अनेक नेते आणि कार्यकर्तेही आपल्यासोबत भाजपमध्ये नेले. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी ममता बॅनर्जी यांना थेट आव्हान दिले. त्यांनी ममतांना त्यांच्या पारंपारिक जागेवरून (भवानीपूर) नंदीग्राममध्ये येऊन लढण्याचे आव्हान दिले. ही लढत प्रतिष्ठेची झाली आणि सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींचा पराभव करून इतिहास घडवला. जरी भाजपने राज्यात सत्ता मिळवली नाही, तरी शूभेंदू अधिकारी यांनी स्वतःचा प्रभाव सिद्ध केला आणि ते विधानसभेत विरोधी पक्षनेते बनले. शूभेंदू अधिकारी यांचा प्रवास हा एका निष्ठावान कार्यकर्त्याकडून प्रबळ विरोधकापर्यंतचा आहे. बंगालच्या राजकारणात 'काँटा' म्हणून ओळखले जाणारे अधिकारी आजही ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यासाठी मोठे राजकीय आव्हान असेल. 

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.