टीम इंडियाच्या फिरकीला धार येणार! महाराष्ट्राच्या सुपुत्राची पुरुष संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती
Marathi May 08, 2026 09:25 PM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानी पुरुष क्रिकेट संघाच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी माजी लेग-स्पिनर साईराज बहुतुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बहुतुले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. बहुतुले यांचा कार्यकाळ पुढील दोन वर्षांसाठी असेल आणि जूनमध्ये होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या घरच्या मालिकेपासून ते आपला पदभार स्वीकारतील.

साईराज बहुतुले सध्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्सचे फिरकी प्रशिक्षक म्हणून कार्यरत असून IPL 2026 नंतर ते ही जबाबदारी सोडतील. बहुतुले यांनी हिंदुस्थानसाठी 2 कसोटी आणि 8 एकदिवसीय सामने खेळले आहेत. मात्र, त्यांची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरी अत्यंत चमकदार राहिली असून त्यांनी 188 सामन्यांत 630 विकेट्स घेतले आहेत आणि 6,176 धावा केल्या आहेत.

यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) तीन वर्षांहून अधिक काळ फिरकी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. तसेच राजस्थान रॉयल्ससह बंगाल, विदर्भ, केरळ आणि गुजरात यांसारख्या देशांतर्गत संघांना प्रशिक्षण देण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे. आता ते सितांशु कोटक (फलंदाजी), मॉर्ने मॉर्केल (वेगवान गोलंदाजी), टी. दिलीप (क्षेत्ररक्षण) आणि रायन टेन डोशेटे (सहायक प्रशिक्षक) यांच्यासोबत टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये सामील होतील.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.