Nagin Disease: उन्हाळ्यात ‘नागीण’चा वाढता धोका; अशी घ्या काळजी
Marathi May 09, 2026 06:25 AM

उन्हाळ्यात वाढते तापमान, घाम आणि शरीरातील उष्णता यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या डोके वर काढतात. उष्माघात, डिहायड्रेशन यांसोबतच या काळात ‘नागीण’ किंवा ‘शिंगल्स’ या वेदनादायी आजाराचाही धोका वाढतो. सुरुवातीला साधी पुरळ किंवा त्वचेचा त्रास वाटणारा हा आजार प्रत्यक्षात नसांशी संबंधित असून त्यामध्ये तीव्र वेदना जाणवू शकतात. योग्य वेळी उपचार घेतल्यास हा आजार नियंत्रणात येऊ शकतो, मात्र दुर्लक्ष केल्यास दीर्घकालीन वेदना आणि गंभीर गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते. (nagin disease shingles symptoms treatment)

काय आहे ‘नागीण’ आजार?
नागीण या आजाराला वैद्यकीय भाषेत हर्पिस झॉस्टर (Herpes Zoster) असे म्हटले जाते. हा आजार व्हेरीसेला झॉस्टर या विषाणूमुळे होतो. हाच विषाणू कांजण्या (Chickenpox) होण्यास कारणीभूत असतो. ज्यांना लहानपणी कांजण्या झालेल्या असतात, त्यांच्या शरीरातील हा विषाणू पूर्णपणे नष्ट होत नाही. तो नसांच्या मुळाशी सुप्त अवस्थेत राहतो आणि अनेक वर्षांनंतर शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्यास पुन्हा सक्रिय होतो. त्यातूनच नागीणचा त्रास सुरू होतो.

कोणाला असतो जास्त धोका?
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हा आजार विशेषतः पन्नाशीपुढील व्यक्तींमध्ये अधिक आढळतो. तसेच मधुमेह, रक्तदाब, दीर्घकालीन आजार किंवा कमी प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींमध्येही नागीण होण्याची शक्यता जास्त असते. हा आजार शरीराच्या कोणत्याही भागावर होऊ शकतो. विशेषतः पोट, पाठ, कंबर, मान किंवा डोळ्यांच्या आसपास पुरळ आणि वेदना दिसून येतात.

समाजातील गैरसमज आणि वास्तव
नागीणविषयी समाजात अनेक गैरसमज आजही पाहायला मिळतात. “नागीणीचा विळखा पूर्ण झाला की जीवाला धोका असतो” किंवा “हा आजार फक्त तंत्र-मंत्रानेच बरा होतो” अशा समजुती अनेक ठिकाणी आहेत. मात्र तज्ज्ञांच्या मते, हे सर्व गैरसमज आहेत. नागीण हा वैद्यकीय उपचारांनी पूर्णपणे नियंत्रणात येणारा आजार आहे. त्यामुळे भीती न बाळगता योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

नागीणची प्रमुख लक्षणे:
– सुरुवातीला शरीराच्या एका भागात तीव्र वेदना किंवा जळजळ जाणवणे.
– ताप, अंगदुखी, थकवा आणि डोकेदुखी.
– त्वचा लालसर होणे.
– बारीक पाण्याचे फोड किंवा लाल पुरळ दिसणे.
– पुरळांचा पुंजका तयार होणे.
– काही रुग्णांमध्ये असह्य जळजळ आणि नसांमध्ये वेदना जाणवणे.

आहार कसा असावा?
नागीणच्या रुग्णांनी हलका आणि पचायला सोपा आहार घ्यावा. उपयुक्त पदार्थ: गायीचे दूध आणि तूप, डाळिंब, सफरचंद, काळ्या मनुका, ज्वारी, नाचणी आणि तांदळाची भाकरी, मूग डाळीचा समावेश

काय टाळावे?
या काळात काही पदार्थ टाळणे फायदेशीर ठरते. जसे की मांसाहार, चहा आणि कॉफी, दही, केळी आणि पपई, लोणचे आणि आंबवलेले पदार्थ, पापड आणि तेलकट पदार्थ

वेळीच उपचार घेणे का महत्त्वाचे?
नागीणचा त्रास दुर्लक्षित केल्यास नसांमध्ये दीर्घकालीन वेदना राहू शकतात. विशेषतः डोळ्यांजवळ नागीण झाल्यास दृष्टीवर परिणाम होण्याचाही धोका असतो. त्यामुळे त्वचेवर अचानक वेदनादायी पुरळ दिसल्यास स्वतःहून उपचार करण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.