डॉ. मृदुला आपटे, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट
अनिंदिता ही नुकतंच सोळावं सरलेली आनंदी, उत्साही आणि ऊर्जेनं भरलेली मुलगी होती. पण तिची एकच समस्या होती, ती म्हणजे आपण इतर मुलामुलींपेक्षा वेगळे आहोत असं तिला वाटायचं. समुपदेशक असलेल्या ऋताकडे अनिंदिता आली तेव्हा ती पूर्णपणे गोंधळलेली आणि अस्वस्थ दिसत होती. ती ऋताला सांगत होती, ‘‘मला कोणतीच गोष्ट व्यवस्थित करता येत नाही.’’ ऋतानं तिला पाणी दिलं आणि शांत केलं. मग अनिंदिताकडून ‘रिलॅक्सेशन’चा व्यायाम करवला. थोड्या वेळाने अनिंदिता शांतपणे बोलू लागली.
अनिंदिताने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती आणि ती निकालाची वाट पाहत होती. अभ्यासात ती नेहमीच सरासरीपेक्षा खाली असायची. तरी तिला वाटायचं की तिला सगळं व्यवस्थित समजतंय. काही जणांना ती हुशार वाटायची, पण का कुणास ठाऊक- तिला परिक्षेत गुण कधी चांगले पडत नसत.
शाळेत एकाग्रता होत नाही, लक्ष केंद्रित करता येत नाही, अशी तक्रार अनिंदिता करायची. ती खूप प्रयत्न करायची, पण एका जागी बसून अभ्यास करणं तिला जमायचं नाही. ती अतिशय उतावीळ होती. बऱ्याचदा ती असं काही तरी बोलायची किंवा वागायची, ज्यामुळे नंतर तिच्यावर पश्चात्तापाची पाळी यायची. तिच्या अशा वागण्याचा प्रसाद खुद्द तिच्या मित्रमैत्रिणींनाही मिळाला होता! मनानं अनिंदिता चांगली होती. खूप मदत करणारी आणि प्रेमळ होती. पण बऱ्याचदा लोकांना ती ‘आगाऊ’ वाटायची.
ऋतानं अनिंदिताच्या आईशी बोलून तिच्या बालपणीचीही माहिती घेतली. आईने सांगितले, की अनिंदिता लहानपणापासूनच ‘अतिसक्रिय’ (ओव्हरअॅक्टिव्ह) होती. ती एका जागी जास्त वेळ बसतच नसे. वर्गातही सतत इकडे-तिकडे फिरत किंवा धावत असे. तिचा गृहपाठ खूपदा अपूर्णच असायचा. परीक्षेतही ती पूर्ण वेळ बसू शकत नसे. शिक्षक तक्रार करायचे की ती वर्गात खूप जास्त बोलते आणि मुलामुलींशी वारंवार भांडते. वाढत्या वयासह तिची अस्वस्थता आणि बेचैनी कमी न होता कायम राहिली.
ऋताला संशय आला की, अनिंदिताला कदाचित ‘एडीएचडी’ (अटेन्शन डेफिसिट हायपरॲक्टिव्हिटी डिसॉर्डर) असावी. तिने याची खात्री करण्यासाठी अनेक चाचण्या केल्या. शाळेनी दिलेले अहवाल (रिपोर्ट कार्ड) तपासले. अनिंदिताच्या वडिलांशी आणि शिक्षकांशीही बोलली. सर्व माहिती गोळा केल्यानंतर ऋताला खात्री पटली की अनिंदिताला एडीएचडी आहे.
काय असते ‘एडीएचडी’?
सोप्या शब्दांत सांगायचं झालं, तर ‘एडीएचडी’ ही मेंदूच्या विकासाशी संबंधित एक समस्या आहे. सुमारे ७ ते ८ टक्के किंवा त्याहून अधिक मुलांना ही समस्या असते. यात मुख्य लक्षणं म्हणजे एकाग्रता कमी होणं, अतिसक्रियता (हायपरॅक्टिव्हिटी) आणि आवेग (इम्पल्सिव्हिटी). काही मुलं जास्त धावपळ करणारी असतात, तर काही मुलं जास्त स्वप्नाळू आणि भान हरपणारी असतात. पण एडीएचडी असलेली सर्वच मुलं सतत धावत असतात किंवा बेचैन असतात असं नाही.
ऋतानं अनिंदिता आणि तिच्या आई-वडिलांना एडीएचडीविषयी सविस्तर समजावून सांगितलं. तिनं सांगितलं, की एडीएचडी असलेल्या मुलांना अनेकदा खोडकर किंवा बेशिस्त समजलं जातं. ती लक्ष देत नाहीत म्हणून त्यांना शिक्षा केली जाते. पण ही खरं तर एक वैद्यकीय समस्या आहे. एडीएचडी पूर्णपणे बरी होत नाही. ती एक आजीवन राहणारी स्थिती आहे. पण औषधोपचार, समुपदेशन आणि इतर उपायांनी त्यावर नियंत्रण ठेवता येतं. यामुळे एडीएचडी असलेले लोकही पूर्णपणे सार्थक आणि यशस्वी आयुष्य जगू शकतात. काही शैक्षणिक मंडळांकडून त्यांना विशेष सवलतीही मिळू शकतात- उदा. परीक्षेसाठी जास्त वेळ.
अनिंदिताच्या आई-वडिलांना आणि शिक्षकांना एडीएचडीची माहिती नव्हती, म्हणून या गोष्टीचं निदान उशिरा झालं. लवकर निदान झालं असतं तर त्यांनी तीच चुकीची आहे असा समज करून घेतला नसता. तिला योग्य प्रकारे मदत केली असती.
एडीएचडी असलेले अनेकजण आपल्या समस्या सर्जनशील रीतीने हाताळतात आणि मोठं यशही मिळवतात. पण त्याकडे दुर्लक्ष केलं तर या व्यक्तींना सामाजिक आणि मानसिक अडचणी येऊ शकतात- (उदा. वाईट संगत, व्यसन, नैराश्य इत्यादी.)
ऋतानं अनिंदिताबरोबर सविस्तर चर्चा केली. तिच्या मनात काय आहे ते जाणून घेतलं. तिला काही उपाय शिकवले. ही मानसिक समस्या लक्षात घेऊन अभ्यास करण्याची पद्धत कशी बदलावी हेही ऋताने तिला शिकवलं. अनिंदिता आणि तिच्या आई-वडिलांना प्रचंड दिलासा वाटत होता. तिची नेमकी समस्या काय आहे हे त्यांना आता समजलं होतं. अनिंदिता मुद्दाम, जाणूनबुजून त्यांना त्रास देत नव्हती, हे लक्षात आल्यामुळे सगळे तिच्या अडचणींना सामोरं जाण्यासाठी समजूतदारपणे आणि प्रेमाने मदत करण्यास तयार झाले.
मेंदू-मनाशी संबंधित काही समस्या, त्यांची विशेष माहिती नसल्यामुळे लहानपणापासून दुर्लक्षित राहतात. ‘एडीएचडी’ ही त्यातली एक. पण उशिरा लक्षात आल्यावरही त्यातून मार्ग काढता येतो.