काय करूनी तीर्थाटणे ।
मन भरीले अवगुणे ॥१॥
काय करावे ते तप ।
चित्ती नाही अनुताप ॥ २॥
मन:संकल्पाची पापे ।
न जाती तीर्थाचेनि बापे ॥३॥
नामा म्हणे सोपे ।
पाप जाय अनुतापे ॥४॥
संत नामदेव महाराज
तीर्थाटन ही भारतीय अध्यात्म परंपरेतील पवित्र संकल्पना आहे. परंतु नामदेव महाराज पहिल्याच चरणात प्रश्न विचारतात, की मन अवगुणांनी भरलेले असेल, तर तीर्थयात्रेचा उपयोग काय? आपण आज अनेकदा धार्मिक पर्यटन करतो, देवदर्शन करतो, पवित्र स्नान करतो; परंतु परतल्यानंतर आपल्या स्वभावात काय बदल होतो, हा प्रश्न मात्र विचारत नाही. राग, मत्सर, दोषदृष्टी, अहंकार, स्पर्धा आणि कटुता हे सर्व जसेच्या तसे मनात राहतात. अशा वेळी तीर्थाटन हा शरीराचा प्रवास ठरतो; मनाचा नाही. धर्माचा अनुभव पर्यटनात बदलतो, परंतु परिवर्तनात बदलत नाही. मळकं मन घेऊन केलेल्या धार्मिक कृती हे अवडंबर आहे. अवगुण सोडून सद्गुणांकडे केलेला प्रवास ही खरी तीर्थयात्रा आहे.
आपल्या धार्मिक कष्टांच्या प्रेरणा आपण तपासून पहायला हव्यात. आपली त्यामागची भूमिका योग्य असेल तरच त्याचे पुण्यात रूपांतर होईल. तप म्हणजे उपवास, नियम, जप, मौन किंवा शारीरिक संयम एवढ्यापुरते मर्यादित नाही. स्वतःच्या चुका स्वतःशी प्रामाणिकपणे कबूल केल्या नाहीत तर कोणतेही तप केवळ बाह्य श्रम ठरतात. आजच्या काळातही आपण स्वतःला सुधारण्यासाठी अनेक बाह्य प्रयत्न करतो; मात्र स्वतःशी कठोर प्रामाणिक होण्याचे धाडस कमी पडते. आपल्याला शिस्त हवी असते, परंतु पश्चात्ताप नको असतो; आपल्याला प्रतिमा हवी असते, मात्र अंतर्मुखता नको असते.
पाप हे केवळ कृतीत नसते; ते मनाच्या संकल्पातही असते. बाहेरून आपण सज्जन दिसू शकतो, परंतु मनात लोभ, सूड, वासना, दंभ किंवा इतरांविषयीचा हेवा सतत वाढत असतो. ही अंतर्मनातील अस्वच्छता कोणत्याही पवित्र स्नानाने धुतली जात नाही. आजच्या भाषेत सांगायचे तर, आपण सार्वजनिक प्रतिमा स्वच्छ ठेवण्यात कुशल झालो आहोत; तथापि अंतःकरण स्वच्छ करण्यासाठी आवश्यक प्रामाणिकता हरवली आहे. समाजमाध्यमांवर आध्यात्मिक विचार मांडणे सोपे आहे, पण एकांतात स्वतःच्या दोषांसमोर उभे राहणे कठीण आहे. एखादी व्यक्ती मोठ्या भक्तिभावाने यात्रेला जाते, देवदर्शनाचे छायाचित्र सर्वत्र प्रसारित करते; पण त्याच दिवशी घरी परतल्यावर क्षुल्लक कारणावरून घरच्यांवर संतापते. याचा अर्थ धार्मिक कृती झाली, परंतु अंतर्मनाला स्पर्श झाला नाही. ही विसंगती पाप जन्माला घालते.
पाण्याचे रूपांतर तीर्थात व्हायचे असेल, कष्टाचे रूपांतर तपात व्हायचे असेल, तर अवगुण जाऊन अनुताप उदयाला आला पाहिजे. पूर्वी घडलेल्या चुकांची जाणीव होऊन सुधारण्याकडे प्रवृत्त होणे म्हणजे अनुताप. जेव्हा माणूस स्वतःचे दोष स्वीकारतो, तेव्हाच परिवर्तनाची प्रक्रिया सुरू होते.
शेवटी, हा अभंग आपल्याला एक आरसा दाखवतो. आपण धार्मिक आहोत की केवळ धार्मिक दिसत आहोत? आपण यात्रेला जातो, परंतु स्वतःकडे परत येतो का? या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर शोधणे हाच खऱ्या अध्यात्माचा पहिला टप्पा आहे.