हौस ऑफ बांबू : नायक नहींऽऽ, खलनायक है वो..?
esakal May 09, 2026 10:45 AM

कु. सरोज चंदनवाले

नमस्कार! खूप दिवसांनी गाठभेट होतेय, कारण काही दिवस डोम्बिवलीला गेले होत्ये. डोम्बिवली ही महाराष्ट्राची तिसरी ऑफिशियल सांस्कृतिक राजधानी आहे. (पुणे, विले पार्ले, आणि डोम्बिवली! यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, सांगली, कोल्हापूर, अहल्यानगर समाविष्ट आहे. त्यावरून उगीच मारामाऱ्या नकोत!) मी डोम्बिवलीत असताना पडद्यामागे प्रचंड साहित्यिक घडामोडी घडत होत्या. निमित्त होतं, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या डोम्बिवली शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीचं. पुण्यात जे झालं, तसंच काहीसं डोम्बिवलीतही घडलंय...कसं? ते ऐका!

परवा मी डोम्बिवलीच्या फडके रोडवर चालल्ये होत्ये. मॉडर्न कॅफेत बऱ्याच दिवसांत इडली खाल्ली नाही, असा विचार करून तिथं वळले. कोपऱ्यातल्या टेबलावर ‘मसाप’च्या त्रैमासिक पत्रिकेचे संपादक आणि डों. शाखेचे कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे बसले होते. पुढ्यात कागदाचा ताव, हातात पेन आणि चहाचा कोप!! नजरेत संताप!! मी टेबलाशी जाऊन जुळले...

‘‘उठा...इथं बसू नका! उठा म्हणतो ना!,’’ चहाचा कोप टेबलावर आदळत त्यांनी फर्मावलंन.

‘‘काय लिहिताय? एक इडली...डीप करून आणा हं, तुम्ही काय घेणार?,’’ मी. इडलीची आर्डर वेटरसाठी होती.

‘‘घेणार नाही, देणार!...राजीनामा देणार!,’’ देशपांडेगुर्जी ओरडले. मी थक्क झाल्ये. ‘मसाप’तली प्रा. मिलिंद जोशींची (विनोद कुलकर्णी इन्क्लुडेड...एकावर एक फ्री!) राजवट उलथून नवी कार्यकारिणी येऊन जेमतेम महिना उलटला, तेवढ्यात एक विकेट पडलीसुद्धा? काय हे?

‘मसाप’चे नवेकोरे अध्यक्ष योगेश सोमणमास्तरांनी डोम्बिवली शाखेच्या निवडणुकीत अकारण ढवळाढवळ केली, नवे पैपाहुणे गोळा करून जुन्याजाणत्यांचे पतंग काटले. ‘एकीकडे तडजोड करू’ असं सांगून दुसरीकडे ऑनलाइन बैठकांचा सपाटा लावून नवाच खेळ आरंभला. ‘योगेश सोमण यांच्या समर्थनार्थ’ पॅनल उभे करून डोम्बिवलीकरांची मने कलुषित केली, आणि पस्तीस-चाळीस वर्षांत प्रथमच मनभेद झाले, असा देशपांडेमजकुरांचा आरोप आहे. सोमणमास्तरांच्या या ‘पोलिटिकल’ डावपेचांना वैतागून कार्याध्यक्ष देशपांडे यांनी धाडकन राजीनामाच लिहून पाठवला. राजीनाम्यात त्यांनी सोमणमास्तरांवर जोरदार हल्ला चढवलाय. ते म्हणतात, ‘‘...‘मी अभिनेता आहे म्हणून माझा आवाज चढतो’, असे तुम्ही मला म्हणाला होतात. तुम्ही नायकाची भूमिका करत होता की खलनायकाची? असा प्रश्न मला पडला आहे...’’

नायक नहीं, खल नायक है वो...जुल्मी बडा दुखदायक है वो...हे उपऱ्यांच्या भाषेतलं गाणं मला आठवलं! असो. सोमणगुर्जींचं हे नेहमी असं होतं. जातील तिथं वाद. नाट्यपरिषदेतही त्यांचं धड कुणाशी जमलं नाही, असं विंगेतले काही लोक सांगतात. सोमण म्हणजे मणमण वाद, असं समीकरण होऊ नये, म्हंजे मिळवलीन! मध्यंतरी याच सोमणमास्तरांनी नाशकात सार्वजनिक वाचनालयाच्या सोहळ्यात बोलताना म्हटलं होतं की ‘मसापच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्याआधीच राजीनामा लिहून योग्य व्यक्तीकडे सोपवून आलोय!’’ ही ‘योग्य व्यक्ती’ कोण? याचा शोध घेण्याचं काम माझ्या मागे लागलं. याचा अर्थ देशपांडेजींचा राजीनामा दुसऱ्या क्रमांकाचा. पहिला नंबर खुद्द सोमणमास्तरांचाच की!!

‘‘ही योग्य व्यक्ती कोण असेल हो पांडेजी?’’ सांबारातली इडली हुडकत मी तंद्रीतच विचारलं.

‘‘द्या टाळी!’’ असं म्हणून देशपांडेजी चक्क हसले. नुसते हसले नाहीत, इडली-चहाचं बिल माझ्याकडेच द्या, असंही त्यांनी वेटरला फर्मावलं.

‘‘आता पुढे काय करणार?,’’ मी विचारलं. ‘‘ आंबे खाणार, आंबे!’’ असं म्हणून बडिशेप उचलून ते निघून गेलेसुद्धा!

...डोम्बिवलीहून निघून तातडीने पुण्याला आलेय. ‘४८६, सदाशिव पेठ, पुणे’ या पत्त्यावर देशपांडेजींचा राजीनामा पोचलाय का, याची चौकशी करायला हवी आहे. मसापची निवडणूक अजून किती काळ गाजत राहणार, कुणास ठाऊक.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.