Satara Road Accident : सातारा जिल्ह्यातील कामथी तर्फ परळी गावच्या हद्दीत शुक्रवारी रात्री भीषण टेम्पो अपघात होऊन चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये मायलेकींसह दोघांचा समावेश असून, काही जण जखमी झाले आहेत. दोन लहान मुले रात्री उशिरापर्यंत बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मालन सीताराम अडागळे (वय ६०), लिलाबाई उत्तम अडागळे (रा. कामथी, परळी), कल्पना सागर आवळे (वय ३५, रा. सुरूर-कवठे, ता. वाई) आणि गार्गी सागर आवळे (वय ६, रा. कवठे, ता. वाई) अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कामथी (परळी) येथील एका कुटुंबाचे पुनर्वसन निमसोड (ता. खटाव) येथे झाले आहे. नव्याने बांधलेल्या घरात राहण्यासाठी हे कुटुंब घरातील साहित्य हलवत होते. त्यासाठी त्यांनी टेम्पो ठरवला होता. रात्री घरातील सामान टेम्पोत भरल्यानंतर चार म्हशीदेखील टेम्पोत चढवण्यात आल्या होत्या.
दरम्यान, टेम्पो उतारावर उभा असताना चालक केबिनमधील साहित्य टपावर ठेवत होता. त्याचवेळी टेम्पोच्या हौद्यातील जनावरांनी हालचाल केल्याने वाहन अचानक पुढे सरकले. उतारामुळे वेग वाढत टेम्पो रस्त्याकडील खड्ड्यात जाऊन उलटला. या दुर्घटनेत जनावरे व सामानाच्या ओझ्याखाली टेम्पोतील प्रवासी दबले गेले.
Satara Crime: साताऱ्यात संतापजनक प्रकार! तरुणीला अंधाऱ्या रस्त्याकडे ओढून नेण्याचा प्रयत्न, आक्रोश ऐकताच नागरिक धावले अन्..घटनेची माहिती मिळताच सातारातालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुंधती कदम, पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्यासह पोलीस व वैद्यकीय पथक रुग्णालयात दाखल झाले होते.
दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. कुटुंबातील दोन लहान मुले रात्री उशिरापर्यंत बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरू होता.