Thalapathy Vijay TVK: 116, 117, 118…मध्यरात्री तामिळनाडूत सापसिडीचा खेळ… थलपती विजयला कोणी दिला चकमा?
Tv9 Marathi May 09, 2026 12:45 PM

Thalapathy Vijay Tamil Nadu Government Formation News: तामिळनाडूमध्ये तासागणिक राजकीय धक्के बसत आहेत. नाट्यमय घडामोडी घडत आहेत. थलपतीकडे बहुमताचा आकाडा येतो आणि त्याला हुलकावणी देतो. या तळ्यात मळ्यात त्याची दमछाक होत असल्याचे दिसते. या घडामोडीतून त्याला राजकीय धडे मिळत आहेत. पण अजूनही थलपती विजयच्या TVK पक्षाला मॅजिक फिगर गाठता आलेला नाही. 234 सदस्य असलेल्या विधानसभेत त्याला बहुमत अद्यापही गवसले नाही. राजभवनात जाऊन त्याने राज्यपालांची भेट घेतली. पण बहुमताचा सोपान सर करता न आल्याने शपथविधी टळला.

रात्रभर सापसिडीचा खेळ

तामिळनाडूत सत्ता स्थापनेचा सस्पेंस वाढला आहे. शुक्रवारी रात्रभर सापसिडीचा खेळ सुरू होता. कधी टीव्हीकेने मॅजिक फिगर गाठल्याचे दिसत होते. तर दुसऱ्याच क्षणी पाठिंबा देणारे पत्र खोटे असल्याचा दावा समोर येत होता. परंपरागत विरोधक DMK-AIDMK यांच्यात आघाडी होण्याचा धक्का बसत होता. तर कधी काँग्रेस, भाजप या राष्ट्रीय पक्षांना दूर ठेवत प्रादेशिक पक्षच आघाडी घेणार असे वाटत होते. तर आज थलपती विजय हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेईल असे वाटत होते. रात्री तशा जोरदार घडामोडी घडल्या. पण पुन्हा ट्विस्ट आला. राज्यपाल थलपती आर्लेकर यांनी विजय याला सत्ता स्थापनेसाठी अधिकृत निमंत्रण धाडलेच नाही.

116, 117, 118: विजय तर अजून खूप दूर

टीव्हीके पक्षाचा संस्थापक आणि सुपरस्टार विजय याच्याकडे 118 आमदारांच्या बहुमताचा आकडा असल्याचा दावा करण्यात आला. पण अवघ्या काही तासात चक्र फिरली आणि मॅजिक फिगर गाठण्यासाठी त्याला अजून दोन जागा कमी पडत असल्याचे समोर आले. IUML ने थलपती विजय याला पाठिंबा देण्यास रात्री नकार कळवला. व्हीएसके पक्षाने त्यांचा निर्णय लांबणीवर टाकला. त्यामुळे विजय थलपती होणार का? हे आताच सांगता येत नाही. अवघ्या दहा जागांसाठी त्याला मोठी कसरत करावी लागत आहे.

दोन जागांसाठी पेच कायम

थलपती विजय याला सत्ता स्थापनेसाठी अजून दोन जागांची गरज आहे. डीएमके आघाडीतून काँग्रेस बाहेर पडली आणि त्यांच्या पाच आमदारांनी विजय यांना समर्थन दिले आहे. सीपीआय आणि सीपीआय एम या पक्षाच्या दोन दोन आमदारांनी विनाशर्त बाहेरून पाठिंबा दिला आहे. तर आययुएमएल पक्षाने डीएमके आघाडीसोबत राहण्याचा फैसला केला. त्यामुळे टीव्हीकेचा बहुमताचा आकडा कधी 116 तर कधी 118 असा झोका घेत आहे. अजूनही सत्ता स्थापनेसाठी टीव्हीकेला दोन जागांची गरज आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.