मन-निर्मळ : 'माझं नशीबच खराब...'
esakal May 09, 2026 08:45 AM

डॉ. सुवर्णा बोबडे, समुपदेशक व मानसशास्त्रज्ञ

‘‘मॅडम, खरं सांगायचं तर माझं नशीबच खराब आहे.’’ समोर बसलेली तरुणी खात्रीने बोलत होती.

‘‘सगळे पुढे जातायत. कुणाला चांगली नोकरी, कुणाला संधी... माझ्याबाबतीत मात्र काहीच होत नाही. कितीही केलं तरी शेवटी अपयश माझ्याच वाट्याला येतं.

मी विचारलं, ‘‘तू ‘कितीही केलं’ म्हणतेस, त्यात नेमकं काय केलं आहेस?’’

ती थोडी थांबली. ‘‘मी नोकरीसाठी अर्ज करते, पण मुलाखतीसाठी बोलावणे येत नाही. मग मुलाखतीपूर्वीच वाटतं की माझी निवड नाही होणार.’’

‘‘मग त्याचा पुढच्या अर्ज करण्यावर आणि तयारीवर परिणाम होतो का?’’

ती शांतपणे म्हणाली, ‘‘मन लागत नाही, कारण वाटतं की काही उपयोग नाही.’’

इथे एक महत्त्वाची गोष्ट दिसते- ‘मी अनलकी आहे’ हा विचार फक्त एक वाक्य राहत नाही; ती निर्णय घेण्याची पद्धत होते. हळूहळू तो इतका आत बसतो, की आपल्याला तो विचार नसून वास्तव वाटू लागते. पण या विचाराचा अजून एक थर आहे आणि तो आपल्याला सांत्वनही देतो. ‘माझं नशीबच खराब आहे’ असं म्हणणं सोपं वाटतं, कारण मग स्वतःकडे कठोरपणे पाहावं लागत नाही. मी कुठे कमी पडतोय? मी काय बदलू शकतो? हे प्रश्न टाळता येतात. रूढ शब्दप्रयोगात सांगायचं तर- हा विचार ‘सटल कोपिंग मेकॅनिझम’ (भावनिक स्थितीचा सामना करण्याची यंत्रणा) बनतो.

मग आपण प्रत्येक गोष्टीकडे त्याच चष्म्यातून पाहू लागतो. कुणी यशस्वी झाला तर, ‘त्याचं नशीब चांगलं.’ आपण अडकलो तर, ‘माझं नशीब खराब.’ हळूहळू अजून एक वाक्य त्यात मिसळतं, ‘जे नशिबात आहे तेच होतं.’

हे वाक्य शांत वाटतं, पण त्यात एक धोका असतो. तो एक ‘प्रारब्धवादी’ (फेटलिस्टिक) दृष्टिकोन आहे. ध्येयाकडे नेणाऱ्या कृतींपासून तो आपल्याला दूर नेतो. जर सगळं आधीच ठरलेलं आहे, तर प्रयत्न कशासाठी? मग कृतीत सुधारणा नाही, प्रतिबंधक कृती नाही, चुका सुधारण्याचा प्रयत्नही नाही. आपण ‘सेफ’ खेळू लागतो! नवीन संधींकडे जाण्याऐवजी मागे हटतो. आणि मग काहीच बदलत नाही तेव्हा आपला जुना विश्वास अजून मजबूत होतो- ‘पाहिलंत ना, माझं नशीबच खराब आहे!’

दुष्टचक्र

हे दुष्टचक्र मोठं नैराश्य निर्माण करेलच असं नाही, पण सततची एक प्रकारची नाराजी निर्माण करतं. ‘मी कुठे तरी चुकते आहे, पण नेमकं काय ते कळत नाही,’ अशी अवस्था तयार होते. हळूहळू ‘मी अनलकी आहे’ हे वाक्य ‘मी असाच आहे’ मध्ये बदलतं.

आता आधीच्या गोष्टीकडे परत येऊ. ‘माझं नशीबच खराब आहे’ म्हणणाऱ्या ‘ती’ला मी समुपदेशन सत्रात विचारलं, ‘‘जर ‘नशीब’ हा घटक थोडा वेळ बाजूला ठेवला, तर तू वेगळं काय करशील?’’

ती विचार करून म्हणाली, ‘‘कदाचित मी जास्त तयारी करेन... जास्त संधी शोधेन. कदाचित मी आधीच हार मानणार नाही.’’ हा ‘कदाचित’ बदलाचा पहिला टप्पा असतो!

आयुष्यात काही गोष्टी आपल्या हातात नसतातच. नोकरीचंच उदाहरण घ्या- बाजाराची परिस्थिती, जागतिक बदल, एकाच प्रकारचं शिक्षण घेणाऱ्यांची वाढलेली संख्या आणि त्यामानाने नोकरीच्या संधी न वाढणं... ही सगळी कारणं खरी आहेत. पण प्रश्न इथे थांबत नाही. त्या सगळ्यांत आपण स्वतःला कोणत्या शब्दांत संबोधतो, हे अधिक महत्त्वाचं ठरतं. ‘माझं नशीबच खराब आहे’ हे वाक्य फक्त परिस्थितीचं वर्णन करत नाही; ते प्रयत्न करण्याची उर्मी कमी करतं. कारण जर मी आधीच ‘कमनशिबी’ आहे, तर प्रयत्न करून काय होणार? मग तयारी अर्धवट राहते. संधी दिसल्या तरी आपण पुढे सरकत नाही आणि हळूहळू... आपण लढण्याआधीच हरतो.

बीज कुठे?

गॅरी प्लेयर या प्रसिद्ध गोल्फपटूने एकदा एक अप्रतिम स्ट्रोक मारला. बॉल सरळ खळग्यात गेला. प्रेक्षकांपैकी एक जण म्हणाला, ‘‘वा! किती नशीबवान आहे हा!’’ गॅरी प्लेयर हसून म्हणाला- ‘‘मजेशीर गोष्ट अशी, की मी जितका जास्त सराव करतो, तितकाच जास्त ‘नशीबवान’ बनतो.’’

‘लकी-अनलकी’ ही भाषा आपल्या मनात येते कुठून? बहुतेक वेळा ती आपल्या वाढीच्या वातावरणातून येते. लहान मुलगा कमी गुण घेऊन आला की आपण सहज म्हणतो, ‘आज लक नव्हतं!’ दुसऱ्या एखाद्या मुलाबद्दल म्हणतो- ‘तो लकी आहे.’ परीक्षेला जाताना आपण ‘छान लिही’, ‘तू तुझी उत्तम कामगिरी कर’ यापेक्षा ‘बेस्ट लक’च जास्त वेळा म्हणतो! शब्द छोटा असतो, पण संदेश मोठा- ‘लक्ष प्रयत्नावर नाही, नशीबावर’.

कदाचित आपण कमी गुण मिळालेल्या मुलाला सावरण्यासाठी असं बोलत असू. पण नकळत एक बी पेरलं जातं- ‘परिणामांमागे प्रयत्न नाही, नशीब असतं.’ मग अपयश आलं की मुलं स्वतःला विचारत नाहीत- ‘मी काय वेगळं करू शकतो?’ ती थेट निष्कर्ष काढतात, ‘माझं नशीबच खराब आहे.’

पालक म्हणून इथे एक सूक्ष्म, पण प्रभावी बदल करता येतो- ‘तुझं लक नव्हतं’ म्हणण्याऐवजी, ‘तू कुठे सुधारणा करू शकतोस?’ हा प्रश्न विचारणं. ‘तो लकी आहे’ असं म्हणण्याऐवजी, ‘त्याने कशा प्रकारे तयारी केली असेल?’ हा विचार पुढे आणणं. मुलांच्या प्रयत्नांचं कौतुक करणं- फक्त निकालाचं नाही. अपयशाकडे शिकण्याचा मार्ग म्हणून पाहायला शिकवणं. कारण आपण जर ‘नशीब’केंद्रित भाषा वापरली, तर मुलं प्रयत्नांपासून दूर जातील. पण ‘प्रयत्न’केंद्रित भाषा वापरली, तर ती अपयशातही उभी राहायला शिकतील.

आज स्वतःला एक प्रश्न विचारूया- मी जेव्हा ‘माझं नशीब खराब आहे’ म्हणतो, तेव्हा मी नेमकं काय टाळतो आहे? मी खरंच माझी पूर्ण क्षमता वापरून प्रयत्न करतो आहे का? की मी आधीच निष्कर्ष मान्य करून बसलो आहे? आणि जर ‘जे नशिबात आहे तेच होतं’ हा विचार थोडा बाजूला ठेवला, तर मी आज वेगळं काय करेन?

परिस्थिती अडवू शकते, पण आपण स्वतःलाच थांबवलं तर प्रवास तिथेच संपतो!

‘नशीब’ किंवा ‘लकी-अनलकी’ हे शब्द आपल्याला गैर वाटत नाहीत. आपण रोजच्या बोलण्यात कित्येकदा ते वापरतो. पण त्यातून ज्या मानसिकतेचं बीज पेरलं जातं ते धोक्याचे आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.