बोल संतांचे : अशी ही थट्टा!
esakal May 09, 2026 08:45 AM
संत एकनाथ महाराज

योगिराज महाराज पैठणकर

आपण ‘लांडगा आला रे आला’ ही गोष्ट नक्कीच ऐकली असेल. मेंढपाळाचा एक खोडकर मुलगा मेंढ्या चरण्यासाठी बाहेर जात असे. त्या चरत असताना मुलाला मोठा कंटाळा येई. एक दिवस त्याने लोकांची थट्टा करायचे ठरवले आणि ओरडू लागला- ‘लांडगा आला रे आला... वाचवा...’ लोक हातातील कामधंदा सोडून त्याच्या मदतीला धावून गेले. मात्र झाडावर बसून तो हसू लागला. लोक वैतागले. काही दिवसांनी पुन्हा त्याने अशीच थट्टा केली. यावेळीही लोक वाचवायला आले. तो कशी गंमत केली म्हणून पुन्हा हसू लागला. लोक चिडून निघून गेले. काही दिवसांनी मात्र खराखुरा लांडगा त्या मेंढ्यांजवळ येऊ लागल्याचे त्याने पाहिले आणि जिवाच्या आकांताने ओरडू लागला, ‘लांडगा आला रे...’ आता मात्र वैतागलेल्या त्या लोकांनी त्याच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष केले. त्या मुलाचे जे नुकसान व्हायचे ते झाले.

काही माणसे स्वतःच्या करमणुकीकरता वाट्टेल त्या थराला जायला मागेपुढे पाहात नाहीत. प्रसंग काय आहे, समोरच्याची मानसिकता काय आहे, समोरची व्यक्ती कोण आहे, त्याला काय वाटेल, या कोणत्याच गोष्टींचा विचार यांचे ठायी नसतो. किंबहुना तो नसतो म्हणूनच ते अशा कृतीत प्रवृत्त होतात. एकनाथ महाराज म्हणतात-

अशी ही थट्टा । भल्याभल्यासी लाविला बट्टा ।।

चेष्टा, विनोद, मस्करी, टिंगल, उपहास, गंमत, टर, टवाळी, या अशा अनेक नावांनी ती ओळखली जाते. याने लाभ काही नाही. माणसाने आपली वाणी संयमित ठेवावी. त्याचा अति किंवा गैरवापर निश्चितच त्रासदायक आहे. एकनाथ महाराज हरिपाठात म्हणतात-

हरिबोला हरिबोला । नाहीतरी अबोला ।।

व्यर्थ गलबला करू नका ।।

‘अति सर्वत्र वर्जयेत’ अशी संस्कृतमध्ये एक उक्ती आहे. यादव कुमारांची कथा एकनाथ महाराजांनी नाथ भागवतात सांगितली आहे. भगवान श्रीकृष्णाचा पुत्र सांब मित्रांसमवेत वनात गेला असता अनुष्ठानात बसलेल्या साधूंची थट्टा करावी असा विचार मनात आला. नऊ महिन्यांची गर्भवती वाटावी अशा स्त्रीचा पेहराव घेऊन त्यांच्या निकट गेला. इतर मित्रांनी चेष्टा करण्याच्या हेतूने त्यांना प्रश्न केला, ‘‘या स्त्रीस पुत्र होईल की पुत्री?’’ ऋषींच्या गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी शाप दिला, की यास ना पुत्र होईल ना पुत्री. याच्या पोटी लोखंडाचे मुसळ येईल. शापाचा परिणाम असा झाला की त्यायोगे यादव कुळाचा नाश झाला. मुळात विस्तृत कथा नाथांनी सांगितली आहे.

नाथ महाराज म्हणतात -

थट्टा रावणाने केली । नगरी सोन्याची बुडविली ।।

थट्टा ज्यासी त्यास भोवली । बरी नव्हे थट्टा ।।

अशी अनेक उदाहरणे नाथांनी यात दिली असून यातून शुक, भीष्म, हनुमान आणि कार्तिकस्वामी हे चार जण वाचल्याचे सांगतात.

इतरांची कायम थट्टा करणाऱ्याचे जीवनच एक प्रकारे थट्टा बनून जाते. आपल्या आजूबाजूस अशी अनेक माणसे असतात. त्यांनी एकनाथ महाराजांचा उपदेश आत्मसात केल्यास बरे.

एका जनार्दनी म्हणे सर्वांला । थट्टेला भिऊन तुम्ही चाला ।।

नाही तर नेईल नरककुंडाला । अशी ही थट्टा ।।

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.