RR vs GT Live : आशिष नेहराने खुणावलं... मोहम्मद सिराजने अगदी तसं केलं... वर्ल्ड रेकॉर्ड करणारा वैभव सूर्यवंशी असा फसला Video
esakal May 10, 2026 02:45 AM

How Siraj dismissed Vaibhav Sooryavanshi in IPL 2026? राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा आपल्या स्फोटक फलंदाजीमुळे चर्चेत होता. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत गोलंदाजांवर दबाव आणला. वैभवने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १०० षटकार पूर्ण करणारा पहिला किशोरवयीन क्रिकेटपटू बनण्याचा जागतिक विक्रमही आपल्या नावावर केला. मात्र, त्याची ही धडाकेबाज खेळी गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक आशिष नेहरा आणि मोहम्मद सिराज यांच्या भन्नाट रणनीतीमुळे थांबली.

वैभव सूर्यवंशीने राजस्थानला आक्रमक सुरुवात करून दिली. त्याने १६ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ३६ धावा चोपल्या. या तीन षटकारांनी त्याने मोठे विक्रम नोंदवले. आयपीएलच्या एका पर्वात पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक ३० षटकार खेचले. शिवाय आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीयांमध्ये तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. वैभवने या पर्वात ४० षटकार खेचले आहेत आणि तो अभिषेक शर्माच्या ( ४२) जवळ पोहोचला आहे. पण, त्याने विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर यांना मागे टाकले.

आयपीएलच्या पहिल्या षटकांत सर्वाधिक षटकारांमध्ये वैभव ( ९)ने शुभमन गिल, लोकेश राहुल यांच्याशी बरोबरी केली. मोहम्मद सिराजने वैभवला तिसऱ्या षटकात माघारी पाठवले. त्यानंतर कागिसो रबाडाने पुढच्या षटकात यशस्वी जैस्वालला ( ३) बाद केले. शिमरॉन हेटमायरही ( ६) रबाडाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. पण, खरी मॅच फिरवली ती राशिद खान याने... आठव्या षटकात त्याने RR च्या ध्रुव जुरेल ( २४) व डोनोव्हन फरेरा ( ४) यांचा त्रिफळा उडवला आणि राजस्थानचा निम्मा संघ ९१ धावांत माघारी पाठवला.

तत्पूर्वी, साई सुदर्शनने ( ५५) शुभमनसह पहिल्या विकेटसाठी ११८ धावांची विक्रमी भागीदारी केली. पण, जॉस बटलर ( १३), जेसन होल्डर ( ७) यांना अपयश आले. शुभमन ४४ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ८४ धावांवर माघारी परतला.वॉशिंग्टन सुंदर व राहुल तेवातिया यांनी संघाला ४ बाद २२९ धावांपर्यंत पोहोचवले. गुजरातची ही राजस्थानविरुद्धची सर्वोत्तम धावसंख्या ठरली. वॉशिने २० चेंडूंत ३७, तर राहुलने ४ चेंडूंत १४ धावांची खेळी केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.