SSC Exam Result : निरक्षर आई-वडिलांच्या मुलाने दहावीत मिळविले ९४ टक्के गुण
esakal May 10, 2026 02:45 AM

वाई शहर - मूळचा कर्नाटकातील आणि निरक्षर आई-वडिलांच्या मुलाने दहावीत ९४ टक्के गुण मिळविले. बर्फाच्या गोळ्याची विक्री करणारे वडील अन् स्वयंपाकी कामे करणारी आईच्या कष्टाचे चीज झाले.

परशुराम मल्लिनाथ कोळी हा येथील द्रविड हायस्कूलचा विद्यार्थी. परशुरामचे वास्तव्य सध्या ओझर्डे गावात आहे. आई पद्मा अन् वडील मल्लिनाथ कोळी हे दोघेही अशिक्षित. वडील उन्हाळ्यात बर्फाचा गोळा विकतात. आई स्वयंपाकाचे काम करते. परशुराम आरंभीपासून तल्लख बुद्धीचा. प्राथमिक शाळेत उषा बेलोशे या शिक्षिका त्याला लाभल्या.

निबंध, वक्तृत्व, चित्रकला अशा उपक्रमात संधी दिली. त्याने शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षेतही यश संपादले. द्रविड हायस्कूलमध्ये महादेव जाधव, गोपाल गरुड, प्रशांत मल्लाडे, महेश इनामदार, मुख्याध्यापक नागेश मोने यांनी त्याला सतत प्रोत्साहन दिले. त्याच्या चारी बहिणींची साथ त्याला लाभली.

मदतीची गरज

परशुरामचे सॉफ्टवेअर इंजिनिअर बनण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी दिवसरात्र मेहनत घ्यायचीही त्याची तयारी आहे. त्याच्या पुढील शिक्षणासाठी समाजातील दानशूर घटकांनी हातभार लावण्याची गरज आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.