प्रणव सखदेव - sakhadeopranav@gmail.com
मी व्हॅन बंद केल्यावर त्याच्या माउलीने फोन केला. काकुळतीला येत म्हन्ली, काका, सौरभ शाळेत जायला मागत नाहीये. तुम्हीच हवे त्याला. माउलीने पोराला लय समजावलं, पन तो काई ऐकेना. पुन्हा तिची, तिच्या मिस्टरांची नोकरी. तिने मला गळ घातली फार... झालो तयार मग... पोरांची शेवा म्हणजे पांडुरंगाची शेवा शेवटी.’
एकदा मला कामाकरता बाहेरगावी जायचं होतं. ट्रेनचं आरक्षण केलं होतं. पण माझी ट्रेन चांगली साडेआठ तास लेट झाल्यामुळे ती पुणे स्टेशनला मध्यरात्रीनंतर येणार होती. मी मनाची तयारी केली होती, पण व्हायची ती चिडचिड झालीच. कारण आता आडनिड्या वेळेमुळे झोपेचं भरीत होणार होतं आणि त्यात भर म्हणजे प्रवास करायचा म्हटल्यावर येणारी ॲक्झँयटी!
ॲपवरून टॅक्सी बुक केली. काही मिनिटं गेली. आडनिडी वेळ असल्यामुळे भाडं नेहमीपेक्षा जास्त असणार हे गृहीत धरलं होतंच. काही मिनिटांत टॅक्सीचा क्रमांक आणि चालकाचं नाव, त्याचा फोटो इत्यादी तपशील स्क्रीनवर उमटला. बरेचदा अशा वेळेस टॅक्सी मिळत नाही, किंवा कॅन्सल केली जाते आणि धावपळ करावी लागते असा अनुभव एकदा-दोनदा आल्याने एक दिव्य पार पडलं असं म्हणून हुश्श केलं. काही सेकंदांत कॅब जवळ आल्याचं मोबाइलवरच्या मॅपवर दिसलं. बॅगा घेऊन गेटपाशी गेलो तोच टॅक्सी समोर उभी. माझ्याकडचं सामान पाहून चालक बाहेर आले. त्यांनी डिक्की उघडली आणि बॅगा ठेवायला मदत केली. त्यांच्याकडे मी पाहिलं आणि मनात शंकेची पाल चुकचुकली.
‘साहेब, ओटीपी सांगताल?’ त्यांनी विचारलं.
मी ॲपमध्ये पाहिलं आणि चपापलोच. तिथे जो फोटो होता, तो हा माणूस नव्हता. ॲपमधला फोटो तरुणाचा होता, पण माझ्यासमोरचे काका वयस्कर होते. पहिले वाटलं की, मी वेगळ्याच कुणीतरी बुक केलेल्या कॅबमध्ये बसलोय की काय? मी बुचकळ्यात पडल्याचं पाहून काका म्हणाले, ‘बरोबर गाडीत बसलात तुम्ही, सर. सांगा नंबर.’ ते अपराधी हसले.
मी विचारलं, ‘काका, वेगळा फोटो दिसतो आहे इथे...’
‘तो पोरगाय बगा माझा. त्याच्या जागी मी चालवतो गाडी.’
मी म्हणालो, ‘पण... म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये. पण कंपनीला सांगितलं पाहिजे ना तुम्ही...’
काका अजिजीने म्हणाले, ‘साहेब माफ करा. प्लीज रिपोर्ट नका करू.’
चालक काका साठीच्या पुढचे होते. डोळ्यांवर चश्मा होता. रापलेला चेहरा. गळ्यात तुळशीची माळ. पुढचे केस पांढरे झालेले. काहीसे बारकुडे, बुटकेच होते ते.
ते म्हणाले, ‘साहेब, कंपनीला सांगायला पाहिजेल. बरोबर. पण ऑप्शन नाही बगा म्हून करतोय काम. माझा पोरगा चालवायचा ही गाडी. ॲक्सिडेंटमध्ये त्याचा एक पाय गेला ओ. त्याला कोण काम देनार? मी शाळेची व्हॅन चालवायचो साहेब. आता रात्रीला हे काम करतो, नि सकाळी व्हॅन... रात्री भाडं चांगलं मिळतं...’
मी म्हणालो, ‘मी रिपोर्ट नाही करणार. डोन्ट वरी. घ्या ओटीपी... आपण निघू, मला उशीर व्हायचा नायतर.’
‘हो, चला, चला... थँक्यू बरं का,’ असं म्हणत त्यांनी ओटीपी टाकून गाडी सुरू केली आणि आम्ही वाटेला लागलो.
खरं तर मला काकांचा ज्याम राग आला होता. एकाअर्थी ती ग्राहकांची फसवणूक होती. या गिग कंपन्या पारदर्शकतेचे, सुरक्षिततेचे मोठे टेंभे मिरवतात खऱ्या, पण जमिनीवरचं वास्तव चित्र वेगळं असतं. उद्या एखादी बाई बसली या गाडीत आणि काही घडलं तर...? ही राइड होऊ दे, मग कंपनीला रिपोर्ट जरी नाही केलं, तरी ई-मेल लिहून आलेला अनुभव कळवला हवा असं मला वाटलं.
काका त्यांच्या समोरच्या छोट्या आरशातून माझ्याकडे पाहतच होते. ते म्हणाले, ‘साहेब, पुन्ह्यांदा सॉरी. काय सांगू तुम्हाला... फार वाईट काळ आला बगा. पोरगा हाताशी आला असं वाटत असताना काळाने घात केला. आम्हा गरिबांना कसला आलाय इन्शोरन्स... जो थोडका होता तो उपचारात गेला.’
मी मोबाइलच्या स्क्रीनकडे पाहत ‘हं’ म्हटलं. काका सांगू लागले, ‘पोरगा गाडीवर लागला. चांगला धंदा करू लागला. माझ्या पोराला तम्बाखू, दारू कसलंबी व्यसन नाय की काय नाय. मिळालेले पैसे अर्धे बायकोकडं आणि अर्धे त्याच्या माउलीकडं द्यायचा. मी सकाळी पोरांना शाळेत व्हॅनने सोडायचो. एकदा तोच म्हन्ला तात्या व्हॅन चालवणं थांबवा. मी घेतो घरचा भार. त्याची बायको, आमची सूनबाई जवळच्या दुकानात काम करायची. पण नात झाल्यावर तिने नौकरी सोडली. छान चाललं होतं, पण नजर लागली कुणाची की काय, ते त्या पांडुरंगालाच ठाऊक. ॲक्सिडेंटनंतर पोरगा जो अंथरुणाला लागला तो लागलाच. सूनबाई खमकी ओ, परत नोकरीला लागली. पण पदरात नात, शिक्षण, तिचे लाडकोड... पैसा तर लागतोच ना... म्हणून मी त्याची ही गाडी हाकायला घेतलीन.’
मी विचारलं, ‘वाईटच झालं काका हे. पण तुम्ही कंपनीला कळवलंत तर ते तुमचा फोटो, नाव लावतील ना इथे...’
Premium|Milind Shinde life journey : मलबार हिलच्या बंगल्यात राहून 'स्ट्रगल'? डॉ. मिलिंद शिंदे यांनी सांगितली त्या आलिशान परिसरातील एका छोट्या अंधाऱ्या खोलीची रंजक गोष्ट!काकांनी सांगितलं, ‘साहेब, दुनिया ज्याम येडी असते बगा. माझ्या पाठी पांडुरंग उभा आहे म्हणून चाल्लंय. तुम्ही म्हणता तसं करून पाहिलं, पण या सगळ्या भाड्याच्या गाड्या देणाऱ्या कंपन्यांच्या लोकांना माझ्यासारखी म्हातारी माणसं नको असतात. कसं होणार मग?’
‘खरंच?’
‘पाचशेदोन टक्के खरं. मी माझा येगळा प्रोफाइल केला होता. कंपनीने लाख प्रश्न इचारले - कार नीट चालवता येते ना, नीट दिसतं का, नंबर किती, डायबेटिस, बीपी वगैरे टेस्ट करून या सांगितलंन. रस्तेबिस्ते माहितीयेत ना. मोबाइल वापरता येतो ना, रात्री झोप लागते का... हज्जार प्रश्न. नेटाने उत्तरं दिली, मंग होकार द्यावाच लागला. आपन थोडी फॉरेनला राहतो. की पोसेल सरकार आपल्याला. पण मग येगळीच पंचाईत झाली. राइड मिळेना. मिळाली तर कॅन्सल व्हायची. म्हातारबाचा फोटो पाहून. रात्रीला नको असतात माझ्यासारके लोक. नि मी तर रात्रीचाच धंदा करतो. जास्त पैशांसाटी. मग नाविलाजाने पत्करला हा मार्ग. विठ्ठलाची कृपा, अजून कुणी रिपोर्ट नाही केलेलं मला. मी गाडी चालवतोच अशी. तुम्हाला सांगू का, मला ना ल्हान असल्यापास्नं गाडी चालवायला आवडतं.’ काका निर्मळ हसले.
मी बराच निवळलो होतो, ‘बरे पैसे मिळतात यातून?’
‘मिळत्यात तसे. आनि मला दिवसाचा वेळ पण मिळतो बगा. घरचं पाहावं लागतं, पोराचं औषधपाणी असतं... पुन्हा व्हॅन असतेच सकाळी शाळेची...’
‘रात्री उशिरापर्यंत हे काम आणि सकाळी पुन्हा व्हॅन! झोपेचं काय करता?’
‘जमवतो बगा. खरं सांगू का, नव्हतंच करायचं व्हॅनचं काम मला. पण काय झालं, मी व्हॅन चालवायचो ना त्यात एक पोरगं होतं. सौरभ नाव त्याचं. ल्हानी पोरं मला लय आवडतात. लळा लावतात पोरं. तर त्याला माझ्या शेजारच्या सिटेवर बसायला आवडतं. तिथेच बसणार तो. मग गोष्ट सांग, गाणी म्हण असं चालायचं. छान कटायचा रस्ता. मी व्हॅन बंद केल्यावर त्याच्या माउलीने फोन केला. काकुळतीला येत म्हन्ली, काका, सौरभ शाळेत जायला मागत नाहीये. तुम्हीच हवे त्याला. माउलीने पोराला लय समजावलं. पन तो काई ऐकेना. पुन्हा तिची, तिच्या मिस्टरांची नोकरी. तिने मला गळ घातली फार... झालो तयार मग... पोरांची शेवा म्हणजे पांडुरंगाची शेवा शेवटी.’
‘एका मुलासाठी तुम्ही जागरणं करूनही सकाळी व्हॅन चालवता?’ मी आश्चर्याने विचारलं.
काका म्हणाले, ‘साहेब, त्या माउलीशी बोलताना समजलं, सौरभचे आबा वैकुंठवासी झाले होते. करोनाने घास घेतलेला. त्याच्या आबांचा त्याला लय लळा होता बघा. तो माझ्यात त्याचा आबा शोधीत असनार ना... मंग नाई तरी कसं म्हणावं तुमीच सांगा?...’ मला आरशात त्यांचे डोळे पाणवल्याचं दिसलं. आम्ही दोघं निःशब्द झालो...
स्टेशन आलं. मी पैसे दिले. तेव्हा काकांनी पुन्हा एकदा सांगितलं, ‘साहेब, रिपोर्ट नका करू हां? नि रेटिंग द्या. फायद्याचं पडतं आम्हाला. येऊ का?’
मी हात हलवून निरोप दिला. तत्काळ ॲप उघडून फाइव्ह स्टार दिले. पॉप अप झालेला हसणारा इमोजी डोळ्यांतल्या पाण्याआड धूसर झाला....