विराट विरुद्ध रोहित... रायपूर सज्ज!" मुंबई पलटवार करणार की बंगळूर विजयाच्या रुळावर परतणार?, हार्दिक खेळणार का?
esakal May 10, 2026 02:45 PM

रायपूर : प्लेऑफ गाठण्याची स्पर्धा तीव्र होत असताना प्रमुख संघांना पराभवांचे धक्के बसत आहेत. गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळूर त्यापैकी एक आहे.आज त्यांचा सामना नवव्या स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्सविरुद्ध होत आहे. बंगळूरचा संघ पराभवाची हॅट्ट्रिक टाळण्यासाठी लढेल तर मुंबईचा संघ अस्तित्वासाठी संघर्ष करेल.

बंगळूरचा संघ १२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. गतविजेते म्हणून त्यांनी यंदाची स्पर्धा सुरू केली आणि चारपैकी चार सामने धडाक्यात जिंकले आणि प्लेऑफ सहजपणे गाठणार असा खेळ केला, परंतु नंतर पुढील पाच सामन्यांत त्यांचे तीन पराभव झाले. त्यामुळे वाटचालीला खीळ बसली. १० सामने झाले तरी त्यांना प्लेऑफ निश्चित करता आलेली नाही. त्यामुळे उद्या होणाऱ्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातून गाडी रुळावर आणण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

IPL 2026: जसप्रीत बुमराहला मुंबई इंडियन्सकडून विश्रांती मिळणार? हेड कोचने दिलं धक्कादायक उत्तर

दुसऱ्या बाजूला मुंबईचा संघ १० साखळी सामने झाले तरी सहा गुणांसह नवव्या स्थानावर आहे. पुढचे सर्व सामने जिंकले तरी प्लेऑफ गाठणे त्यांच्यासाठी कठीण आहे. म्हणून आता सर्व सामने त्यांच्यासाठी प्रतिष्ठा सिद्ध करण्यासारखे असेल. गत सामन्यात विजय मिळवल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास निश्चितच वाढलेला आहे.

बंगळूर आणि मुंबई यांच्यात १२ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर सामना झाला होता. त्यात बंगळूरने शानदार विजय मिळवला होता. आता रायपूरमधील या सामन्यात मुंबई संघ उलटवार करणार का, याची उत्सुकता असेल. या सामन्याद्वारे पुन्हा एकदा रोहित विरुद्ध विराट या लढतीची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.

रोहितचे पुनरागमन मुंबईसाठी यशस्वी ठरले होते. त्याने ४४ चेंडूंत शानदार ८४ धावांचा तडाखा दिला होता. रायन रिकल्टननेही अशीच खेळी केली होती. त्यामुळे मुंबईने लखनौ संघावर मात केली होती. उद्या मात्र रोहित-रिकल्टन यांना बंगळूर संघाच्या भुवनेश्वरकुमार आणि जॉश हॅझलवूड यांचा सामना करावा लागणार आहे. अचूक टप्प्यावर मारा करणाऱ्या गोलंदाजांविरुद्ध फटकेबाजी करणे सोपे नाही.

लखनौविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्या खेळला नव्हता. त्याऐवजी सूर्यकुमार यादवने नेतृत्व केले होते. फलंदाज म्हणून तो अपयशी ठरला असला तरी संघाच्या नावावर विजयाची नोंद केली होती. दोन दिवसांपूर्वी त्याला कन्यारत्नाचा लाभ झाल्यामुळे तो उद्याच्या सामन्यात खेळणार की नाही, हे स्पष्ट झाले नाही. मात्र, हार्दिक पंड्या रायपूरमध्ये दाखल झाला असून, तो खेळण्याची शक्यता अधिक आहे.

IPL 2026: रोहित शर्माचा गुजरातविरुद्ध मुंबई इंडियन्सला आधार मिळणार की नाही? MI कोचने दिले महत्त्वाचे अपडेट्स रायपूरमध्ये पहिला सामना

रायपूर हे बंगळूर संघाचे दुसरे होम ग्राउंड म्हणून घोषित करण्यात आले आहे. तेथे यंदाच्या स्पर्धेतला पहिला सामना होणार आहे. क्रिकेट विश्वातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे स्टेडियम म्हणून रायपूरचे शहीद वीर नारायण सिंग स्टेडियम ओखळले जात आहे. खेळपट्टी कशी असेल याबाबत दोन्ही संघांचा पवित्रा सावध असेल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.