Arzan Khambatta Sculptures : अरझान खंबाट्टा: शाळेत ड्रॉईंगमध्ये नापास होणारा मुलगा 'असा' बनला देशाचा प्रसिद्ध शिल्पकार
esakal May 10, 2026 02:45 PM

हर्ष भटकळ - saptrang@esakal.com

प्रस्थापित पद्धतीनुसार काम करण्याचे टाळून कुतूहलापोटी विविध प्रयोग करत त्यांनी स्वतःची वेगळी पद्धत ठरवली. अरझान खंबाट्टा यांनी पारंपरिक प्रशिक्षणापेक्षा अनुभवाने आपली कला विकसित केली. कलादालनातील कलाकृतींपेक्षा सार्वजनिक ठिकाणी त्यांनी तयार केलेल्या कलाकृती आहेत, त्यात त्यांना जास्त आनंद आहे.

सांगतील ते निमूट करावे असं माझ्या बाबतीत शक्यच नाही.’ अरझान खंबाट्टा हे सांगतात सहजपणे बोलता बोलता पण तीच त्यांच्या कलाप्रवासाची प्रेरणा आहे. शाळेत असताना ते ड्रॉइंग विषयात नापास झाल्याचं त्यांना आठवते. त्यांना या विषयात रस नव्हता म्हणून नव्हे पण शिक्षकांनी सांगितलेले ऐकायचे नाही या हट्टापायी. ‘एक बालदी आणि त्यावर फुलांचा गुच्छ ठेवून सांगितले जात असे की काढा चित्र! मला हे मुळीच जमत नसे.’ त्याऐवजी ते कागदाची घडी घालून त्यातून निरनिराळे आकार बनवत असत. ‘त्यांनी जरी मला एक कागद आणून दिला तरी मी लगेच तो दुमडून त्याला त्रिमिती आकार देत असे.’ या सपाट कागदाला निरनिराळे आकार देण्याचा ध्यास हाच त्यांच्या कलेचा पाया झाला.

Premium|Kailasa Temple Ellora : कैलास मंदिर; वेरूळच्या पाषाणी महाकाव्याची अद्भुत गाथा माध्यमाचा शोध

त्यांच्या कामाला निश्चित स्वरूप प्राप्त झाले ते औपचारिक शिक्षणामुळे नव्हे तर एका अचानक घटनेमुळे. त्यांना आठवते त्यानुसार ते एकदा सहजगत्या अदी देव्हिअरवाला याच्या शिल्पकलेच्या स्टुडिओत शिरले. तेथील धातूंचा गंध, शिल्प बनवण्यासाठी लागणारी हत्यारे, बोर्डावरील रेखाटने हे सारे ते अनुभवत होते. कोणत्याही पारंपरिक प्रशिक्षणापेक्षा त्या अनुभवाने त्यांच्या स्वतःबद्दलच्या कल्पना स्पष्ट झाल्या. ‘मला काय व्हायचं आहे हे तेव्हा मला कळू लागलं’ ते सांगतात. ‘धातू, विशेषतः लोखंड हे माध्यम मला अत्यंत प्रभावी वाटलं आणि माझ्या कामाचा मुख्य आधार बनलं.’ त्यानंतरच्या काळात पद्धतशीर शिकण्यापेक्षा स्वयंस्फूर्त कामावर त्यांचा भर राहिला. माहीम विभागातल्या एका छोट्याशा वर्कशॉपमध्ये ते रात्रीचे जाऊ लागले. ‘तिथले कामगार निघून गेल्यानंतर मी छोटे-मोठे प्रयोग करत असे. मी तसे काहीसे शिकत गेलो.’ घरी आल्यानंतर ते सटरफटर गोष्टी जमवून त्या जुळवून, जोडून ते प्रयोग करत. ‘मला तेव्हा त्या विभागातला भंगार कलेक्टर म्हणत,’ ते हसत सांगतात. पण माझी सुरुवात तशीच झाली.

पद्धतशीर नाही तरी शिक्षणच

‘शिकणं बिकणं काही नाही... फक्त प्रयोग एके प्रयोग.’ त्यांच्या कामाचे आजतागायत हेच मर्म आहे. ज्या धातू इत्यादी वस्तूंवर काम करायचं ते ठरावीक पद्धतीने नव्हे पण प्रयोग करून. ‘तुम्ही तो ठोकून पाहा, वळवून पाहा, हातोड्याचे घण बसताना तो धातू काय सांगतो ते पाहा. त्याच्या मर्यादाही लक्षात घ्या.’ त्यासाठी योग्य लागणारी हत्यारेही शोधावी लागतात. ‘वेल्डिंगसाठी वापरायचे उपकरण सहसा धातू जोडण्यासाठी असते. पण ते धातू विरघळवते त्याचप्रमाणे ते कापूही शकते. मग मी त्यांचा माझ्या पद्धतीने धातू कापायला उपयोग करत असे.’ हा काही प्रमाणात अनोखा प्रयोग करत राहणं हा या प्रक्रियेच्या अंतर्भूत आहे. हे काही मुद्दाम केलेले वेगळेपण नव्हे. पण निरनिराळ्या आकृत्यांचा शोध घेण्याची पद्धत आहे.

हाच व्यवसाय

त्यांच्या कामाला सुरुवात लहान वयापासून झाली असली तरी या शिल्पकलेला व्यवसायाचे स्वरूप यायला काही काळ जावा लागला. ‘मी केलेल्या काही कलाकृती लवकरच विकल्या गेल्या.’ पण ते स्थापत्यशास्त्राचा अभ्यास करताना त्यांच्याकडे एक काम आले. मागणीनुसार काम करायचे यामुळे त्यांच्या व्यवसायाचे स्वरूप बदलले. मुंबईत वरळीच्या नेहरू सेंटर मधील एका हॉटेलसमोर शिल्पाकृती त्यांना तयार करायची होती. ‘मागणीनुसार काम करणं म्हणजे काय हे तेव्हा माझ्या ध्यानात आले.’ त्यानंतर अशी कामे एका मागून एक येऊ लागली आणि मग त्यांच्या व्यवसायाला आकार येऊ लागला. बजाज भवन येथील एक भित्तिशिल्प तयार केले. जहांगीर आर्ट गॅलरी येथील पहिल्या प्रदर्शनात त्यांच्या सर्वच कलाकृती विकल्या गेल्या. ‘हे सारे सहजपणे घडत गेले. लोकांनी माझं काम पाहिलं आणि त्यातून नवीन काम निर्माण झाले.’ हळूहळू मागणीनुसार केलेली कामे हेच त्यांच्या व्यवसायाचे मुख्य स्वरूप होऊ लागले. ते सांगतात, ‘माझ्या कामातले ९९ टक्के काम हे मागणीनुसार कमिशन केलेले असते.’

सार्वजनिक जागा

त्यांचे बहुतेक काम मागणीनुसार केले गेले खरे पण ते फक्त खाजगी चाहत्यांसाठी नव्हे. मुंबईतील अनेक रहदारीच्या मोक्याच्या जागी खंबाट्टा यांची भव्य शिल्पे उभी आहेत आणि एअर इंडिया आणि ओबेराय हॉटेल यांच्यासमोर एक राइनासरस उभा आहे, तर पोद्दार हॉस्पिटलजवळ डॉल्फिन. आणखी एका ठिकाणी एक बुल (वळू) आणि अलीकडे क्रॉफर्ड मार्केटच्या पोलिस कार्याजवळ एक शिल्प उभे आहे. ‘मला याचा आनंद वाटतो. कारण सर्वसामान्य जनता ते पाहत असते. या सार्वजनिक कलाकृती अत्यंत भव्य असतात, एवढे समाधान नाही पण ते सतत लोकांच्या समोर राहणे. त्यामुळे सामान्यांचाही सद्यःकालीन कलेशी संबंध राहतो,’ ते म्हणतात. प्रत्येक जण काही आर्ट गॅलरीत जाऊ शकत नाही. दिवस जातात तसेच या जागा शहराच्या वर्णनाचाच भाग बनतात. त्या जागा ओळखल्या जातात राइनोज जंक्शन, डॉल्फिन जंक्शन अशा त्या जागांची मूळ नावे बाजूला राहतात. ही शिल्पेच दैनंदिन जीवनाला शहराची ओळख बनतात.

Sunil Gawde Artist Biography : "जे मला डोळे मिटल्यावर दिसतं, तेच मी चितारतो!" आंतरराष्ट्रीय कलाकार सुनील गावडे यांच्या यशाचे 'हे' आहे गुपित. निरनिराळ्या वस्तूंचा वापर

जरी त्यांनी लाकूड, रेझिन, ॲल्युमिनियम, पितळ आणि लोखंड अशांचा उपयोग केला आहे तरी लोखंड हे त्यांच्या कामात सातत्याने दिसते.

‘मला लोखंडाचे काम करायला आवडतं,’ ते म्हणतात. तरी त्यांच्या कामात इतर वस्तूंचाही समावेश होत असतो. लाकूड आणि लोखंड एकत्र नांदतात. कांस्याचाही (ब्रॉंझज) वापरही वाढत आहे. ‘पुढील प्रदर्शनात कांस्य वापरलेलं काम दाखवीन,’ असे ते जाहीर करतात. प्रत्येक धातू किंवा वस्तू याप्रमाणे वेगळा विचार करावा लागतो. ‘धातूंचं काम करताना मी नाजूक काम बारकाईने करू शकतो. पण पितळेवर किंवा दगडावर काम करताना शैली बदलावी लागते. आपल्याला ज्या साहित्यावर काम करायचे त्याची बूज राखावी लागते.’ त्या त्या साहित्यावर काय जमेल आणि काय जमणार नाही याचं भान राखणे हे या प्रक्रियेत आवश्यक आहे.

खंबाट्टांची काम करण्याची पद्धत

‘मी सुरुवातीला एका कागदावर चित्र काढतो. मग मी ते प्रत्यक्षात तयार करतो.’ ते निरनिराळ्या सळया घेऊन त्यांचे त्रिमिती रूप ते पाहू लागतात. मग हळूहळू त्यात तपशील भरू लागतात. ‘आपल्याला त्याजवळ उभे राहून कसं वाटतं ते तपासावं लागतं. मग ती रचना घडत जाते. काही वेळा त्यात बदल करावे लागतात. सुधारावे लागतात. काहीच अंतिम समजून चालत नाही. हवे ते वाटणारे बदल करणे हे माझ्या कामाचा भाग आहे.’

अध्यापन आणि प्रसार

स्वतःच्या कामासोबत अध्यापन हेही त्यांच्या कामाचा महत्त्वाचा भाग आहे. ते वर्षानुवर्षे मुलांसाठी कार्यशाळा घेत असतात. ‘प्रत्येकात एक कलाकार दडलेला असतो फक्त त्याला जागं करायला हवं.’ काही शिकवण्यापेक्षा त्यांना अनुभव घ्यायला देणं महत्त्वाचं आहे. ‘पंधरा एक मिनिटे काम केल्यावर ते आपल्या कामात पूर्णपणे रमतात. पद्धतशीर शिक्षण दिल्यास सर्जनशीलतेकडे दुर्लक्ष होते. मुलांना त्यांच्या त्यांच्यावर सोडलं पाहिजे.’ त्यांना हे काम वाढवायचं आहे आणि कलाशिक्षणाविषयी शिक्षण शास्त्रज्ञांना पुनर्विचार करायला लावायचे आहे.

विनोद आणि गंमत

याला समांतर असा अजून एक पैलू आहे. ‘मला स्वतःला विनोद आवडतो आणि तो माझ्या व्यक्तित्वाचा भाग आहे.’ त्याच्या एका मालिकेत, त्यांनी अनेक द्व्यर्थी शब्दांना शिल्पाचे रूप दिले आहे. काही वेळा वाक्यांना आणि भाषेला निरनिराळी रुपे शोधली आहेत. ‘त्यामुळे पाहणाऱ्याला मजा वाटते. ते मला पुरेसे आहे.’ एका शिल्पात डोके मोठे केले आहे आणि त्या शिल्पाचे नाव आहे ‘मूविंग अहेड!’ त्यांना स्वतःला आवडणारे शिल्प मायकल जॅक्सन आणि जेनीफर लोपेज सिस्टीन चॅपलमधील त्या विख्यात चित्राप्रमाणे एकमेकांची बोटे एकत्र गुंफली आहेत. त्या चित्राचे नाव मायकेल ॲंजेलो.

तंत्रज्ञान : उपयोग आणि मर्यादा

अलीकडचे बहुतेक कलाकार संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करतात त्याप्रमाणे तेही त्याचा विनियोग करतात. पण सांभाळून. ‘मी त्याचा उपयोग फक्त कला सादर करण्यासाठी करतो. प्रत्यक्ष कलानिर्मितीसाठी नव्हे’ ही त्यांची भूमिका. रेखाटनाची हुबेहूब प्रतिकृती पितळेच्या शिल्पात परिवर्तित करता येईल. पण मूळ संकल्पना ही हाती रेखाटूनच करायला हवी. ‘मी जर सर्वस्वी कृत्रिम बुद्धिमत्तेवर विसंबून राहिलो तर माझी विचारशक्ती काम करेनाशी होईल.’ शिल्पकला ही त्यांच्यासाठी हाती घडवण्याचीच कला आहे. ‘आपल्याला निरनिराळ्या संहित्याशी प्रत्यक्ष झुंजावं लागते. त्याला काही पर्याय नाही.’

पुढे काय करायचं?

त्यांना इतर साहित्याशी विशेषतः ब्रोंजशी परिचय वाढवायचा आहे आणि शिल्पातील घटकांचा तोल आणि त्यांची अवजारे यात प्रयोग करायचे आहेत. ‘मला या कामाची आवड आहे. जे स्तब्ध राहू नये ते थांबवायचं आहे.’ शिवाय त्यांना शिकवण्यावर भर द्यायचा आहे आणि इतरही असेच काम करू शकतील अशी व्यवस्था निर्माण करायची. त्यांच्या इतर प्रवासाप्रमाणेच काहीही योजनाबद्ध नाही. ‘ते होत जाते आणि प्रतिसाद देत जातो.’ इतकेच.

हीच प्रक्रिया चालू

त्यांच्याशी बोलताना लक्षात येते की, त्यांचे कार्य हे कोणत्याही ठरावीक पद्धतीने होत नाही. निरनिराळे साहित्य समजून घेणे त्यातून शिल्प तयार करणे आणि संहित्याशी खेळ करणे आणि ते प्रत्यक्षात उभे करणे. ‘शिस्तीत काम करणं ही काही माझी पद्धत नाही,’ हे सांगतात आणि हेच त्यांच्या कामाचे मर्म आहे. प्रस्थापित पद्धतीनुसार काम करणे हे टाळून सुरुवात कुतूहलापोटी होऊन प्रयोग करत करत त्यांनी स्वतःची वेगळी पद्धत ठरवली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.