अरविंद केजरीवाल बातम्या: भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारमधील मंत्री संजीव अरोरा यांना काल ईडीने अटक केली. या घटनेनंतर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केजरीवाल यांनी अरोरा यांची प्रशंसा केली आहे. त्यांनी भाजपमध्ये सामील होण्याऐवजी तुरुंगात जाण्याचा पर्याय निवडल्याचे केजरीवाल म्हणाले. ईडीने काल पंजाबचे मंत्री संजीव अरोरा यांच्याशी संबंधित चार ठिकाणी छापे टाकले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, “संकटाच्या काळात माणसाचे चारित्र्य उघड होते. संजीव अरोरा यांनी भाजपमध्ये सामील होण्याऐवजी तुरुंगात जाण्याचा पर्याय निवडला. त्यांना सलाम.”
शनिवार सकाळपासून ईडीने संजीव अरोरा यांच्याशी संबंधित चार ठिकाणी छापे टाकले आहेत. एप्रिल महिन्यात ईडीने अरोरा यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्याची ही दुसरी वेळ होती. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चंदीगड आणि दिल्ली-एनसीआर परिसरात ही शोधमोहीम राबवण्यात आली. शोध घेण्यात आलेल्या ठिकाणांमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून अरोरा यांना चंदीगडमध्ये देण्यात आलेल्या सरकारी निवासस्थानाचा समावेश होता.
संजीव अरोरा यांच्या घरावर झालेल्या ईडीच्या छाप्याबाबत अरविंद केजरीवाल म्हणाले, पंजाब सरकारमधील आम आदमी पक्षाचे मंत्री संजीव अरोरा यांच्या घरावर ईडी छापे टाकत आहे. देशात कुठेही मनी लाँडरिंग होत असेल, तर ते थांबवणे आणि त्याचा तपास करणे हे ईडीचे काम आहे. या उद्देशासाठी ईडीने कारवाई केल्यास आम्हाला काही हरकत नाही. पण आम्ही पाहिले आहे की, या देशात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून सीबीआय भ्रष्टाचार थांबवण्यासाठी काम करत नाही, ना ईडी मनी लाँडरिंग थांबवण्यासाठी काम करते. ते फक्त इतर पक्षांना मोडून काढण्याचे आणि घाबरवण्याचे काम करत असल्याची टीका केजरीवाल यांनी केली.
गेल्या एका महिन्यात संजीव अरोरा यांच्या घरावर झालेली ही दुसरी ईडीची धाड आहे. ईडी 17 एप्रिल रोजी एकदा आली होती आणि त्यांनी गुडगाव, लुधियाना आणि दिल्ली येथील अरोरा यांच्या सर्व ठिकाणांवर छापे टाकले होते. त्या तीन दिवसांच्या छाप्यात त्यांना असे काय सापडले नाही, ज्यामुळे ईडीने दुसरी धाड टाकली? असा सवाल केला जात आहे. दरम्यान, त्याच वेळी अशोक मित्तल यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला, जो तीन दिवस चालला. त्यानंतर मग अशोक मित्तल भाजपमध्ये सामील झाले. त्यांच्या घरावरची कारवाई संपली. त्यांचे संपूर्ण प्रकरण बंद झाल्याचे ते म्हणाले.
केजरीवाल म्हणाले की, संजीव अरोरा भाजपमध्ये सामील झाले नाहीत. त्या दिवशी त्यांच्यावर भाजपमध्ये सामील होण्यासाठी प्रचंड दबाव टाकण्यात आला होता. जर ते त्या दिवशी भाजपमध्ये सामील झाले असते, तर कदाचित ईडीची धाड पुन्हा पडली नसती. भाजपमध्ये सामील न झाल्याबद्दल त्यांना धडा शिकवण्यासाठी ईडीची धाड टाकण्यात आली होती. एकतर भाजपमध्ये सामील व्हा किंवा तुम्हाला अटक केली जाईल. यंत्रणांचा गैरवापर होत आहे, ही अत्यंत दुःखद बाब आहे. मोदीजी विशेषतः पंजाबला लक्ष्य करत आहेत आणि पंजाबच्या लोकांसोबत अन्यायकारक वागणूक दिली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा