रत्नागिरीःक्राईम
esakal May 10, 2026 09:45 PM

वाहतुकीस अडथळा; खासगी बसचालकाविरूद्ध गुन्हा
रत्नागिरी ः साळवी स्टॉप ते जे. के. फाईल्स कंपनीकडे जाणाऱ्या मच्छीमार्केटसमोरील रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या आराम बसचालकाविरूद्ध ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिहीर हेमंत सुर्वे (वय २५, रा. तिवरेतर्फे देवळे साखरपा, ता. संगमेश्वर) असे संशयित ट्रक चालकाचे नाव आहे. ही घटना गुरूवारी (ता. ७) रात्री पावणेदहाच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुर्वे यांनी सहाचाकी आरामबस वाहतुकीस अडथळा होईल, इतर वाहनास धोका निर्माण होईल अशी लावून ठेवली. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अमोल नलावडे यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित बसचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
---------------
दारू प्यायलेल्या चालकाविरूद्ध गुन्हा
रत्नागिरी ः खेडशी-गयाळवाडी येथील रेल्वेब्रीजशेजारी कच्च्या रस्त्यावर दारू प्यायलेल्या तरुणाविरूद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण बाबुराव मजगांवकर (वय ३२, रा. मिरजोळे, जांभूळफाटा, रत्नागिरी) असे संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरूवारी (ता. ७) दुपारी पावणेबाराच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित तरुण सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना सापडला. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल रूपेश भिसे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
-----------
श्वसनाच्या त्रासाने प्रौढाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः श्वसनाचा त्रास जाणवू लागलेल्या प्रौढाला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. सुधीर महादेव शिवगण (वय ४५, रा. चिखलगाव, ता. दापोली, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ५) दुपारी सव्वादोनच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.