राज्यावर दुहेरी संकट बघायला मिळत आहे. उष्णतेसोबतच पावसाचा मोठा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला. पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले. गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. एप्रिल महिन्यापासून पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. राज्यात उष्णता प्रचंड वाढली. जवळपास जिल्ह्यांमध्ये पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. त्यामध्येच आता उष्णतेपासून दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. कोकणात आज दमट आणि उष्णतेचा इशारा देण्यात आला. दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. पावसाचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने जारी केला. जळगाव येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. जळगाव यथे 42.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. अकोला आणि मालेगाव येथे 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
गेल्या काही दिवसांपासून जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील तापमानामध्ये सातत्याने घट होत होती. मात्र आज पुन्हा एकदा तापमानाने उच्चांक गाठला असूनकमाल तापमान 42 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. तापमानात झालेल्या वाढीमुळे रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
वाढत्या उष्णतेमुळे जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाले आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत घराबाहेर पडू नये, पुरेसे पाणी पिणे तसेच उन्हापासून बचाव करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मान्सूनची आनंदवार्ता अंदमानात लवकर आगमन होणार आहे. तीन दिवसांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र. उन्हाच्या तीव्र तडाख्यामुळे मुंबईसह राज्यभरातील नागरिक हैराण झाले आहेत. याचदरम्यान ‘स्कायमेट’ने मान्सूनच्या सक्रियतेबाबत भाकीत केले आहे. अंदमानात निर्धारित कालावधीत मान्सून दाखल होईल.
येत्या दोन दिवसांतच म्हणजे 12 आणि 13 मेदरम्यान विषुववृत्तीय प्रदेशाजवळ आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्या प्रणालीमुळे विषुववृत्तीय वाऱ्यांचा प्रवाह अधिक मजबूत होण्याची चिन्हे आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम मान्सूनच्या आगमनावर होणार आहे. यापूर्वी 14 ते 22 मेदरम्यान मान्सून अंदमानात पोहोचण्याचा अंदाज होता. ती वेळ आणखी जवळ आल्याचे ‘स्कायमेट’ने नव्या अंदाजाद्वारे म्हटले आहे