'सूर्य दिसत नसला तरी चंद्राच्या पाठीशी असतो...'; विवेक ओबेरॉयची सुनेत्रा पवार यांच्यासाठी मराठीतून पोस्ट
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क May 11, 2026 12:13 PM

Vivek Oberoi Shares Marathi Post On Sunetra Pawar: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत (Baramati Assembly Bypoll) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Deputy CM Sunetra Pawar) यांनी मोठ्या मताधिक्यानं ऐतिहासिक विजय मिळवला. बारामतीत (Baramati) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी आमदारकीसाठी तब्बल 2 लाख 18 हजार 806 मतं मिळवून मोठा विजय मिळवला. दिवंगत नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर बारामतीत पोटनिवडणूक घेण्यात आली. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामतीची पोटनिवडणूक लढवली. महत्त्वाची बाब म्हणजे, या निवडणुकीत तब्बल 23 उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उभे होते. तरीही सुनेत्रा पवार यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवत पुन्हा एकदा पवार म्हणजेच, बारामती... हे सिद्ध केलं. अशातच आता सुनेत्रा पवार यांच्या विजयावर बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय (Bollywood Actor Vivek Oberoi) यानं भावूक पोस्ट शेअर केली आहे. बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय यानं मराठीतून पोस्ट करत सुनेत्रा पवार यांचा उल्लेख अजितदादांच्या योग्य वारसदार, असा केला आहे. 

विवेक ओबेरॉय यानं सुनेत्रा पवार यांच्यासाठी केलेल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय? 

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय यानं एक ट्वीट शेअर केलंय. त्या ट्वीटमध्ये त्यानं सुनेत्रा पवार यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केलाय. त्या फोटोमध्ये त्यानं लिहिलंय की, "सुनेत्रा वहिनी, अजित दादांनी उभारलेला भक्कम वारसा आज बारामतीकरांच्या प्रेमातून पुन्हा एकदा दिसून आला. तुमचा हा ऐतिहासिक विजय महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून अभिमानास्पद नव्या पर्वाची सुरुवात आहे आणि हे यश फक्त तुम्हीच मिळवू शकत होतात..."

पुढे बोलताना विवेक ओबेरॉय म्हणालाय की, "दादांची जनतेसाठीची कामं, लोकांवरील प्रेम आणि कठीण प्रसंगातही खंबीरपणे उभं राहण्याची ताकद यामुळेच ते खरे जननेते ठरलेत. आज जनतेनं त्यांच्या अर्धांगिनीवर दाखवलेला विश्वास हेच सिद्ध करतो की, त्या वारशाच्या योग्य वारसदार तुम्हीच आहात. तुमच्या या नव्या प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. महाराष्ट्रासाठी हा काळ निश्चितच सुवर्णयुग ठरेल, असा विश्वास आहे..."  

विवेक ओबेरॉय यानं ट्वीटच्या शेवटी मराठीत एक वाक्य लिहिलंय. त्यानं लिहिलंय की, "सूर्य दिसत नसला तरी चंद्राच्या पाठीशी असतो!"

बारामतीतून मोठ्या मताधिक्यानं निवडून आल्यानंतर सुनेत्रा पवार काय म्हणालेल्या? 

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं निवडून आल्यानंतर सुनेत्रा पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी बारामतीकरांचे आभार मानताना अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिलाय. त्या म्हणाल्या की. "अजितदादांच्या निधनानंतरची ही माझी पहिलीच निवडणूक. मला ही निवडणूक लढवावी लागेल, अशी कधी कल्पनाही केली नव्हती. बारामतीच्या जनतेनं दिलेली ही मतं अजित दादांना वाहिलेली खरी आदरांजली आहे. बारामती हे माझं कुटुंब आहे आणि विकासाचा हा वारसा मी पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहीन..." 

'त्या' प्रकरणावरुन ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उषा चव्हाण चिडल्या; थेट सरकारला अल्टिमेटम देत म्हणाल्या...

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.