आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमादरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान आणि बांग्लादेश दौऱ्यातील मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलिया या दोन्ही दौऱ्यात एकूण 9 सामने खेळणार आहे. निवड समितीकडून या दोन्ही दौऱ्यांसाठी एकूण 24 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तसेच निवड समितीने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात खेळणाऱ्या खेळाडूंबाबतही माहिती दिली आहे. आयपीएल 2026 स्पर्धेत सध्या ऑस्ट्रेलियाचे 7 खेळाडू खेळत आहेत. या निमित्ताने ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान आणि बांग्लादेश दौऱ्याबाबत जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान दौऱ्याची सुरुवात 30 मे पासून होणार आहे. तर 2 आठवड्याने बांगलादेश दौऱ्याची सुरुवात होणार आहे. या दौऱ्याला 9 जूनपासून सुरुवात होणार आहे. निवड समितीने दोन्ही दौऱ्यांसाठी युवा खेळाडूंना संधी दिली आहे.
ऑस्ट्रेलिया पाकिस्तान विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. उभयसंघात 30 मे ते 4 जून दरम्यान हे सामने खेळवण्यात येणार आहेत. हे सामने रावळपिंडी आणि लाहोरमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. ऑली पीक याला संधी देण्यात आली आहे. ऑलराउंडर लायम स्कॉटचा समावेश करण्यात आला आहे. लायमला बांगलादेश दौऱ्यासाठीही संधी देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात 9, 11 आणि 14 जून दरम्यान एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. तर 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. उभयसंघात 17, 19 आणि 21 मे रोजी टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत. उभयसंघातील एकदिवसीय मालिकेचा थरार हा राजधानी ढाक्यात रंगणार आहे. तर टी 20i मालिकेतील सामने हे चट्टग्राममध्ये होणार आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने आयपीएल 2026 स्पर्धेत खेळणाऱ्या 7 खेळाडूंबाबत महत्त्वाची माहिती दिलीय. निवड समितीने पॅट कमिन्स याला दोन्ही दौऱ्यातून बाहेर ठेवलं आहे.
स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेड बांगलादेश दौऱ्यात टीमसह जोडला जाणार आहे. मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड या दोघांचीही निवड करण्यात आलेली नाही. तर झेव्हीयर बार्टलेट, बेन ड्वारसुईस आणि कूपर कॉनोली हे तिघे हेड प्रमाणे बांगलादेशमध्ये टीमसह जोडले जातील.
वनडे सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया टीम : मिचेल मार्श (कॅप्टन), एलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमरुन ग्रीन, जॉश इंग्लिस, मॅट कुन्हेमन, मार्नस लाबुशेन,रायली मेरेडिथ. ऑली पीक, मॅट रेनशॉ, तनवीर संघा, लायम स्कॉट, मॅथ्यू शॉर्ट, बिली स्टेनलेक आणि एडम झॅम्पा.
बांगलादेश विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम : मिचेल मार्श (कर्णधार), एलेक्स कॅरी, झेव्हीयर बार्टलेट, कूपर कॉनोली, बेन ड्वारसुइस, नॅथन एलिस, कॅमरन ग्रीन, ट्रॅव्हीस हेड, जॉश इंग्लिस, मॅट कुन्हेमन, मार्नस लाबुशेन, मॅट रेनशॉ, तनवीर संघा, लायम स्कॉट आणि एडम झॅम्पा
बांगलादेश विरूद्धच्या टी 20i सीरिजसाठी टीम : मिचेल मार्श (कप्तान), टिम डेविड, जेवियर बार्टलेट, कूपर कॉनोली, जोएल डेविस, आरोन हार्डी, नाथन एलिस, कैमरन ग्रीन, ट्रेविस हेड, जॉश इंग्लिस, स्पेन्सर जॉनसन, मैट कुन्हेमन, राइली मेरेडिथ, जोश फिलिप, मैट रेनशॉ आणि एडम झॅम्पा.