जळगाव - औद्योगिक वसाहत परिसरातील एस-सेक्टरमधील लक्ष्मी ॲग्रो कंपनीतील २६ वर्षीय कामगाराचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कंपनीत तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झाल्यावर त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दीपक छगन भिल (वय २६, मूळ रा. खर्डी, ता. चोपडा) असे मृताचे नाव असून, संबंधित कंपनी चालकांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा मृताच्या नातेवाइकांनी घेतल्याने रात्री उशिरापर्यंत मृतदेह जिल्हा रुग्णालयातच होता.
औद्योगिक वसाहत परिसरातील एस-सेक्टरमधील लक्ष्मी ॲग्रो या कंपनीत दीपक छगन भिल (वय २६) हा कामाला होता. कंपनीने त्याला आवारातच राहण्यासाठी घरही दिले असल्याने पत्नी शीतल आणि तीन मुलांसह तो तेथेच वास्तव्यास होता. शनिवारी सायंकाळी तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला. तत्काळ कंपनीतील कामगारांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत दीपक हा कंपनीच्या आवारतच राहत असलेल्या इमारतीवरुन खाली पडल्याचे पोलिसांचे म्हणणे असून, आमच्या मुलासोबत घातपात झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
एक तासापूर्वीच बोलणे
घडल्या प्रकरणाबाबत माहिती देताना लोकसंघर्ष मोर्चाचे पदाधिकारी सचिन धांडे यांनी सांगितले, की घटना घडण्याच्या एक तासापूर्वी दीपकने त्याच्या वडिलांना फोन करून सांगितले, की मला कंपनीत खूप त्रास होतोय, त्यानंतर थेट त्याच्या मृत्यूची माहिती कळाली. कुटुंबीय रुग्णालयात पोहोचण्याआधीच दीपकच्या मृतदेहावर शवविच्छेदन करुन झाले होते. या सर्व प्रकरणात गुन्ह्याची दाबादाब करणे सुरू असून, गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पावित्रा यावेळी घेण्यात आला आहे.
मृतदेह घेण्यास नकार
घटनेची माहिती कळाल्यावर मृताचे वडील छगन सुखराम भिल, कुटुंबीय नातेवाईकांसह जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांना मृतदेह ताब्यात घेण्यास सांगितल्यावर त्यांनी नकार देत माझा मुलाचा घातपात झाल्याचा संशय यावेळी व्यक्त केला. घटनेचे वृत्त कळाल्यावर आदिवासी एकता परिषद, लोकसंघर्ष मोर्चा यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते.
शिष्टमंडळाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत संबंधित कंपनी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. संबंधीतांवर गुन्हा दाखल होत नाही, तोवर आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पावित्रा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह कुटुंबीयांनी घेतल्याने रात्री उशिरापर्यंत जिल्हा रुग्णालयात गर्दी कायम होती.