पुणे - शहरातील कल्याणीनगर भागातील ‘स्काय लाउंज’ या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील एका टेरेस फ्लॅटला सोमवारी (ता. ११) सायंकाळी आग लागली. या आगीत घरातील टीव्ही, फ्रिज, एसी यांसह इतर घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मात्र, अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. त्यामुळे इमारतीमधील इतर घरांना लागणारा मोठा धोका टळला. अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर येथील ‘स्काय लाउंज’ इमारतीत सोमवारी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
दहाव्या मजल्यावर असलेल्या एका टेरेस फ्लॅटमधून अचानक धुराचे लोट येऊ लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. वाऱ्याचा वेग आणि ज्वलनशील साहित्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले होते. परंतु आग लागताच इमारतीमधील रहिवासी सुरक्षितपणे बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.
आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. येरवडा अग्निशामक केंद्राचे प्रभारी अधिकारी संजय जाधव, बी. टी. कवडे रस्ता केंद्राचे प्रभारी अधिकारी नीलेश लोणकर आणि जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून काही वेळातच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.