Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने
esakal May 12, 2026 01:45 AM

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील ग्रँट रोड स्थानकात सोमवारी सायंकाळी रेल्वे रूळ ओलांडत असताना एक प्रवासी लोकलखाली आल्याची गंभीर घटना घडली. या घटनेमुळे विरार दिशेकडील लोकल वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. सायंकाळच्या गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. काही काळ लोकल वाहतूक ठप्प झाली होती, तर सहा डाउन लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

पश्चिम रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी ७.५८ वाजण्याच्या सुमारास ग्रँट रोड स्थानकाजवळ एक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडत असताना लोकलखाली आला. ही घटना लक्षात येताच संबंधित लोकल तत्काळ थांबविण्यात आली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दल, स्थानक प्रशासन आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! पुनर्विकासात आता फक्त घरे नाहीत; पायाभूत सुविधांनाही प्राधान्य मिळणार

घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव संबंधित मार्गावरील वाहतूक काही काळ थांबवून ठेवण्यात आली होती. त्यामुळे डाउन मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली. सायंकाळच्या गर्दीच्या वेळी अनेक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. काही ठिकाणी फलाटांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते.

सुमारे २२ मिनिटांनंतर रात्री ८.२० वाजता संबंधित लोकल पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, तोपर्यंत वाहतुकीचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले होते. या घटनेमुळे पश्चिम रेल्वेने डाउन मार्गावरील सहा लोकलफेऱ्या रद्द केल्या. तसेच अनेक लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. नंतर हळूहळू वाहतूक पूर्ववत करण्यात आली. सध्या लोकल सेवा सुमारे पाच मिनिटे उशिराने सुरू असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.

Mumbai Water Supply: मुंबईकरांनो सावधान! १५ मेपासून पाणीपुरवठ्यात कपात; बीएमसीचा मोठा निर्णय रूळ ओलांडणे धोकादायक

दरम्यान, मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गांवर रेल्वे रूळ ओलांडण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, अशा घटनांमुळे केवळ जीवितहानीच नाही तर संपूर्ण रेल्वे वाहतुकीवरही परिणाम होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. प्रवाशांनी जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडू नयेत, असे आवाहन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.