अस्थिबोध : गर्भवती महिलांमधील पाठदुखी
esakal May 12, 2026 07:45 AM

डॉ. अजय कोठारी, कन्सल्टंट स्पाइन सर्जन

गर्भधारणा हा स्त्रीच्या आयुष्यातील आनंदाचा आणि जबाबदारीचा काळ असतो. मात्र, याच काळात अनेक महिलांना पाठदुखीचा त्रास जाणवू लागतो. ‘ही वेदना नॉर्मल आहे का?’ असा प्रश्न बहुतेक वेळा विचारला जातो. काही प्रमाणात अस्वस्थता नैसर्गिक असली, तरी सततची किंवा वाढत जाणारी पाठदुखी दुर्लक्षित करणं योग्य नाही. योग्य माहिती, सुरक्षित व्यायाम आणि थोडीशी काळजी घेतली, तर गर्भवती असलेल्या काळातही पाठदुखी नियंत्रणात ठेवता येते.

गर्भधारणा काळात पाठदुखी का होते?

गर्भधारणेदरम्यान शरीरात अनेक बदल होतात :

  • वाढतं वजन आणि पोट पुढे येणं

  • कण्याच्या नैसर्गिक वक्रतेत बदल

  • रिलॅक्सिन हार्मोनमुळे सांधे सैल होणं

  • पोट व कंबरेच्या स्नायूंवर ताण

  • पोस्चरमध्ये बदल

या सगळ्यांचा परिणाम म्हणजे कंबर आणि पाठदुखी.

कोणत्या महिलांना जास्त त्रास होऊ शकतो?

  • गर्भधारणेपूर्वी पाठदुखी असलेल्यांना

  • जास्त वजन असलेल्या महिलांना

  • दिवसभर उभं किंवा बसून काम करणाऱ्यांना

  • व्यायामाची सवय नसलेल्या महिलांना

  • दुसऱ्या-तिसऱ्या गर्भधारणेत असलेल्या महिलांना

गर्भधारणा काळात सुरक्षित असलेले व्यायाम

१) पेल्विक टिल्ट : पाठीवर झोपून गुडघे वाकवून कंबर हलकी दाबा. हा व्यायाम कंबरेचा ताण कमी करतो.

२) कॅट–कॅमल स्ट्रेच : चार हातांवर येऊन पाठ हळू वर-खाली करा. हा व्यायाम कणा सैल ठेवतो.

३) वॉकिंग : दररोज १५-२० मिनिटं चालणं सुरक्षित आणि फायदेशीर आहे.

४) साइड लायिंग लेग लिफ्ट : कुल्ह्याचे स्नायू मजबूत होतात, कण्याला आधार मिळतो.

५) डीप ब्रीदिंग : तणाव कमी होतो आणि स्नायू सैल होतात.

बसणं, उभं राहणं आणि झोपण्याची काळजी

  • उभं राहताना पाठ सरळ ठेवा

  • बसताना पाठीला आधार द्या

  • जड वस्तू उचलू नका

  • झोपताना डाव्या कुशीवर झोपा

  • पायांमध्ये उशी ठेवा

हे छोटे बदल मोठा आराम देतात.

कोणत्या गोष्टी टाळाव्यात?

  • अचानक वाकणं

  • जोरदार व्यायाम

  • पाठीवर दीर्घ वेळ झोपणं

  • टाचांचे सॅंडल किंवा चपला

  • स्वतःहून वेदनाशामक औषधं

डॉक्टरांना कधी भेटावे?

  • तीव्र, वाढत जाणारी पाठदुखी

  • पायात जाणारी वेदना

  • सुन्नपणा किंवा कमजोरी

  • चालण्यात अडचण

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

गर्भवती असतानाच्या काळातील पाठदुखी ही कमकुवतपणाची खूण नाही; ती शरीर बदलत असल्याचा संकेत आहे. योग्य व्यायाम, सुरक्षित हालचाल आणि सकारात्मक मानसिकता ठेवल्यास हा काळ अधिक सुखकर होऊ शकतो. स्वतः सुरक्षित राहा, योग्य हालचाल ठेवा आणि गरज असेल तेव्हा तज्ज्ञांचा सल्ला घ्या - कारण निरोगी आईच निरोगी बाळ घडवते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.