जीवनमान-जीवनभान : हृदयविकार आणि व्यायाम
esakal May 12, 2026 07:45 AM

डॉ. प्राजक्ता सहस्रबुद्धे (पीटी), प्राध्यापक आणि सल्लागार, कार्डिओव्हॅस्क्युलर अँड रेस्पिरेटरी फिजिओथेरपी

आज भारतातील प्रत्येक दहाव्या व्यक्तीमध्ये हृदयविकार आढळतो. विशेष म्हणजे या आजाराचे निदान होण्याचे वयही कमी होत चालले आहे. यामागे वाढलेली जागरूकता आणि आधुनिक निदानचाचण्या कारणीभूत असल्या, तरी शहरीकरण, ताणतणाव आणि बदलती जीवनशैली ही प्रमुख कारणे मानली जातात. अशा परिस्थितीत व्यायामाचे महत्त्व समजून घेण्यासाठी प्रथम हृदयविकाराची प्रक्रिया जाणून घेणे आवश्यक आहे.

हृदयविकाराची प्रक्रिया

वाढत्या वयानुसार रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये काठीण्य येते. त्यांच्या आतील भिंतीवर कोलेस्टेरॉलचा थर जमा होऊन रक्तप्रवाह कमी होत जातो. ही प्रक्रिया हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये झाली तर हृदयाला ऑक्सिजन आणि पोषकद्रव्यांचा पुरवठा अपुरा पडतो. त्यामुळे छातीत दुखणे, दम लागणे किंवा हृदयाची कार्यक्षमता कमी होणे अशी लक्षणे दिसू शकतात. ही स्थिती अधिक गंभीर झाली आणि रक्तपुरवठा वेळेत पूर्ववत झाला नाही, तर हार्ट अटॅक किंवा हार्ट फेल्युअरसारखे जीवघेणे परिणाम होऊ शकतात.

धमनीकाठीण्य (atherosclerosis) होण्यामागे वाढते वय आणि आनुवंशिकता यांसोबतच धूम्रपान, तंबाखू सेवन, उच्च रक्तदाब, मधुमेह, वाढलेले वजन आणि व्यायामाचा अभाव ही महत्त्वाची कारणे आहेत. अशा वेळी औषधे, अँजिओप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रिया यांमुळे रक्तपुरवठा सुधारता येतो; परंतु जीवनशैलीतील सकारात्मक बदलांचे फायदे अधिक प्रभावी ठरतात. कार्डियाक प्रेहॅबिलिटेशन अथवा रिहॅबिलिटेशन हे यावरचे दीर्घकालीन औषध आहे. या लेखात आपण कार्डियाक रिहॅबिलिटेशनच्या व्यायामाच्या पैलूवर अधिक भर देणार आहोत.

प्राथमिक स्तरावरील प्रतिबंध

हृदयविकार होऊच नये यासाठी घेतलेली काळजी म्हणजे प्राथमिक प्रतिबंध. ज्या व्यक्तींमध्ये कौटुंबिक इतिहास, स्थूलता, उच्च रक्तदाब, मधुमेह, व्यायामाचा अभाव किंवा तंबाखूचे व्यसन आहे, त्यांच्यामध्ये हृदयविकाराचा धोका अधिक असतो.

अशा वेळी संतुलित आहार, मानसिक तणावाचे नियोजन आणि नियमित व्यायाम अत्यंत महत्त्वाचे ठरतात. दिवसातून किमान ३० ते ४० मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम करणे उपयुक्त मानले जाते. म्हणजे व्यायाम करताना हृदयगती मध्यमपणे वाढेल किंवा मध्यम प्रमाणात थकवा जाणवेल इतकी तीव्रता योग्य ठरते. यात चालणे, धावणे, पोहोणे, सायकल चालवणे याशिवाय स्नायूंची बळकटी वाढवणारे व्यायामही केले जातात.

व्यायामाचे अनेक स्तरांवर फायदे होतात. नियमित व्यायामामुळे रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढते, रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात राहतो, कोलेस्टेरॉल आणि वजन कमी होण्यास मदत होते. व्यायामामुळे मेंदूमध्ये ‘हॅपी हार्मोन्स’ स्रवतात, ज्यामुळे मानसिक तणाव कमी होतो. संशोधनानुसार व्यायाम व्यसनमुक्तीतही मदत करतो.

व्यायाम हृदयाला सुरक्षित आणि संवर्धक स्वरूपाचे आव्हान देतो, ज्यामुळे शरीरात सकारात्मक बदल घडतात. मात्र, दोनपेक्षा अधिक जोखीम घटक असलेल्या व्यक्तींनी व्यायाम सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञ फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

माध्यमिक स्तरावरील प्रतिबंध

धमनीकाठीण्य ही वाढत्या वयाबरोबर होणारी प्रक्रिया असल्याने ती पूर्णपणे टाळणे शक्य नसते. त्यामुळे काळजी घेतली, तरी काही व्यक्तींमध्ये हृदयविकाराचे निदान होऊ शकते. पण अशा वेळीही जीवनशैलीतील बदल अत्यंत फायदेशीर ठरतात. हार्ट ॲटॅकनंतर अँजिओप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रिया झाल्याने रक्तप्रवाह सुधारतो; परंतु त्यामुळे रक्तवाहिन्या पूर्णपणे ‘पूर्ववत’ झाल्या असे होत नाही. भविष्यात पुन्हा ब्लॉकेज होण्याची शक्यता राहू शकते.

नियमित व्यायाम आणि योग्य आहारामुळे रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते आणि पुनरावृत्तीचा धोका कमी होतो. व्यायामामुळे हृदयाच्या स्नायूंची ताकद वाढते आणि ते अधिक कार्यक्षमतेने रक्त पंप करू शकतात. हात, पाय आणि धडाचे स्नायू सक्षम झाल्याने शारीरिक फिटनेस, दैनंदिन कार्यक्षमता, सामाजिक सहभाग आणि जीवनाचा दर्जा सुधारतो.

मात्र, या टप्प्यावर व्यायाम वैद्यकीय स्थितीनुसार आणि सहनशक्तीनुसारच असावा. अचानक तीव्र व्यायाम किंवा कठोर आहारबदल शरीरावर ताण आणू शकतात. त्यामुळे कार्डियाक फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करणे अत्यावश्यक ठरते. हृदयविकार हा केवळ औषधांनी किंवा शस्त्रक्रियांनी नियंत्रित होणारा आजार नाही. योग्य जीवनशैली, नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि मानसिक आरोग्याची काळजी या गोष्टी प्रभावी प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक औषधच आहे. हृदयविकारातून वाचणे महत्त्वाचेच, पण पुन्हा पूर्वीसारखे जगता येणे अधिक महत्त्वाचे!

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.