अॅड. अभिधा निफाडे
काल सकाळी जाग आली तेव्हा घड्याळात आठ वाजून गेले होते. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऑफिसला उशीर होणार बहुतेक, या विचाराने उठतानाच जरा चिडचिड झाली. पटकन आवरून सँडविच डब्यात टाकलं आणि स्टेशनवर गेले. लोकलमध्ये बसल्यावर सहजच वेळ घालवण्यासाठी इंस्टाग्राम उघडलं.
पहिल्याच पोस्टमध्ये खिडकीतून येणारा हलका प्रकाश, त्याच्या बाजूला वाफाळता कॉफीचा मग, उघडलेलं पुस्तक, आणि त्याखाली कॅप्शन ‘दिवसाची शांत सुरुवात.’ क्षणभर त्या फोटोचा हेवा वाटला. मनात आलं, ही अशी सकाळ पाहिजे, नाहीतर माझी सकाळ! लोकलचा आवाज, आजूबाजूची गर्दी, स्टेशनावरचा गोंगाट, हातात डबा-पाण्याची बाटली आणि डोक्यात ऑफिसला उशीर होण्याची चिंता! त्यानंतर पुढची पोस्ट बघते तर कुणीतरी व्यायाम करून परतलं होतं, प्रोटिन आणि कार्ब्ज यांचा समतोल साधत सुबकतेने नाश्ता बनवत होतं.
जसजसं मी पुढच्या पोस्ट पाहत गेले, तसं एक गोष्ट हळूहळू लक्षात येऊ लागली. या सगळ्या सकाळ जणू काही आधीच ठरवून, नीट आखून जगल्या जात आहेत काहीही अचानक घडलेलं नाही, काहीही विस्कळीत नाही. आणि मग नकळत माझी नजर पुन्हा स्वतःकडे वळली. सकाळपासून मी किती गोष्टी ‘जुळवून’ करत होते. पण त्या सगळ्याला कुठेच सौंदर्य नव्हतं, कुठेच फिल्टर नव्हता. इंस्टाग्रामवरच्या त्या सकाळ इतक्या नीटनेटक्या दिसत होत्या की माझी वास्तविक सकाळ त्यांच्या शेजारी अगदी गोंधळलेली, साधी वाटू लागली.
खरंतर माझ्या मनात नकळत झालेली तुलना ही केवळ दोन वेगळ्या प्रकारच्या सकाळमध्ये नव्हती; ती दोन भिन्न जगण्याच्या पद्धतींमध्ये होती. एक, जी प्रत्यक्षात घडत होती; आणि दुसरी, जी खास प्रयत्नांनी दाखवली जात होती.
इन्स्टाग्रामच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या त्या क्षणांत ‘चूक’ असण्याला जागाच नव्हती. असंच जगायला हवं, हा संदेश जितका ते ठासून देत होते, तितकाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त असं जगता आलं नाही, तर आयुष्यात काहीतरी कमतरता आहे, अशी एक सूक्ष्म जाणीव ते फोटो मनात नकळत रुजवत होते.
ऑनलाइन ‘दिसणं’ हे आता एक स्वतंत्र कौशल्य बनलं आहे. योग्य क्षण ओळखणं, त्याला योग्य स्वरूप देणं, आणि त्याला एका विशिष्ट अर्थाने सादर करणं या सगळ्यांचा समावेश या प्रक्रियेत होतो. ज्या गोष्टी आपण ऑनलाइन पाहतो, त्या केवळ प्रेरणा देत नाहीत, तर त्या कसं जगावं, काय असावं, काय घ्यावं याचं एक मापक तयार करतात. काही दिवसांपूर्वी एका मित्राने विचारलं ‘काय मग या वीकेंडला काय प्लॅन आहे?’ खरं तर माझं खास काही ठरलेलं नव्हतं. घरी राहायचं, थोडा आराम करायचा आणि आठवड्यात जमली नाहीत ती घरातली कामं उरकायची असा विचार होता. पण ते उत्तर देताना नकळत थोडंसं अडखळायला झालं. मग मी पटकन काहीतरी ‘प्लॅन’ सांगून विषय बदलला. असं का झालं असावं बरं, असा विचार जेव्हा नंतर मनात आला तेव्हा वाटलं वीकेंडला म्हणजे कुठेतरी फिरणं, नवीन कॅफे, ट्रेक, किंवा निदान एखादी तरी ‘पोस्ट करण्यासारखी’ गोष्ट अस काहीतरी ठरलेलं चित्र मनात तयार झालं आहे. यापैकी आपण काहीच करणार नाही त्यामुळे आपण इतरांना कंटाळवाणे तर वाटणार नाही, अशी भीती मला वाटली असावी का? याचं उत्तर होकारार्थीच होतं.
ऑफलाइन जगणं मात्र नेहमीच थोडं विस्कळीत आणि अपूर्ण असतं. आपण स्क्रीनवर जे पाहतो, तेही केवळ कोणाचं आयुष्य नसतं, ते त्या आयुष्याचं संपादित रूप असतं. जसं एखादं पुस्तक वाचताना आपण फक्त छापलेले शब्द पाहतो, पण त्यामागचा मसुदा, खाडाखोड, पुनर्लेखन दिसत नाही, तसंच काहीसं इथेही घडत असावं. त्या फोटोमध्ये दिसणारा क्षण खरा असू शकतो, पण तो पूर्ण नसतो. तो एका मोठ्या, अधिक गुंतागुंतीच्या जगण्याचा काळजीपूर्वक निवडलेला फक्त एक भाग असतो. त्यामुळे स्क्रीनवर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी स्वतःच्या आयुष्याची थेट तुलना करण्याची गरज नसते. हा फरक लक्षात घेतला, की प्रत्येक क्षण अर्थपूर्ण असण्यासाठी तो तसा परफेक्ट ‘दिसणं’ आवश्यक आहे, हा अट्टहास थोडा कमी होऊ शकेल. सतत आजूबाजूला मीडियाचा भडीमार असल्याने ते सोपं नाही, पण यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करूया.
या विचारांच्या तंद्रीतच माझं स्टेशन आलं. निघताना झालेली चिडचिड आता विरली होती, उतरून स्टेशनाबाहेरचा फक्कड चहा घेतला आणि मी अनफिल्टर्ड दिवसासाठी सज्ज झाले.