डॉ. जयदेव पंचवाघ, मेंदू आणि स्पाइन सर्जन
आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाने व्यापलेल्या जीवनात ‘पाठदुखी’ आणि ‘कंबरदुखी’ ही एक इतकी ‘कॉमन’ समस्या आहे की जवळजवळ ९० टक्के लोकांना ती कमी-अधिक प्रमाणात होतेच. आपल्यातल्या प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी, कोणत्या तरी टप्प्यावर या त्रासाला सामोरे जावं लागतं. मग तो तासन्तास लॅपटॉपसमोर चुकीच्या पद्धतीने बसून काम करणारा आयटी व्यावसायिक असो, घरकामात सतत उभी राहणारी गृहिणी असो, ‘खड्डेमय’ रस्त्यांवरून रोज दुचाकीवरून प्रवास करणारा चाकरमानी असो, किंवा शेतात राबणारा शेतकरी असो. ही समस्या इतकी ‘कॉमन’ झाली आहे, की आपण तिला आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भागच मानून चालतो. परंतु, नेमक्या याच दुखण्यामध्ये कधीकधी धोका दडलेला असू शकतो.
ही समस्या ‘कॉमन’ असल्यामुळेच अनेकदा एखाद्या गंभीर आजाराची पाठदुखी आपल्याकडून दुर्लक्षित होते. ‘असेल काहीतरी, थोडा बाम लावला किंवा एक गोळी घेतली की बरं वाटेल,’ अशा निष्काळजीपणामुळे अनेक रुग्ण तज्ज्ञांपर्यंत खूप उशिरा पोहोचतात, आणि तोपर्यंत आजाराने गंभीर स्वरूप धारण केलेले असते.
सुरुवातीला आपण साध्या प्रकारात मोडणाऱ्या पाठदुखीबद्दल जाणून घेऊया. ही खूपच ‘कॉमन’ आहे. मैदानावर खेळताना अचानक लचक भरणे, व्यायामाचा अतिरेक करणे, पुरेशी पूर्वतयारी (वॉर्म-अप) न करता व्यायाम करणे, किंवा चुकीच्या पद्धतीने वाकून जड वजन उचलणे यामुळे कंबरेचे किंवा पाठीचे स्नायू दुखावतात. कंबरेचा स्नायू अथवा अस्थिबंध (Ligaments) अवघडून ही पाठदुखी सुरू होते. सलग अनेक तास एकाच स्थितीत बसल्यामुळेही पाठीत ताठरता येते.
अशा प्रकारची पाठदुखी साधारणपणे थोडी विश्रांती घेतली, दोन-पाच दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने साध्या वेदनाशामक गोळ्या घेतल्या, किंवा शास्त्रीय पद्धतीनं हलकासा मसाज केला, तर हमखास कमी होते आणि काही दिवसांत पूर्णपणे थांबते. गरम पाण्याच्या पिशवीने शेकल्यास चांगला आराम मिळतो. ही साध्या प्रकारात मोडणारी पाठदुखी होय, जिच्यासाठी फार घाबरून जाण्याचे किंवा चिंता करण्याचे कोणतेही कारण नसते.
पाठदुखीचे ‘रेड फ्लॅग्ज’
जेव्हा पाठदुखीच्या लक्षणांमध्ये काही ‘लाल कंदील’ किंवा धोक्याचे इशारे दिसू लागतात, तेव्हा खरा प्रश्न निर्माण होतो. हे लाल कंदील म्हणजे शरीराने एखाद्या मोठ्या आजाराची दिलेली पूर्वसूचना असते. खालीलपैकी कोणतीही लक्षणे तुमच्या पाठदुखीत दिसत असतील, तर ती पाठदुखी एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असण्याची दाट शक्यता असते. योग्य वेळी तपासणी, अचूक निदान आणि तातडीने उपचार केल्यास भविष्यातील मोठे प्रसंग टळतात.
मार लागल्यामुळे सुरू झालेली वेदना : जी पाठदुखी पाठीला किंवा कंबरेला जोराचा मार लागल्यामुळे, अपघात झाल्यामुळे किंवा उंचावरून पडल्यामुळे सुरू होते आणि कमी न होता सतत वाढत जाते, ती अजिबात अंगावर काढू नये.
रात्रीची तीव्र वेदना आणि झोपमोड : जी पाठदुखी रात्रीच्या वेळी अचानक वाढते आणि तीव्र वेदनेनं तुमची शांत झोपमोड करते, ती सामान्य नसते. उताणं झोपून विश्रांती घेतली, तरी वेदना कमी होत नसेल, तर हे धोक्याचे लक्षण आहे.
पाठदुखीबरोबर येणारा ताप : पाठदुखीबरोबरच तुम्हाला सतत ताप येत असेल, तर हे मणक्यात किंवा पाठीच्या स्नायूंमध्ये इन्फेक्शन (उदा. मणक्याचा क्षयरोग किंवा टीबी) झाल्याचे स्पष्ट लक्षण असू शकते.
अचानक वजन कमी होणे : पाठदुखी सुरू असल्याच्या काळात कोणतेही विशेष प्रयत्न न करता तुमचे वजन हळूहळू; पण लक्षणीयरीत्या कमी होत असेल, तर ती पाठदुखी गंभीर समजावी.
वैद्यकीय इतिहास : ज्या व्यक्तींना पूर्वी कॅन्सर होऊन गेलेला आहे, किंवा ज्यांना हाडांच्या ठिसूळपणाचा आजार आहे, वयाची पन्नाशी ओलांडली आहे, त्यांनीही साधी वाटणारी पाठदुखी सुरू झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते. ठिसूळ हाडांमुळे किरकोळ धक्क्यानेही मणक्याला फ्रॅक्चर होऊ शकते.
मज्जासंस्थेशी निगडित लक्षणे
काही वेळेला कंबरदुखी, पाठदुखी किंवा मानदुखीबरोबर मणक्याच्या आतल्या नसांवर किंवा मुख्य मज्जारज्जूवर (Spinal Cord) दाब आलेला असतो. मणक्यातील चकती सरकणे (Slipped Disc) किंवा मणक्याची झीज यामुळे हा दाब येऊ शकतो. असे दुखणे अत्यंत गांभीर्याने घेणे गरजेचे असते. ज्या पाठदुखीबरोबर वेदना आणि मुंग्या शरीरात इतरत्र पसरतात - उदाहरणार्थ, मानेतून हातात जाणाऱ्या वेदना, कंबरेतून पायात जाणारी कळा, किंवा छातीवर व पोटावर मुंग्या येणे - ती पाठदुखीसुद्धा गंभीर समजावी. पायात ताकद कमी झाल्यासारखी वाटणे किंवा लघवीवरील नियंत्रण जाणे ही तर तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज दर्शवणारी लक्षणे आहेत.
निदान आणि उपचारांची दिशा
इथे ‘गंभीर’ या शब्दाचा अर्थ ‘तपासून घेण्यासारखी’ असा घ्यावा. या धास्तीने घाबरून जाण्याचे कारण नाही की, यातल्या प्रत्येकालाच कॅन्सरसारखा गंभीर आजार असेल; तसेच मणक्याच्या प्रत्येक गंभीर आजारात पाठदुखी होतेच असेही नाही. परंतु शहानिशा करणे आवश्यक असते.
जेव्हा तुम्ही अशा लक्षणांसह न्युरोसर्जरी क्लिनिकमध्ये येता, तेव्हा सर्वप्रथम तज्ज्ञांकडून रुग्णाची सविस्तर शारीरिक तपासणी केली जाते. या तपासणीनंतर लक्षणांच्या तीव्रतेनुसार एक्स-रे, एमआरआय, रक्ताच्या चाचण्या, शरीरातली कॅल्शियम मोजण्याची चाचणी, किंवा हाडांची ताकद तपासण्यासाठी बोनस्कॅन (Bone Scan/DEXA) यातली एक अथवा अधिक चाचण्या करून अचूक निदान केले जाते.
थोडक्यात सांगायचे, तर पाठदुखी ही जरी आपल्या जीवनातील एक ‘कॉमन’ बाब असली, तरी शरीराने दिलेल्या इशाऱ्यांकडे डोळेझाक करणे अंगलट येऊ शकते. दुखण्याला घाबरून न जाता किंवा केवळ पेनकिलर्सवर अवलंबून न राहता, त्याचे मूळ कारण शोधणे महत्त्वाचे आहे. शरीराची भाषा समजून घ्या आणि ‘लाल कंदील’ दिसताच योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या.