Beed News: बीडमधील माता-बालसंगोपन रुग्णालय सुरू होईल कधी? आठ वर्षांनीही वाट पाहावी लागते!
esakal May 12, 2026 02:45 PM

बीड: महिला व बालकांसाठी स्वतंत्र रुग्णालय असावे यासाठी २१ कोटी रुपये खर्च करुन आठ वर्षांपूर्वी हाती घेतलेल्या माता - बालसंगोपन रुग्णालयाची इमारत दोन वर्षांपूर्वी बांधून पूर्ण झाली. मात्र, रुग्णालय कार्यान्वित झालेले नाही.

विशेष म्हणजे जिल्हा नियोजन समितीकडून तीन कोटी रुपयांचा निधी मिळूनही सार्वजनिक बांधकाम विभाग व सार्वजनिक विद्युत विभागाकडे असलेले ऑक्सिजन पाइपलाइन व लिफ्टच्या कामांना अद्यापही मुहूर्त लागलेला नाही. सार्वजनिक बांधकाम व विद्युत विभागाने यात पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी देखील लक्ष घातले तर लवकर रूग्णालय कार्यरत होऊ शकते.

Chhatrapati Sambhajinagar: दीड कोटीचा निधी मिळूनही सुविधा मिळेनात; पैठण क्रीडा संकुलाचा बोजवारा ; प्रशासकीय उदासीनतेचा खेळाडूंकडून आरोप कामे होणार तरी कधी?

दरम्यान, माता - बालसंगोपन रुग्णालयाच्या इमारत उभारणीला राष्ट्रीय आरोग्य अभियानातून निधी उपलब्ध झाला. मात्र, फर्निचर, लिफ्ट, फायर फायटींग, विद्युतीकरण आदी कामांना निधीचा मुद्दा उपस्थित झाला. दरम्यान, तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ - मुंडे व जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी पुढाकारातून जिल्हा नियोजन समितीमधून निधीही उपलब्ध झाला. परंतु, पुढेही काम संथच आहे. विशेष म्हणजे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याचा आढावा घेतला. मात्र, ऑक्सिजन पाइपलाइन, शस्त्रक्रियागृह आणि लिफ्ट ही कामे अद्यापही अपूर्णच आहेत. दोन्ही कामांची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सार्वजनिक विद्युत विभागांकडे आहे.

तरच मिळतील चांगले उपचार

या रुग्णालयामुळे महिला व बालकांच्या तपासण्या, सोनोग्राफी, प्रसुती, सिझेरिअन, बालकांच्या तपासण्या व उपचार हे स्वतंत्र या १०० खाटांच्या माता व बालसंगोपन रुग्णालयात होतील. क्षमता अधिक असल्याने गर्भवती व नवमातांना चांगले उपचार मिळतील.

आरोग्य विभागाशी बांधकामचा दुरावा का?

काम करणाऱ्या बांधकाम व विद्युत विभागाकडे पाठपुरावा करुनही दोन्ही विभाग आरोग्य विभागाला दाद देत नाहीत. त्यामुळे आता जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनीच यात पुन्हा लक्ष घालून गतीने काम करुन रुग्णालय कार्यान्वित करण्याची गरज आहे.

Premium|Child Abuse Awareness India : अस्वस्थ माता आणि धास्तावलेले बालपण; बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांनी समाजमन सुन्न गर्भवती महिला, नवमातांची हेळसांड

जिल्हा रुग्णालयाच्या खाटांची क्षमता ३२० असून रोज साडेचारशेंच्या आसपास रुग्ण अॅडमिट असतात. विशेषत: महिला विभागाच्या प्रसुती, प्रसुती पश्चात वार्डांत खाटांच्या क्षमतेपेक्षा रुग्णांची संख्या अधिक असते. परिणामी गर्भवती महिला, नवमातांची हेळसांड होण्याचा प्रकार घडतो. सोनोग्राफी विभागालाही जागा अपुरी आहे. दरम्यान, महिला व बालकांवरील उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालय असावे, या हेतूने राष्ट्रीय आरोग्य अभियानातून २१ कोटी रुपये खर्च करुन १०० खाटांच्या रुग्णालयासाठी इमारत उभारली. मात्र, काही उर्वरित कामांमुळे दोन वर्षांपासून इमारत धूळखात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.