गेल्या काही काळापासून पाकिस्तानमधील बॉम्ब स्फोटांच्या घटना वाढल्या आहेत. आज खैबर पख्तूनख्वा प्रांतात भीषण बॉम्बस्फोट झाला. या घटनेत किमान 9 जणांचा मृत्यू आणि 23 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा लष्करप्रमुख आसिम मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांची चिंता वाढली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार खैबर पख्तूनख्वा प्रांतातील लक्की मारवत जिल्ह्यातील एका गजबजलेल्या बाजारात हा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत किमान 9 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये वाहतूक पोलिस विभागातील दोन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. याशिवाय 23 जण जखमी झाले आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले की, गर्दीच्या वेळी बाजारात लोकांची गर्दी होती, त्यावेळी स्फोटकांनी भरलेल्या लोडर रिक्षामध्ये स्फोट झाला. स्फोटानंतर तात्काळ बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि मृत व जखमींना उपचारासाठी नौरंग हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
बाजारपेठेत झालेल्या या स्फोटानंतर पोलिस आणि बॉम्ब निकामी पथकाने घटनास्थळाला घेराव घालत तपास सुरू केला आहे. सध्या पुरावे गोळा करण्याचे कामही सुरू आहे. मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक बचावकार्यात सहभागी झाले असून जखमींसाठी रक्तदान करण्यासाठीही रुग्णालयात गर्दी झाली आहे.
याआधी शनिवारी रात्री बन्नू जिल्ह्यातील फतेह खेल पोलिस चौकीवर कार बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात किमान 15 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर एका नागरिकासह चार जण जखमी झाले. परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, 9 मे 2026 रोजी फतेह खेल पोलिस चौकीवर फितना-अल-ख्वारिजशी संबंधित दहशतवाद्यांनी IED हल्ला केला होता. या हल्ल्याचे नियोजन अफगाणिस्तानात आश्रय घेतलेल्या दहशतवाद्यांनी केल्याची माहिती समोर आली होती.
दरम्यान, पाकिस्तानने अफगाण भूमीचा दहशतवादी कारवायांसाठी सातत्याने वापर होत असल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या हल्ल्यास जबाबदार असलेल्या लोकांविरोधात निर्णायक कारवाई करण्याचा अधिकार पाकिस्तानला आहे असंही पाकिस्तान प्रशासनाने अफगाणिस्तान प्रशासनाला सांगितले आहे.