Forex Reserves : पाकिस्तानकडे किती परकीय चलनसाठा? भारतापेक्षा जास्त आहे की कमी?
Tv9 Marathi May 12, 2026 11:45 PM

मध्य पूर्वेत सध्या मोठा तणाव पहायला मिळत आहे. मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमती अस्थिर बनल्या आहेत. किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार पहायला मिळत आहे. जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर बनली आहे. अस्थिर अर्थव्यवस्थेमध्ये परकीय चलन साठ्याचा विषय चर्चेत आला आहे. परकीय चलन साठ्याच्या कमतरतेने भल्या-भल्या देशांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. भारत सरकारकडून आता परकीय चलन साठा वाचवण्यावर भर दिला जात आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी सोनं खरेदी करू नका, पेट्रोल-डिझेल जपून वापरा, खाद्य तेलाचा वापर कमी करा असं म्हटलं आहे. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की पाकिस्तानकडे सध्या स्थितीमध्ये किती परकीय चलनसाठा आहे? पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त परकीय चलनसाठा आहे की कमी आहे?

भारताकडे असलेला परकीय चलनसाठा हा पाकिस्तानच्या तुलनेत तब्बल 32 पटीने जास्त आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार भारताकडे 690.69 बिलियन डॉलर एवढा परकीय चलनसाठा आहे. भारताकडे असलेला परकीय चलनसाठा हा पाकिस्तानच्या तुलनेत खूप जास्त आहे. पाकिस्तानकडे सध्या 21.29 बिलियन डॉलर एवढा परकीय चलनसाठा आहे. याचाच अर्थ भारताकडे पाकिस्तानच्या तुलनेत 32 पटीने अधिक परदेशी चलनसाठा आहे. यावरून दोन्ही देशांमधील निर्यात, गुंतवणूक आणि औद्योगिक विकास याचा अंदाज येतो. आर्थिक दृष्या भारत हा पाकिस्तानच्या खूप पुढे आहे.

पाकिस्तानकडे किती परकीय चलनसाठा?

स्टेट ऑफ पाकिस्तानच्या आकडेवारीनुसार पाकिस्तानकडे 30 एप्रिल 2026 पर्यंत एकूण 21.29 बिलियन डॉलर एवढा परकीय चलनसाठा आहे. यातील 15.85 बिलियन डॉलर एवढं परकीय चलन हे पाकिस्तानच्या केंद्रीय बँकेकडे आहे. तर 5.44 बिलियन डॉलर चलन हे पाकिस्तानमध्ये असलेल्या इतर व्यापारी बँकांकडे आहे. भारताच्या तुलनेत पाकिस्तानचा परकीय चलनसाठा हा खूपच कमजोर मानला जातो. पाकिस्तान भारताच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वस्तूंची आयात करतो, निर्यात खूपच कमी आहे, त्यामुळे त्यांच्या परकीय चलनसाठ्याला त्याचा मोठा फटका बसतो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.