सध्या देशभरातील मेडिकल दुकानांनी एकदिवसीय संप पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्रीचे (E-Pharmacies) वाढते जाळे, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अव्यावसायिक सवलती आणि बनावट औषध विक्रीमुळे धोक्यात आलेला किरकोळ औषध व्यवसाय वाचवण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या हाकेला प्रतिसाद देत राज्यातील लाखो मेडिकल दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, आणि नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये या संपाला १०० टक्के प्रतिसाद मिळत आहे. मात्र भारतात डॉक्टर, नर्सेस किंवा रुग्णालयातील इतर कर्मचारी संप करू शकतात का? आणि यावर कायदा काय सांगतो, ते अगदी सोप्या शब्दात समजून घेऊया.
रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून सरकार रुग्णालयांमध्ये एस्मा (अत्यावश्यक सेवा कायदा) लागू करू शकते. एकदा का हा कायदा लागू झाला, की डॉक्टरांना संप करता येत नाही. तरीही संप सुरू ठेवल्यास, संबंधित कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकणे किंवा अटक करणे यासारखी कडक कारवाई होऊ शकते.
संपाच्या काळात वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे जर एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला किंवा त्याचा आजार बळावला, तर त्याचे कुटुंब डॉक्टर किंवा रुग्णालयाविरोधात वैद्यकीय निष्काळजीपणाचा (Medical Negligence) खटला दाखल करू शकते.