नवी दिल्ली : केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडवीय यांनी ईपीएफओनं यूपीआयद्वारे पीएफ खात्यातून पैसे काढण्याच्या प्रक्रियेची चाचणी पूर्ण केली असल्याची माहिती दिली. ही सुविधा येत्या एका महिन्यात सुरु होऊ शकते, असंही मांडवीय म्हणाले. नवी सुविधा लागू झाल्यानंतर पीएफ खातेदारांना पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी पूर्ण कराव्या लागणाऱ्या क्लेम प्रक्रियेतून दिलासा मिळेल. ईपीएफओकडून कोट्यवधी सदस्यांसाठी नव्या आणि अपडेटेड सुविधा सुरु करण्यात येत आहेत.
सध्या ईपीएफओचे सदस्य त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी ऑनलाइन क्लेम करावा लागतो. त्यानंतर प्रोसेसिंगनंतर पैसे खात्यात येतात. गेल्या काही दिवसांपासून ऑटो सेटलमेंट सिस्टीम लागू करण्यात आल्यानंतर हा वेळ 3 दिवसांवर आला आहे. सरकारला ही प्रक्रिया आणखी वेगवान करायची आहे.
नव्या यंत्रणेनुसार यूपीआय एपद्वारे ईपीएफ खात्यातील शिल्लक रक्कम पाहता येणार आहे. याशिवाय जितकी रक्कम पीएफ खात्यातून काढण्यासाठी उपलब्ध असेल तर यूपीआयद्वारे तातडीनं बँक खात्यात वर्ग करता येईल. यासाठी केवळ लिंक्ड यूपीआय पिन नोंदवावा लागेल, त्यानंतर पैसे थेट खात्यात येतील. बँक खात्यात पैसे आल्यानंतर खातेदार एटीएम वापरुन पैसे काढू शकतात, याशिवाय यूपीआयद्वारे ऑनलाईन व्यवहार करु शकतात.
यूपीआयद्वारे पीएफ खात्यातील रक्कम काढण्यात येणार असली तरी ठराविक रक्कम फ्रीज राहील. म्हणजेच कर्मचारी आवश्यकता असेल तेव्हा वैद्यकीय खर्च, मुलांचं शिक्षण, लग्न किंवा घर खरेदी यासाठी तातडीनं पैसे काढू शकतात.
ईपीएफओकडून ही सिस्टीम लागू करण्यासाठी सॉफ्टवेअर सिस्टीममध्ये मोठे बदल केले आहेत. कोट्यवधी यूजर्सला कोणत्याही अडचणीशिवाय पैसे काढता येतील. यामुळं भारतात डिजीटल फायनान्स सिस्टीम आणखी मजबूत होईल. यूपीआयद्वारे पीएफ खात्यातील रक्कम काढण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
ईपीएफओ याशिवाय व्हाटसअपवर देखील सुविधा देण्याची तयारी करत आहे. सदस्य ईपीएफओच्या अधिकृत वेरिफाइड व्हाटसअप क्रमांकावर Hello मेसेज पाठवून पीएफ खात्यातील शिल्लक, मागील व्यवहार, क्लेम स्टेटस यासारख्या गोष्टींची माहिती मिळवू शकतात.
ईपीएफओकडून लवकरच E-PRAAPTI नावाचं नवं वेब पोर्टल लाँच केलं जाणार आहे. ज्यामध्ये जुनी आणि निष्क्रिय खाती पुन्हा सुरु करण्याचा पर्याय असेल. E-PRAAPTI हे आधार आधारित पोर्टल असेल, ज्यामुळं निष्क्रिय खाती ट्रॅक करण्यात मदत होईल.
E-PRAAPTI हे पोर्टल यूएएन क्रमांक नसला तरी खातेदारांना जुन्या खात्यांचा एक्सेस देईल, असं मनसुख मांडवीय यांनी म्हटलं होतं.
ईपीएफओनं आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 8.31 कोटी क्लेम सेटल केलं आहेत. आर्थिक वर्ष 2024-25 च्या तुलनेत 2025-26 मध्ये मोठी वाढ झाली आहे.
आणखी वाचा