मुंबई: नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून 3 मे रोजी आयोजित करण्यात आलेली नीट यूजी पेपरफुटीमुळं रद्द करण्यात आली. आता नव्यानं नीट यूजी परीक्षा 21 जून रोजी घेण्यात येणार आहे. नीट परीक्षा लांबणीवर पडल्यानं महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेशांवर परिणाम होईल अशा चर्चा सुरु झाली होती. मात्र, राज्य सामाईक परीक्षा कक्षानं अभियांत्रिकी प्रवेश वेळेतच होणार असून विद्यार्थी आणि पालकांनी संभ्रम बाळगू नये असं आवाहन केलं आहे.
राज्य सामाईक परीक्षा कक्षानं अभियांत्रिकीचे प्रवेश वेळेत होणार असल्याची माहिती दिली आहे. NEET 2026 पुनर्परीक्षेमुळे राज्यातील अभियांत्रिकी व औषधनिर्माण अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला विलंब होणार असल्याचं वृत्त प्रकाशित झाल्यानंतर CET कक्षाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नीट परीक्षा रद्द झाल्याचा फटका अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांना बसण्याच्या वक्तव्यानं गोंधळ निर्माण झालेला होता. आता मात्र राज्य सामाईक परीक्षा कक्षानं स्पष्टीकरण दिलं आहे.
महाराष्ट्रात नीट परीक्षेचे गुण केवळ 9 विशिष्ट अभ्यासक्रमांनासाठी ग्राह्य मानले जातात. हे 9 अभ्यासक्रम राज्यातील 17 शासनमान्य संस्थांमध्ये उपलब्ध असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवण्यासाठी महाराष्ट्रात एमएचटी-सीईटी आणि नीट परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात. यापैकी 85 टक्के जागांवरील प्रवेश महाराष्ट्रातील सीईटीच्या आधारे पार पडतात. तर, नीट यूजी परीक्षेतील गुण 15 टक्के जागा भरण्यासाठी ग्राह्य धरतात. अखिल भारतीय कोट्यासाठी नीट परीक्षेतील गुणांचा वापर केला जातो. या स्थितीमुळं महाराष्ट्रातील अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया वेळेत पार पडण्याची शक्यता आहे.
नीट यूजी परीक्षा लांबणीवर गेलेली आहे. तर, दुसरीकडे एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही. एमएचटी सीईटीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो. तर, नीट यूजी परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार हे 21 जूनला परीक्षा झाल्यानंतर स्पष्ट होईल.
नीट यूजी परीक्षेचे गुण आवश्यक असलेले 9 अभ्यासक्रम वगळता उर्वरित अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत. AICTE च्या नियोजित वेळापत्रकानुसारच प्रवेश प्रक्रिया होणार आहे, अशी माहिती राज्य सामाईक परीक्षा कक्षाकडून देण्यात आली आहे.
कृषी अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञान, फूड इंजिनिअरिंग, लेदर इंजिनिअरिंग, पॅकेजिंग टेक्नोलॉजी, फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग, फॅशन टेक्नोलॉजी, प्रिंटिंग इंजिनिअरिंग, टेक्सटाइल केमिस्ट्री
दरम्यान, नीट यूजी परीक्षा 21 जूनला होणार असून त्यानंतर अखिल भारतीय कोट्यातील प्रवेशासंदर्भातील स्पष्टता येईल.