सध्या सोशल मीडियावर ‘कॉक्रोज जनता पार्टी’चा विषय प्रचंड चर्चेत आहे. विविध मीम्स, व्हिडिओ आणि पोस्ट्समुळे झुरळांबद्दलची उत्सुकता पुन्हा वाढली आहे. अशातच 39 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका सुपरहिट चित्रपटातील झुरळाचा आयकॉनिक सीन पुन्हा चर्चेत आला आहे. हा सीन म्हणजे 1987 साली प्रदर्शित झालेल्या ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटातील.
याच चित्रपटातील एक प्रसिद्ध सीन म्हणजे श्रीदेवी झुरळ पाहून घाबरतात आणि थेट पलंगावर उडी मारतात. त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी भीती आणि झुरळाची शांत हालचाल पाहून प्रेक्षक खळखळून हसले होते. मात्र हा सीन शूट करताना पडद्यामागे एक वेगळीच कथा घडली होती.
या सीनबद्दलचा मजेशीर किस्सा स्वतः शेखर कपूर यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगितला होता. त्यांनी म्हटले होते की, मी आणि सिनेमॅटोग्राफर बाबा आझमी विचार करत होतो की झुरळाला सीनमध्ये कसं नियंत्रित करायचं आणि त्याच्याकडून हवी तशी हालचाल कशी करवून घ्यायची.
यानंतर त्यांनी एक भन्नाट कल्पना वापरली. सेटवर Old Monk रमची बाटली आणण्यात आली आणि झुरळासमोर रमचे काही थेंब टाकण्यात आले. सुरुवातीला झुरळ त्या थेंबांकडे आले आणि ते चाटू लागले. काही वेळातच त्याची हालचाल मंदावली आणि ते अगदी शांत झाले.