Abhijeet Dipake : नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि देशभरात अभिजीत दीपके चर्चेत आहेत. अभिजीत दीपके यांनी स्थापन केलेल्या कॉकरोच जनता पार्टीची देशभर चर्चा सुरु आहे. अभिजीत दीपके हे मूळचे महाराष्ट्रातील असून सध्या शिक्षणानिमित्त अमेरिकेतील बोस्टन येथे आहेत. अभिजीत दीपके यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन त्यांचं इन्स्टाग्राम खातं हॅक झाल्याची माहिती दिली आहे. याशिवाय बॅकअप म्हणून कॉकरोच जनता पार्टीचं काढलेलं खातं हटवण्यात आल्याची माहिती देखील दीपके यांनी शेअर केली आहे.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान देशातील युवकांचा परजिवी आणि झुरळं असा उल्लेख केला होता. दुसऱ्याच दिवशी त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलं होतं. मात्र, अभिजीत दीपके यांनी इन्स्टाग्रामवर कॉकरोच जनता पार्टी नावाचं अकाऊंट सुरु केलं. दीपके यांच्या या पार्टीच्या फॉलोअर्सच्या संख्येत नाट्यमयरित्या वाढ झाल्याचं पाहायला मिळतं. इन्स्टाग्रामवर सीजेपीचे 2 कोटींहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. मात्र, अभिजीत दीपके यांनी त्यांच्या पक्षाची सोशल मीडिया खाती हॅक करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला होता. दीपके यांचा दावा खरा ठरला असून त्यांचेच इन्स्टाग्राम खाते हॅक करण्यात आले आहे. याशिवाय बॅक अप म्हणून काढलेलं कॉकरोच जनता पार्टीचं इन्स्टाग्राम खातं देखील हटवण्यात आलं आहे.
My Instagram account has been hacked.
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) May 22, 2026
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी त्यांच्या एक्स प्लटॅफॉर्मवर त्यांना आलेल्या धमक्यासंदर्भातील व्हिडिओ आणि पोस्ट शेअर केल्या आहेत. कॉकरोच जनता पार्टीचं एक्स खातं देखील काल हटवण्यात आलं होतं. कायदेशीर विनंतीवरुन एक्स खातं भारतात ब्लॉक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. अभिजीत दीपके यांनी त्यानंतर कॉकरोच इज बॅक या नावानं नवं खातं सुरु केलं आहे. नव्या खात्याच्या फॉलोअर्सची संख्या 1 लाख 87 हजारांवर पोहोचली आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या जुन्या एक्स खात्यावरील फॉलोअर्सची संख्या 2 लाख 1 हजार इतकी होती.
अभिजीत दीपके यांनी त्यांच्या एक्स खात्यावरुन त्यांना आलेल्या धमक्यांची माहिती दिली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अभिजीत दीपके यांनी सुरु केलेल्या प्लॅटफॉर्मला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय कॉकरोच जनता पार्टीचे 94 टक्के फॉलोअर्स भारतीय असून त्यांना पाकिस्तानी ठरवण्याची घाई का करताय असा सवाल देखील त्यांनी केला आहे.