मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात महागाईचा भडका उडताना दिसते आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा झळ बसली आहे. शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. पेट्रोल प्रतिलिटर ८७ पैशांनी, तर डिझेल प्रतिलिटर ९१ पैशांनी महागले आहे. गेल्या दहा दिवसांतील ही तिसरी दरवाढ आहे.
यापूर्वी १५ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ३ रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर १९ मे रोजी पेट्रोल ८७ पैशांनी आणि डिझेल ९१ पैशांनी महागले होते. त्यामुळे अवघ्या दहा दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात जवळपास ५ रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर ९८.६४ रुपयांवरून ९९.५१ रुपये प्रतिलिटर झाला आहे. तर डिझेलचा दर ९१.५८ रुपयांवरून ९२.४९ रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचला आहे.