अधिकारी बनून 'तोतया' कारागृहाच्या आवारात गेला, पीएल ग्रुपच्या टोळीला मदत? लाल दिव्याच्या गाडीतील गौरव मिश्राचा भांडाफोड
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा May 25, 2026 06:43 PM

Nashik Crime News: नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील तीन वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यांसोबत दारू पार्टी (Liquor Party) करणाऱ्या संशयित आरोपीबाबत आता अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारे खुलासे समोर आले आहेत. अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओमध्ये दिसणारा संशयित गौरव मिश्रा हा साधासुधा आरोपी नसून, तो चक्क 'तोतया अधिकारी' (Fake Officer) बनून लोकांना गंडा घालणारा सराईत गुन्हेगार (Hardened Criminal) असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, नाशिकमधील कुख्यात 'पी एल ग्रुप'च्या (PL Group Gang) टोळीला कारागृहात बेकायदेशीर मदत मिळवून देण्यासाठीच ही पार्टी आयोजित करण्यात आल्याचा दाट संशय आता व्यक्त केला जात आहे.

Nashik Crime News: लाल दिव्याची गाडी अन् पोलीस आयुक्तालयात वचक

तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार गौरव मिश्रा हा चक्क लाल दिव्याची गाडी घेऊन फिरायचा. तो स्वतः मोठा शासकीय अधिकारी असल्याचे भासवत नाशिक पोलीस आयुक्तालयातील (Nashik Police Commissionerate) अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आपली छाप पाडायचा. तोतया अधिकारी बनून अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी 2024 मध्ये नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर 21 नोव्हेंबर 2024 रोजी त्याची जामिनावर मुक्तता झाली होती.

Nashik Crime News: 'पी एल ग्रुप' टोळीला मदतीचा संशय; 3 अधिकारी अडकले

या प्रकरणाला आता नवीन राजकीय आणि गुन्हेगारी वळण मिळाले आहे. नाशिकमधील कुख्यात 'पी एल ग्रुप'च्या टोळीतील काही गुंड सध्या नाशिक जेलमध्ये बंदिस्त आहेत. या टोळीला कारागृहात विविध सुविधा आणि मदत मिळवून देण्यासाठीच गौरव मिश्रा याने मध्यवर्ती कारागृहाच्या अधिकाऱ्यांशी संधान साधले होते. जेल अधिकारी निवासस्थानाच्या बाहेरील परिसरात तुरुंग अधिकारी हिरालाल भामरे, अशोक मलवाड आणि जगदीश ढुमणे हे तिघे या तोतया अधिकाऱ्यासोबत पार्टी करताना एका व्हिडिओत कैद झाले. या व्हिडिओमुळे कारागृह प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

Nashik Crime News: कारणे दाखवा नोटीस आणि चौकशीकडे लक्ष

या व्हायरल व्हिडिओची (Viral Video) गंभीर दखल घेत कारागृह प्रशासनाने तात्काळ प्राथमिक अहवाल \वरिष्ठांना सादर केला आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत या तिन्ही अधिकाऱ्यांना 'कारणे दाखवा नोटीस' बजावण्यात आली असून, 7 दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या तिन्ही अधिकाऱ्यांवर निलंबनाची (Suspension) कडक कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या प्रकरणात नेमकी काय माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Nashik TCS Case: निदा खानला कुणाच्या सांगण्यावरून घर दिलं? एमआयएम नगरसेवक मतीन पटेलांवर प्रश्नांची सरबत्ती; एसआयटीच्या चौकशीत काय माहिती समोर येणार?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.