दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यासह सतीश शहांना मरणोत्तर पद्म पुरस्कार; धुरंधर 'फेम अभिनेत्यासह 'या' कलाकारांचा आज मोठा सन्मान
abp majha web team May 25, 2026 06:43 PM

Padma Awards 2026 Entertainment: देशातील सर्वोच्च नागरी सन्मान मानल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची (Padma Awards 2026) घोषणा झाली असून यंदा चित्रपट, संगीत आणि रंगभूमी क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांचा गौरव करण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या हस्ते आज  25 मे रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित पहिल्या सिव्हिल इन्व्हेस्टिचर समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

यावर्षी केंद्र सरकारने एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये 5  पद्म विभूषण, 13  पद्म भूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. मनोरंजन विश्वातील अनेक मोठी नावं यंदाच्या यादीत झळकली आहेत. 1954  साली सुरू करण्यात आलेले पद्म पुरस्कार हे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक मानले जातात. कला, साहित्य, क्रीडा, विज्ञान, वैद्यकीय क्षेत्र, सामाजिक कार्य आणि सार्वजनिक जीवन अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी हे पुरस्कार दिले जातात. (Padma Awards 2026)

या दोन कलाकारांना मरणोत्तर पद्म पुरस्कार 

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ‘शोले’, ‘चुपके चुपके’ आणि ‘फूल और पत्थर’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

दिवंगत अभिनेते सतीश शाह यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या विनोदी अभिनयामुळे ते घराघरांत लोकप्रिय झाले. ‘सराभाई वर्सेस सराभाई’, ‘ये जो है जिंदगी’ आणि ‘एफआयआर’ या मालिकांबरोबरच ‘मैं हूँ ना’, ‘हम आपके हैं कौन..!’ आणि ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटांमध्येही त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या.

गायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण 

प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर बंगाली सुपरस्टार प्रसेनजित चॅटर्जी, अभिनेते अनिल कुमार रस्तोगी आणि ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक अरविंद वैद्य यांनाही पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

या कलाकारांचा पद्मश्रीने सन्मान 

  • मल्याळम सुपरस्टार ममूटी यांना भारतीय सिनेसृष्टीतील योगदानासाठी पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांनी मल्याळमसह तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्येही उल्लेखनीय काम केलं आहे. यापूर्वी १९९८ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.
  • अभिनेता आर. माधवन यांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ‘रहना है तेरे दिल में’, ‘3 इडियट्स’ आणि ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं होतं.
  • बंगाली चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार प्रसेनजित चॅटर्जी यांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाली आहे. जवळपास पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
  • ज्येष्ठ रंगभूमी आणि चित्रपट अभिनेते अनिल कुमार रस्तोगी यांनाही पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. ‘इशकजादे’, ‘थप्पड’ आणि ‘मुल्क’ यांसारख्या चित्रपटांतील भूमिकांबरोबरच विज्ञान आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठीही ते ओळखले जातात.
  • ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अरविंद वैद्य यांनाही यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. सहा दशकांहून अधिक काळ रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत काम करणारे अरविंद वैद्य सध्या ‘अनुपमा’ मालिकेत हसमुख “बाबूजी” शाह यांच्या भूमिकेत दिसत आहेत.
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.