OTT Movie Release: फक्त 10 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या एका छोट्याशा मल्याळम चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. या चित्रपटाने जगभरात 200 कोटींपेक्षा जास्त कमाई करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. अतिशय साधी कथा, दमदार भावना आणि मैत्रीचं वास्तवदर्शी चित्रण यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. विशेष म्हणजे कोणतीही मोठी स्टारकास्ट नसताना या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं. आता थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर हा चित्रपट ओटीटीवरही रिलीज झाला आहे. (OTT Must Watch Movie)
साउथच्या एका छोट्या चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर जगभरातील थिएटर्समध्ये डबल 234 कोटींपेक्षा जास्त कमाई करत सर्वांनाच धक्का दिला. या चित्रपटाला आयएमडीबीवर 8.3 एवढी रेटिंग मिळाली आहे. अवघ्या 10 कोटींचं बजेट असलेला ‘वाझा 2’चा (Vaazha 2) डिजिटल प्रीमियर 8 मेपासून जिओहॉटस्टारवर सुरू झाला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट केवळ मल्याळममध्येच नाही, तर हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांमध्येही उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील प्रेक्षकांना घरबसल्या हा चित्रपट पाहता येणार आहे.
या चित्रपटाच्या यशाची सर्वत्र चर्चा होत आहे. ‘वाझा २’ने केरळमध्ये सर्वात वेगाने 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणाऱ्या चित्रपटाचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी कल्याणी प्रियदर्शनच्या ‘लोकाह चॅप्टर 1 चंद्रा’ आणि मोहनलाल यांच्या ‘थुडरुम’ चित्रपटांचे विक्रम या सिनेमाने मोडले. Sacnilk च्या माहितीनुसार, 2 एप्रिल 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने भारतात 129.09 कोटी आणि जगभरात 234.87 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
चित्रपटाची कथा चार मित्रांभोवती फिरते. हशीर, एलन, अजिन आणि विनायक या चार मित्रांना समाज आणि कुटुंबाकडून सतत कमी लेखलं जातं. अभ्यासाचा ताण, सामाजिक दबाव आणि स्वतःची ओळख शोधण्याचा त्यांचा प्रवास चित्रपटात भावनिक पद्धतीने दाखवण्यात आला आहे. शाळेपासून मोठं होईपर्यंतच्या या मैत्रीच्या प्रवासामुळे प्रेक्षक चित्रपटाशी जोडले जातात. IMDb वर चित्रपटाला 8.3 रेटिंग मिळालं आहे. चित्रपटात हशीर एच., एलन बिन सिराज, अजिन जॉय आणि विनायक वी. मुख्य भूमिकेत आहेत. तर अजू वर्गीस आणि अल्फोन्स पुथरेन यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘वाझा : बायोपिक ऑफ अ बिलियन बॉईज’ या 2024 मधील चित्रपटाचा हा सिक्वेल असून दिग्दर्शन आनंद मेनन यांनी केलं आहे.