रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटानंतर आता प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं दिसून येत आहे. 21 मे 2026 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तेव्हापासून गेल्या पाच दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.
‘देऊळ बंद 2’ने गेल्या पाच दिवसांत 20 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाचा बजेट 7 ते 8 कोटी रुपयांदरम्यान असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे बजेटचा हा खर्च आधीच वसूल झाला आहे. यामध्ये स्नेहल तरडे आणि मोहन जोशी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या दोघांच्या भूमिकांमधील जुगलबंदी प्रेक्षकांना खूपच आवडली आहे.
दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी ‘स्वामींची कृपा’ म्हणत प्रेक्षकांचे आणि स्वामींचे आभार मानले आहेत. विशेष म्हणजे आता ‘देऊळ बंद’चा तिसरा भागसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दुसऱ्या भागाच्या शेवटीच त्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यात अभिनेता गश्मीर महाजनी पुन्हा एकदा राघव शास्त्रीच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘देऊळ बंद 2’मध्ये पुन्हा एकदा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी हे स्वामी समर्थांच्या भूमिकेत आहेत. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक, त्यांना मिळणारं सुमार दर्जाचं बी-बियाणं, बनावट खतं, कीटकनाशकं, सरकारी अधिकाऱ्यांकडून होणारा छळ या सगळ्या वास्तवाची मांडणी ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटात करण्यात आली आहे.