Ramakant Dayama Passed Away: ज्येष्ठ अभिनेते रमाकांत दयामा (Ramakant Dayama) यांचं आज (26 मे) निधन झालं. अनेक लोकप्रिय टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केलेल्या या कलाकाराच्या निधनानंतर मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिनेत्री शुभांगी लाटकर (Shubhangi Latkar) यांनी त्यांच्यासोबतचा एक जुना व्हिडीओ शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे. ( Actor Ramakant Dayama Death)
अभिनेते रमाकांत दयामा यांनी अनेक लोकप्रिय टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. शिवाय स्कॅम 1992 मध्ये हर्षद मेहता यांच्या वडिलांची भूमिका त्यांनी साकारली. या भूमिकेमुळे त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली होती. त्यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन सृष्टी हादरली आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप कळालेले नाही. चित्रपटसृष्टीतील मान्यवर चाहते आणि जवळचे मित्र त्यांना श्रद्धांजली वाहत असून त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करत आहेत.
यासंदर्भात मराठी अभिनेत्री शुभांगी लाटकर यांनी सोशल मीडियावर रमाकांत दयामा यांच्यासोबतचा गाणं आणि नृत्य करतानाचा व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी एक भावुक पोस्टही लिहिली.
त्या म्हणाल्या, “आज आपण एक अत्यंत सुंदर माणूस गमावला. माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत. रमाकांत दयामा हे फक्त माझे जवळचे मित्र किंवा कौटुंबिक मित्र नव्हते, तर मी ज्यांचा मनापासून आदर करत होते असे व्यक्तिमत्त्व होते. आयुष्याने कितीही आव्हानं दिली तरी, त्यांनाआयुष्याचा आनंद कसा घ्यायचा हे नेहमीच माहीत होतं. ते कायमच उत्साही, उबदार आणि सकारात्मक राहिले. ते अप्रतिम नर्तक, मनाला भिडणारे गायक, उत्कृष्ट अभिनेते आणि माझ्यासाठी नेहमी योग्य सल्ला देणारे मार्गदर्शक होते.”
View this post on Instagram
त्या पुढे म्हणाल्या, “दिसायला ते लहान वाटत असले तरी मी पाहिलेल्या सर्वांत धाडसी आणि मजबूत व्यक्तींमध्ये ते एक होते. अनेक महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याचं आम्हाला माहिती होतं, पण मनात कुठेतरी आशा कायम होती. आमच्या अनेक योजना अपूर्ण राहिल्या. अनेक वर्षांनंतर मला त्यांच्यासोबत पुन्हा काम करायचं होतं.”
शुभांगी यांनी पुढे सांगितलं, “आम्ही एक सुंदर हिंदी नाटक एकत्र करण्याचं ठरवलं होतं. मी त्यांना विचारलं तेव्हा ते हसून म्हणाले होते, ‘मी लवकर बरा होतो.’ आम्ही रंगमंचावर निवडक सुंदर कविता सादर करण्याचाही विचार केला होता. पण ते स्वप्नही आता अपूर्णच राहिलं.” त्या म्हणाल्या, “काही दुःखं अशी असतात, ज्यांचं वर्णन शब्दांत करता येत नाही. आज तसाच दिवस आहे. रमाकांतजी, तुमची उब, धैर्य, कला आणि सुंदर व्यक्तिमत्त्व आमच्या हृदयात कायम जिवंत राहील. तुमच्या आत्म्यास शांती लाभो.”
दरम्यान, रमाकांत दयामा यांच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, त्यांच्या निधनानंतर चाहते आणि मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.