BLOG : मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शिनबॉम ह्यांचे वर्णन सद्यकालीन आयर्न लेडी असे करता येईल. त्या जन्माने ज्यू आहेत मात्र कर्मकांडे अथवा धार्मिक कट्टरतेने त्यांना ग्रासलेले नाही हे विशेष आहे! नुकताच त्यांनी एक असा कारनामा करुन दाखवला आहे की, माजोरड्या आणि उन्मत्त डोनाल्ड ट्रम्प यांच्या थोतरीत लगावली गेलीय.
झाले असे की, यंदाच्या वर्षी फिफा वर्ल्ड कपचे फुटबॉल सामने अमेरिकेत होणार आहेत, अमेरिका यजमान देश आहे. 2020 च्या मध्यात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे, अमेरिकन प्रशासनाने इराणच्या फुटबॉल संघाला संपूर्ण स्पर्धेदरम्यान अमेरिकेत मुक्कामी राहण्यास नकार कळवला.
आडमुठ्या ट्रम्पच्या धोरणानुसार इराणी टीमला अमेरिकन भूमीवर खेळण्याची परवानगी होती, मात्र त्यांनी तिथे मुक्कामी राहू नये अशी अट घातली होती!
सध्या जगभरात ट्रम्प यांच्या हडेलहप्पी नीतीने आणि लहरी आत्मघातकी निर्णयांमुळे अख्ख्या जगाची कोंडी होताना दिसतेय. त्यांच्या मस्तवालपणाला थेट आव्हान देण्याचे धाडस सध्या तरी कुणीच दाखवलेले नाही. खेरीज ह्या घटनाक्रमाला जागतिक शेड्स आहेत.
इस्रायल हे एक ज्यू राष्ट्र आहे आणि इस्रायलने इराण विरोधात पुकारलेल्या युद्धात अमेरिकेने साथ दिली. जगभरातून खास करुन युरोपमधून त्यांना पाठिंबा मिळेल असे वाटले होते. मात्र प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. त्याच बरोबर त्यांच्या विरोधातही थेट कुणी उतरले नाही!
हे युद्ध आता जागतिक आर्थिक अरिष्टाचे रूप घेऊ पाहतेय, त्यामुळे सध्या कुणीही कोणतीही थेट भूमिका घेण्याचे धाडस करताना दिसत नाही. अर्थात याला काही अपवाद आहेत तर काहींनी ट्रम्पचे बूट चाटायचे शिल्लक ठेवलेत!
ट्रम्प यांच्या राजवटीत मेक्सिको आणि अमेरिकेचे संबंध अतिशय तणावपूर्ण झाले आहेत. मेक्सिकोची सीमा अमेरिकेस लागून आहे, तिथून अवैध घुसखोरी होते आणि मेक्सिकन नागरिक ड्रग तस्करी करतात असा ट्रम्प प्रशासनाचा दावा आहे. त्यामुळे त्यांना ह्या संपूर्ण सीमेवर अजस्त्र भिंत बांधायची आहे, तसा त्यांनी चंग बांधला आहे.
क्लॉडिया शिनबॉम ह्या ज्यू महिलेने मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे घेतल्यावर आपली बाजू भक्कम होईल असा ट्रम्प यांचा होरा होता, जो पुढे जाऊन साफ चुकला.
अमेरिकेने ज्यू समूदाय आणि इस्रायल यांच्या बाजूने सातत्याने धृतराष्ट्री एकांगी भूमिका घेतली असल्याने शिनबॉम आज ना उद्या आपल्या तालावर नाचतील असे अमेरिकेला वाटत होते. मात्र तसे काही न घडता, काही अनेपक्षित उलटे धक्के मात्र जरूर बसले!
याची कारणे क्लॉडिया शिनबॉम ह्यांच्या जडणघडणीत दडली आहेत. मेक्सिको सिटीमध्ये एका ज्यू कुटुंबात जन्मलेल्या क्लॉडिया यांचे वडील, कार्लोस शिनबॉम योसेलेविट्झ हे रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांचे पूर्वज लिथुआनियातून मेक्सिकोत आले होते.
क्लॉडिया यांची आई अॅनी पार्डो सेमो पेशाने जीवशास्त्रज्ञ होत्या आणि त्याच बरोबर युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापकही होत्या. क्लॉडियाचे मातापिता, दोघेही 1968 च्या मेक्सिको विद्यार्थी आंदोलनात सक्रिय होते. त्यामुळे क्लॉडिया यांना लहानपणापासून सामाजिक न्यायाचे आणि विज्ञाननिष्ठतेचे, असे दोन्हीही दृष्टिकोन मिळाले.
क्लॉडिया शिनबॉम यांचे वैयक्तिक जीवन साधे, शिस्तबद्ध आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने भरलेले आहे. त्या नास्तिक आहेत आणि आपल्या यहुदी वारशाबद्दल खुलेआम बोलतात, त्या कोणत्याही ज्यू धर्मीय प्रथा पाळत नाहीत. त्यामुळे इस्रायलच्या राक्षसी अधम वृत्तीविषयी त्यांना तीळमात्रही सहानुभूती नाही! नेतान्याहू यांच्या अगदी उलट, शिनबॉम यांचा दृष्टिकोन मानवतेचा आहे.
त्यांच्या वैयक्तिक जीवनातील कोणत्याही घडामोडी त्यांनी मेक्सिकन जनतेपासून लपवून ठेवलेल्या नाहीत. 1987 मध्ये त्यांचे कार्लोस इमॅझ गिस्पर्ट यांच्याशी त्यांचे लग्न झाले. त्यांच्यापासून मारियाना ही मुलगी जन्मली. तीस वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला.
2016 मध्येच विद्यापीठातले त्यांचे सहकर्मी असणारे जुने मित्र जेसुस ट्रीबा यांच्यासोबत त्यांची मैत्री नव्याने बहरली. 2023 सालच्या नोव्हेंबरमध्ये त्यांनी एका छोटेखानी खासगी समारंभात विवाह केला. क्लॉडिया यांचे पती जेसुस हे सध्या, बँक ऑफ मेक्सिकोमध्ये वित्तीय जोखीम व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत. आपली पत्नी राष्ट्राध्यक्ष आहे ह्याचा त्यांना जराही दंभ नाही!
क्लॉडिया शिनबॉम यांनी 2024 सालच्या ऑक्टोबरमध्ये मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षपदी शपथ घेतली तेव्हा मेक्सिको अतिशय डळमळीत अवस्थेत होते. आंद्रेझ मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर अर्थात अमलो, यांच्या ‘फोर्थ ट्रान्सफॉर्मेशन’ संकल्पनेच्या वारसदार म्हणून क्लॉडिया यांच्याकडे पाहिले जाते.
कारकिर्दीच्या पहिल्या दीड वर्षात त्यांनी बऱ्यापैकी चित्र बदलवले! सामाजिक कल्याणकारी योजना राबवताना रोजगार, शिष्यवृत्ती आणि पेन्शन हे घटनात्मक हक्क बनवले गेले. राजरोस होणाऱ्या खूनखराब्याने देश बेजार झाला होता, त्या तुलनेत हत्यांच्या संख्येत लक्षणीय घट नोंदवली गेली. काही राज्यांत ही घट तब्बल साठ टक्के इतकी खाली आली.
महिला अधिकार, पर्यावरण आणि ऊर्जा क्षेत्रात नवीन धोरणे त्यांनी राबवली आहेत. आर्थिक स्थैर्य आणणे आणि गरिबी घटवणे ह्यावर सातत्यपूर्ण फोकस ठेवलाय. असे असले तरी, गुन्हेगारी आणि ड्रग कार्टेल्स ही त्यांच्यापुढची सर्वात मोठी समस्या आहे.
ट्रम्प प्रशासनाच्या दबावामुळे मेक्सिकोच्या राजकीय सामाजिक परिघात सातत्याने तणाव जाणवतो. न्यायव्यवस्था आणि संस्थांवर मोरेना पक्षाच्या वाढत्या नियंत्रणामुळे लोकशाहीचे संतुलन बिघडण्याची भीती सतत व्यक्त केली जाते. मेक्सिकोची आर्थिक वाढ बऱ्याच प्रमाणात संथ आहे, ही गोष्ट क्लॉडिया शिनबॉम जाहीर रित्या स्वीकारतात आणि आपले सरकार हे चित्र बदलण्यासाठी कटिबद्ध असल्याचा दावा त्या नित्य करतात.
क्लॉडिया शिनबॉम यांचे नेतृत्व शांत, वैज्ञानिक आणि डेटा आधारित आहे. मध्यम मार्गी आणि तंत्रज्ञान केंद्रित दृष्टिकोन हे त्यांचे वैशिष्ट्य! मेक्सिको सध्या ‘परिवर्तन आणि स्थिरता’ यांच्या संक्रमण काळात आहे. ह्या महत्वपूर्ण दशकात शिनबॉम यांचे प्रेरणादायी जीवन आणि नेतृत्व ही मेक्सिकोच्या आधुनिक इतिहासात एक आशादायक गोष्ट म्हणून पाहिली जाते!
एका वैज्ञानिक महिला, जी तिच्या देशाची पहिली महिला राष्ट्राध्यक्ष आहे, तिने सत्तेत येताच अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. इराणी फुटबॉल टीमला अमेरिकेत मुक्काम करण्यास नकार देताच त्यांचे सामने जवळपास बारगळल्यात जमा होते, कारण अमेरिकेची खपामर्जी पत्करून त्यांना कोण आश्रय देणार हा यक्षप्रश्नच होता!
क्लॉडिया शिनबॉम ह्यांनी इराणी फुटबॉल टीमला आपल्या देशात मुक्काम करण्याची अनुमती देऊन एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. आपण ट्रम्पसमोर झुकत नाही हा पहिला दृढ संदेश देतानाच ट्रम्प यांची कोंडी केलीय. आपण ज्यू असूनही, इस्रायलने ज्या इराण विरोधात युद्ध पुकारले आहे त्या इराणी संघाला आश्रय देऊन त्यांनी इस्रायलला चपराक लावली आहे!
सगळ्या जगाला आपण वाकवू शकतो हा डोनाल्ड ट्रम्प यांचा तोरा त्यांनी मोडून काढताना मेक्सिकन जनतेला नवा आत्मविश्वास दिला आहे. दक्षिण अमेरिकन देशांची आणि अमेरिकेची जी पूर्वापार खुन्नस सुरु आहे त्याचे नेतृत्व करण्यास मेक्सिको कधीही मागे हटणार नाही हा मेसेज त्यांनी उपखंडात दिला आहे!
क्लॉडिया शिनबॉम ह्यांच्या फुटबॉल बॉम्बचे काय करायचे याचे उत्तर अजून तरी ट्रम्प प्रशासनास गवसले नाही. क्लॉडिया शिनबॉम ह्या रुढार्थाने, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी ह्यांच्यासारख्या देखण्या नसतील, मात्र त्यांच्या पाठीचा कणा जगातल्या कोणत्याही राष्ट्रप्रमुखापेक्षा ताठ आहे हे त्यांनी दाखवून दिलेय!
हा बिनधास्त भिडणारा बाणा दाखवण्यासाठी माणूस प्रामाणिक, इमानी, देशप्रेमी आणि निष्कलंक चारित्र्याचा असावा लागतो! ह्यासाठी जिगर असावे लागते जे क्लॉडिया शिनबॉम ह्यांच्या ठायी आहे!