सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा छतावरून कोसळून मृत्यू; पत्नीला भेटून आले अन् काही वेळातच...; इंडस्ट्रीत खळबळ
abp majha web team May 28, 2026 03:13 PM

Popular Bengali Director Death: प्रसिद्ध बंगाली चित्रपट दिग्दर्शक अनिक दत्ता यांचं बुधवारी निधन झालं. ते 65 वर्षांचे होते. ( Bengali Director Anik Dutta Death) बहुमजली इमारतीच्या छतावरून पडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ते छतावरून कसे पडले, याबाबतच गुढ अधिक वाढत आहे. त्यांना तातडीने ढाकुरियाजवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणाचा तपास होमिसाइड ब्रँचकडून सुरू असून पोलिसांनी हिंदुस्तान पार्कमधील त्यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे. त्यांच्या निधनामुळे बंगाली चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून सोशल मीडियावरून कलाकार आणि चाहत्यांना धक्का बसलाय. अभिनेता जॉयजीतपासून ते निर्माता राणा सरकारपर्यंत अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

बंगाली दिग्दर्शकाचा छतावरून पडून मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (27 मे 2026) दुपारी प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक अनिक दत्ता यांचे निधन झाले . दक्षिण कोलकात्यातील हिंदुस्तान पार्क परिसरात असलेल्या बहुमजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील छतावरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना ढाकुरियातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

या घटनेमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अनिक दत्ता छतावरून नेमके कसे पडले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. होमिसाइड ब्रँचची टीम त्यांच्या निवासस्थानी पोहोचली असून, या मृत्यूमागे अपघात, आत्महत्या की अन्य काही कारण आहे, याचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे या प्रकरणातील गूढ आणखी वाढलं आहे.

सकाळी पत्नीला भेटून आले, काही वेळातच ...

मिळालेल्या माहितीनुसार, अनिक दत्ता यांची पत्नी हिंदुस्तान पार्क येथील घरात राहत होती, तर ते दुसऱ्या घरात राहत होते. बुधवारी सकाळी ते पत्नीला भेटण्यासाठी आले होते. काही वेळानंतर दुपारी त्यांच्या छतावरून पडल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.

दरम्यान, अनिक दत्ता यांनी बंगाली चित्रपटसृष्टीत अनेक लोकप्रिय आणि आशयघन चित्रपट दिले. विशेषतः ‘भूतेर भविष्योत’ या चित्रपटामुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली होती. त्यांच्या चित्रपटांमध्ये सामाजिक विषयांवर भाष्य आणि वेगळ्या कथानकाची मांडणी पाहायला मिळायची.त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता जॉयजीत आणि निर्माता राणा सरकार यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं. मनोरंजन विश्वात त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.